शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

रक्षा बंधन

रक्षा बंधन 
*********
रक्षिलेस तू सर्वदा 
दूर धाडूनी आपदा 
काचली गाठ तरीही 
तोडला न कधी धागा 

थोर माझी ही पुण्याई 
म्हणून दारी आलो गा 
सारी ही तुझीच लीला 
कृपासिंधु तू श्रीपादा

तूच बंधू  हितकारी 
जन्मोजन्मी पाठीराखा 
तूच खेळगडी गोड
जीवलग प्रिय सखा

काय मागू तुला आता 
जीव प्राण ओवाळला
मिसळूनी ज्योत जावी
ज्योतीत तुझ्या कृपाळा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

संतसंग

संतसंग
****
संतालागी संत सदा ओळखती 
बांधुनिया घेती पदरात ॥१

मागील जन्माचे पुण्य येते फळा 
जळ येते जळा गंगेचिया ॥२

आम्ही लोभी भक्त अर्थाच्या शोधात 
राहतो मागत काही बाही ॥३

परी कधीकाळी संतांचे वचन 
होऊन किरण पडे डोळा ॥४

दीपतात डोळे अर्थ काही कळे 
परी खेळ खेळे तोच मन ॥५

तरी कणकण दिव्य क्षण क्षण 
घेतो रे वेचून येथे काही ॥६

कुठल्या जन्मात फळेन हे पुण्य 
होऊनिया धन्य  जाइन मी ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

भटकलो

भटकलो
*******
जरी भटकलो बहु भटकलो 
तुझ्या दारी आलो दत्तात्रेया ॥१

नको मोकलूस आता रे या दीना 
ठाव दे चरणा एक वेळ ॥२

नवस सायास व्रत उद्यापन 
झाली पारायण किती एक ॥३ .

तुज भेटण्यास बहुत शिणलो 
आणि अडकलो अडमार्गी ॥४

अगा मी पामर गती नाही मती 
गेलो अधोगती म्हणुनिया ॥५

परी तू दयाळ कृपेचा सागर 
गुणदोष सार दुर माझे ॥६

करी गा स्वीकार घेई पदावर 
नको येरझार व्यर्थ आता ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

एआरटी सेंटरला काम सुरू केले तेव्हा.

एआरटी सेंटरला काम सुरू केले तेव्हा. 
****************************

मी पाहत आहे 
अनेक शापित राजकुमार आणि राजकुमारी 
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असलेली 
न केल्या पापाची परतफेड करत असलेली 

त्यांच्या चेहऱ्यावर असते प्रसन्न प्रफुल्ल हास्य
पौर्णिमेच्या चांदण्याचे कवडसे पाझरणारे
किलबिलत सभोवती स्वर्ग निर्माण करणारे

मी पाहत आहे .
पालक चुकलेले सावरलेले पथावर आलेले
काळजाच्या तुकड्याला हातावर सांभाळणारे
तेच दिव्य मातृत्व अन् पितृत्व अंगात बाणलेले

या महानगरातील अपार कष्टात हरवून गेलेले
तरीही स्वप्न सोनियाची लेकरात पाहणारे
साधी सरळ झुंजार कळीकाळाशी भिडलेले

मी पाहत आहे 
मलाच त्यांच्यामध्ये वावरताना बोलतांना 
विस्मय चकित असा त्यांचा लढा पाहतांना 
किती शिकवतो आहे अजून मला तू जीवना

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 







मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी 
*******""
तुझ्यासाठी माझे येणे
तुझ्यासाठी माझे गाणे
बाकी मला मुळी नाही
जगताशी देणे घेणे

मानेवरी ओझे तुझ्या
ओठ कुलूपात बंद
भूमीवर खिळलेल्या
डोळियात परी बंड .

जरी तुझ्या वर वर 
रिवाजात हालचाली 
परी मज कळू येते
गूढ तुझी देहबोली

बोलण्यात शब्द जरी
शब्दात बोलणे नाही
पाहण्यात तटस्थता
सलगीचा आव नाही 

तरी मज दिसतात 
धुक्यातील चित्र काही 
ओझरत्या कटाक्षात 
बहरती दिशा दाही

तुझे हसू टिपूनिया
जातो पुन्हा दूर देशी .
परी येणे ठरलेले 
भिजलेल्या एका दिसी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

आस्थेचा दिवटा

आस्थेचा दिवटा
************
तुजला आवडे खुळा भक्तीभाव 
तयाचा अभाव माझ्याकडे ॥१

देवा मी वाचले ग्रंथ ते अपार 
तत्वज्ञानी थोर वारंवार ॥२

देवा मी ऐकले प्रवचने फार 
तार्किक आधार लाभलेले ॥३

खुरटली भक्ती जगती आसक्ती 
अशी काही वृत्ती आहे जरी ॥४

परी मी आस्थेचा घेऊनी दिवटा
धुंडीतसे वाटा तुझ्या देवा ॥५

येईल रे कधी तुझिया गावात 
अथवा मार्गात पडेलही  ॥६

पडलो जर मी ठेव उचलून 
मागील पुसून सर्व काही ॥७

बस इतुकाच मजला वर दे
वाटेत राहू दे  तुझ्या सदा ॥८


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, ३ ऑगस्ट, २०२५

दोस्त

दोस्त
******
दोस्त जितने भी है 
उतने हमे काफी है
एक चांद एक सुरज 
दुनिया के लिए काफी है 
हमे क्या मतलब है 
सितारे तो अनगिनत है 
जो अंधियारा दूर करे 
बस वही अपने हमदर्द है
***"
डॉ.विक्रांत तिकोणे 
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...