शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

तुझे शब्द

तुझे शब्द 
********

तुझे शब्द माझ्यासाठी 
जरी कधी नसतात 
तुझे शब्द भोवताली 
गरगर फिरतात 

तोच अर्थ त्याच खुणा 
खुणावती सदोदित 
बोलाविल्या वाचूनही 
खोलवर घुसतात 

किती काळ खणखण 
अव्याहत पडे घण 
अजून का ओल नाही 
रुक्ष उडे धुळी कण 

कातळात खोलवर 
झरा वाहे झुळझुळ 
किती रुंद किती खोल 
बोथटले शब्द बोल 

युगे झाली पहाडाला 
युगे झाली कातळाला 
झरतात किती थेंब 
साद देत जीवनाला

प्रलयाचे स्वप्न कुण्या 
अजूनही पुराणाला
वटवृक्ष पानावर 
जाग यावी बालकाला 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

बाजार

बाजार
******
आता मी जगतो नाटक कळून 
स्वतःला दावून सुखदुःख ॥१

आले गेले धन मान अपमान 
हिशोब पुसून साठवले ॥२

अगा माझे इथे मुळी काही नाही 
ध्यान नित्य राही चित्तात या ॥३

लेक आणि बाळ सांभाळले बरं 
शिक्षण संस्कार देऊनिया ॥४

परि ती पाखर जातील उडून 
चित्तास म्हणून दार नाही ॥५

मित्रगोत्र सारे घडीचे पाहुणे 
आपले वाढणे पाही मन ॥६

विक्रांत निघाला दत्ताच्या गावाला 
सोडून भरला बाजार हा ॥७

 🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

निरुपाय

निरुपाय
*****
फोफावतो निरुपाय सुटूनिया स्वप्न गाव 
ओठावरी मिटू जाते एक हृदयस्थ नाव 

कुठे देव सुटतात कधी व्रत मोडतात 
मांडलेली पूजा भिते दीप विझु लागतात 

तेच गीत कानी येते ठेक्यावरी मन गाते 
ठेच लागे उंबऱ्यात आणि दूध उतू जाते 

बांधलेल्या दिशा साऱ्या पायवाटा बंदीशाळा  स्वतःवर सक्ती स्वतः चाकोरीत चालण्याला .

चंद्रही दिसत नाही मोकळे आकाश कधी 
एक गाठ मारलेली रुततच जाते हृदी

दत्ता तुझे चालवणे आहे किती अवघड 
स्वप्न ओझे जन्मावरी मन होत आहे जड

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

मरणा

हे मरणा 
*******
मला घाबरवून रडवून नको घेऊस बोलावून 
मला छळून त्रास देऊन नको नेऊस पिटाळून 
मी येईन स्वतःहून या देहाचे गाठोडे घेऊन 
अन देईन टाकून तुझ्या दारात तुला सांगून
 बागुलबुवा आहेस तू आहे मी जाणून
श्वासाच्या शेवटचा मुक्काम तू आहे मी समजून    
तुला थांबण्याची उशिरा येण्याची 
ती भीक तर मी कधीच नाही मागणार 
मुका बहिरा आंधळा तू तुला काय कळणार
ते सोंगही असेल घेतलेले तू ओढून 
तरी मला  फरक नाही पडणार
 तू कुठे कचरलास 
राम कृष्ण बुद्ध यांना भेटायला
 तू कुठे थांबलास 
तुकाराम रामदास नानक कबीर यांना न्यायला 
तुझी असणे हा नसण्याचा जन्म आहे 
आधी जे होते ते 
जे नव्हते होते , नसणे होते
त्यात प्रवेशणे त्याला ना कसली

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

तुझे गाणे

तुझे गाणे
*****
तुझे गाणे तूच दिले 
तुझे गाणे तूच  नेले
कुणाचे ग काय गेले 
नभ सदा गर्द निळे 

तुझे रूप गुण गाता 
मन तुझे गाणे झाले
वाऱ्यावर हरवता
डोळा का ग पाणी आले 

ओठ जुळे ओठावर 
शीळ उठे रानभर 
थरारते वेळू रान 
व्रण कुण्या मनावर 

अजूनही  झिनझिन 
मिरवते पान पान 
ओघळून दव वेडे 
जन्म टाके ओवाळून 

मागते का गाणे कधी 
मोबदला परतीचा 
श्रुतीवर मोहरला 
अगा जन्म धन्य त्याचा 
 
विखुरले इंद्रधनु
रंग सारे उधळून 
हाती कुण्या नच आले 
नयनात तरंगुन 

तेही तुझे गाणे होते 
सप्त रंगी सुरावले 
तयातून तुच मज
जणू स्वप्न रूप दिले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. ..
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०२४

दास


दास
****
हीन दीन दत्ता तुझा मी रे दास 
घेई हृदयास मजलागी ॥

नाही पुण्य गाठी नाही सेवा काही 
तूच तुझा देई बोध मज ॥

 जाणतो अजून बहु चालायचे 
तुज भेटायचे तप थोर ॥

चालतो पांगळा पाहतो आंधळा 
येता तुझ्या दारा दया घना ॥

म्हणुनिया माझ्या मनी काही धीर 
होऊ दे उशीर मर्जी तुझी ॥

तुझ्या पालखीचा असे मी रे भोई 
करूनिया घेई सेवा रुजू ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

मृगजळ


मृगजळ
*****

मृगजळा मागे धावणारे मन 
असते कारण मरणाला ॥१

असून बरड दृश्य भासमान 
थांबते न मन काही केल्या ॥२

आशेची सावली सुखाची तहान 
वाहते जीवन रात्रंदिन ॥३

वळो कृपाकर मेघ दिनावर 
तृष्णेची लहर मिटावया ॥४

एकला हा जीव अथांग हे रण 
दत्ता आठवण ठेव माझी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...