संतसंग
****
संतालागी संत सदा ओळखती बांधुनिया घेती पदरात ॥१
मागील जन्माचे पुण्य येते फळा
जळ येते जळा गंगेचिया ॥२
आम्ही लोभी भक्त अर्थाच्या शोधात
राहतो मागत काही बाही ॥३
परी कधीकाळी संतांचे वचन
होऊन किरण पडे डोळा ॥४
दीपतात डोळे अर्थ काही कळे
परी खेळ खेळे तोच मन ॥५
तरी कणकण दिव्य क्षण क्षण
घेतो रे वेचून येथे काही ॥६
कुठल्या जन्मात फळेन हे पुण्य
होऊनिया धन्य जाइन मी ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️