मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

फुंकर

फुंकर 
******
माझिया प्राणात घाल रे फुंकर
विझव अवघा लागलेला जाळ 

मग मी जगेन होऊन निवांत 
तुझ्या सावलीत दत्ता दिनरात 

सगुण निर्गुण नको साक्षात्कार 
साधू गुरु बुवा नको चमत्कार 

जगावे जगणे जैसा की निर्झर 
निर्मळ सुख ते दाटून अपार 

नसावी मनात सुखाची हवाव
दुःखाने घडावी नच धावाधाव 

आले जे सामोरे जगणे घडावे
तुझ्या फुंकरीचे सुख न सरावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

वरदान

वरदान
******
उगा उगाच पथात पाऊस पडुन गेला 
थकल्या जीवा तजेला क्षणात देऊन गेला 
 
मागेपुढे होता दग्ध रखरखाट सारा 
व्याकुळले प्राण तप्त शितल करून गेला 

घनमेघ दाटले तो गारवा हवासा होता 
ती गाठ जरी क्षणाची हृदयी कोरून गेला 

भिजले जरी न ओठ तृष्णा तशीच व्याकुळ 
हलकेच तुषारांनी पुष्प सजवून गेला 

नव्हतेच इंद्रधनु रंगीत स्वप्न त्यात 
गंध मातीचाच मुग्ध मनात पेरून गेला

नव्हतेच मागितले ओघळून गीत झाला
वरदान जीवनाला जणू की देऊन गेला
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .


 

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

नर्मदामाय

नर्मदामाय
*********
माझे येणे तुझ्या दारी 
घडेल गं कधी माय
मनातील आस माझ्या
पुर्णत्वा जाईल काय ॥

तुझे जळ खळखळ 
मधू रव नादमय
शिरातून सुरावेल 
कधी होत गीत गेय॥

स्मृती तप केले बहु 
पावलात ओढ आता 
आहे किंवा नाही बळ 
कशाला ग मला चिंता ॥

हळुवार काढ बेड्या 
पायात या रुतलेल्या 
तनमन मुक्त कर
लहरीत आंदोळल्या ॥

चालव गे हळूहळू
लहरीत आळूमाळू 
खडे काटे उन पाणी
दावूनिया नको टाळू॥

पडू दे गं हवा तर
तुझाच हा  देह आहे
तुझी माती होण्याहून 
थोर काय भाग्य आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

रक्षा बंधन

रक्षा बंधन 
*********
रक्षिलेस तू सर्वदा 
दूर धाडूनी आपदा 
काचली गाठ तरीही 
तोडला न कधी धागा 

थोर माझी ही पुण्याई 
म्हणून दारी आलो गा 
सारी ही तुझीच लीला 
कृपासिंधु तू श्रीपादा

तूच बंधू  हितकारी 
जन्मोजन्मी पाठीराखा 
तूच खेळगडी गोड
जीवलग प्रिय सखा

काय मागू तुला आता 
जीव प्राण ओवाळला
मिसळूनी ज्योत जावी
ज्योतीत तुझ्या कृपाळा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

संतसंग

संतसंग
****
संतालागी संत सदा ओळखती 
बांधुनिया घेती पदरात ॥१

मागील जन्माचे पुण्य येते फळा 
जळ येते जळा गंगेचिया ॥२

आम्ही लोभी भक्त अर्थाच्या शोधात 
राहतो मागत काही बाही ॥३

परी कधीकाळी संतांचे वचन 
होऊन किरण पडे डोळा ॥४

दीपतात डोळे अर्थ काही कळे 
परी खेळ खेळे तोच मन ॥५

तरी कणकण दिव्य क्षण क्षण 
घेतो रे वेचून येथे काही ॥६

कुठल्या जन्मात फळेन हे पुण्य 
होऊनिया धन्य  जाइन मी ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

भटकलो

भटकलो
*******
जरी भटकलो बहु भटकलो 
तुझ्या दारी आलो दत्तात्रेया ॥१

नको मोकलूस आता रे या दीना 
ठाव दे चरणा एक वेळ ॥२

नवस सायास व्रत उद्यापन 
झाली पारायण किती एक ॥३ .

तुज भेटण्यास बहुत शिणलो 
आणि अडकलो अडमार्गी ॥४

अगा मी पामर गती नाही मती 
गेलो अधोगती म्हणुनिया ॥५

परी तू दयाळ कृपेचा सागर 
गुणदोष सार दुर माझे ॥६

करी गा स्वीकार घेई पदावर 
नको येरझार व्यर्थ आता ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

एआरटी सेंटरला काम सुरू केले तेव्हा.

एआरटी सेंटरला काम सुरू केले तेव्हा. 
****************************

मी पाहत आहे 
अनेक शापित राजकुमार आणि राजकुमारी 
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेली 
न केल्या पापाची परतफेड करत असलेली 

त्यांच्या चेहऱ्यावर असते प्रसन्न प्रफुल्ल हास्य
पौर्णिमेच्या चांदण्याचे कवडसे पाझरणारे
किलबिलत सभोवती स्वर्ग निर्माण करणारे

मी पाहत आहे .
पालक चुकलेले सावरलेले पथावर आलेले
काळजाच्या तुकड्याला हातावर सांभाळणारे
तेच दिव्य मातृत्व अन् पितृत्व अंगात बाणलेले

या महानगरातील अपार कष्टात हरवून गेलेले
तरीही स्वप्न सोनियाची लेकरात पाहणारे
साधी सरळ झुंजार कळीकाळाशी भिडलेले

मी पाहत आहे 
मलाच त्यांच्यामध्ये वावरताना बोलतांना 
विस्मय चकित असा त्यांचा लढा पाहतांना 
किती शिकवतो आहे अजून मला तू जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 







दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...