शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

मोल

मोल
*****
 शब्द सजलेले सारे 
आज मिटले विरले 
काल पेटलेले दिवे 
कुण्या अंधारी बुडाले 

कोण लिहितो कशाला
मन कुणाला सांगाया 
अर्थ सुटती सरती 
भाव जाताच विलया 

सारे आधार जगण्या 
मी तो आहे रे सांगण्या 
चार पदांचा प्रवास 
कोण उरतो पाहण्या 

किती ओंजळी भरल्या
कुठे किती उधळल्या 
मोल थेंबुट्याचे काय 
असे सागरा भरल्या
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. 
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

साधन

साधन
******
तुझ्या नामाविन अन्य ते साधन 
मज दयाघन घडले ना ॥१

पूजन अर्चन ध्यान संकीर्तन
व्रत उद्यापन काही नाही ॥२

फुल पाने माळा झाली नाही गोळा 
घडला सोहळा कुठला ना ॥३

नाही कसे म्हणू यत्न तो ही केला 
खटाटोप भला जमला ना ॥४

ज्याचे बापजादे जैसे रे असती 
तैसे ते मिळती वारसांना ॥५

असून दैवाचा धनी भाग्यवान 
केली वण वण उगाच मी ॥६

आता मी निवांत राहतो पडून 
व्याज व्याजातून मिळवतो ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

गूढ वाट

गूढ वाट 
*******

उत्कट इच्छेने कधी पावले निघतात 
वाटा तुडवत जंगले ओलांडत
सत्याला शोधत गुरूला हुडकत 
जो नेऊन सोडेल तया ध्येयापर्यंत 

पण साऱ्यांच्या वाटा नाही पोहोचत 
साद देणाऱ्या हिमालया पर्यंत
काही अडकतात देवळात मठात 
संघात आखाड्यात चालणे विसरत

काही मिळालेल्या इवल्या कवड्यात 
सुख मानतात आणि पुन्हा निजतात 
त्यांचे बाहेर पडणेही खरेच असते श्रेष्ठ
क्षणिक जागे होणेही असते कौतुकास्पद

पण ज्यांच्या वाटा उमटतात डोळ्यात
तरंगतात मनात आणि उभ्या राहतात 
होणाऱ्या आरंभाशी झुगारून भीतीला
मिठी मारुनी स्वत:ला घनदाट एकांतात

अन् मग ती अडलेली कुठे बांधलेली 
अडखळून राहिलेली उगाच थांबलेली 
वाट उतरते खोलवर मेंदूच्या जंगलात 
जाते हृदयाच्या दरीत फिरते वादळागत 

साऱ्या अस्तित्वाचा पाचोळा करत 
जागृत जाणिवेच्या आरंभबिंदूपर्यंत 
शून्याच्या पोकळीत खोलवर घुसत 
सुरक्षिततेच्या साऱ्या कल्पना जाळत 

ती यात्रा अंतरयात्रा ते स्नान महास्नान
 ते दर्शन आत्मदर्शन येथे मग घडूनी
ती वाट पाहवी ज्यांची त्यांनीच डोळ्यांनी 
हे वाट ऐकावी ज्यांची त्यांनीच कांनानी

शोधणाऱ्याला ती वाट जातेच घेऊनी 
कधी भूल घालूनी कधी बळे ओढूनी 
म्हणून सांगतो त्या वाटेला कधी कुणी 
जाऊ नये कधी उगाचच कुतूहलानी 

गेल्यावर तिथून न घडते येणे परतूनी
आलच तर येणारा होतो दुसराच कुणी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

॥श्री गणपती ॥


॥श्री गणपती ॥
🌺🌺🌺🌺
मुलाधारी मूळ कामनांचे कुळ 
साचलेले स्थुळ देहरूपी ॥१
दूर त्या सारावे निर्मळ मी व्हावे 
म्हणूनही करावे साधन रे ॥२

तेथील दैवत असे एकदंत 
ऊर्जेच्या दारात आधिष्टीले ॥३
शरण जाऊन करावे प्रसन्न
अनन्य होऊन भक्ती भावे ॥४

मग चिदाकाशी रंग होतो लाल 
भक्तीचा गुलाल उसळून ॥५
हृदी ओंकाराची वाजू लागे धून 
साक्षीचे अंगण  उजळून ॥६

उघडे कवाड देव गजानन
कृपा जागवून मध्यमेत ॥७
विक्रांत प्रेमाची करी विनवणी 
सखया येवूनी भेटी देई ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 kavitesathikavita. 
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

ज्ञानेश्वरी ११:३२४

ज्ञानेश्वरी ११:३२४

म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।
आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ 
ज्ञानेश्वरी ११:३२४
*************
मागे सरू जाता नावडे संसार 
व्यर्थ नि असार जाणवतो ॥१

अडविते चित्त करे प्रतिकार
केर घरभर तैसा गमे ॥२

आणिक पुढती तू ही तो कळेना 
हाती गवसेना काही केल्या ॥३

अनंत अगाध नाही ज्यास पार
इंद्रीय गोचर नाही कदा ॥४

अशा संकटात पडलो मी घोर 
सुटून आधार मानलेले ॥५

बावरले मन गांगरले चित्त 
स्वरूपात दत्त केव्हा होशी ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

तळवटी


तळवटी
*******
आता कौतुकाचा पुरला सोहळा 
जीव झाला गोळा तुझ्यामध्ये ॥१

काय आणि कैसे मागावे तुजला 
मागण्या नुरला हेतू काही ॥२

येई मनावर वायूची लहर 
परि ती ही पर जाणवते ॥३

सरला धिवसा काही मी होण्याचा 
अर्थ असण्याचा लहरींना ॥४

अवघा खळाळ पाहतो निराळा 
बुडी घेतलेला तळवटी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

खोटे


खोटे
*****

तुझे येणे आहे खोटे
तुझे जाणे आहे खोटे
डोळा उमटले चित्र
प्रतिबिंब आहे खोटे

स्वप्न असेच असते
जरी साच की वाटते 
जाग येताच बोधाची 
सुख निद्रेचे सरते 

अंत नसेच दुःखाला 
जरी मनास वाटते 
नच होती सुरवात 
कधी तया न पटते 

जन्म म्हणे तो ही खोटा
काळ कळला कुणाला 
धागे काळे नी पांढरे 
कुणी नाही विणायला 

जग तरंगते गमे
कुण्या सूक्ष्म पोकळीत
मन कल्पित विराट 
कुण्या शून्य आकाशात

बघ बघ बघ बघ 
उभा राही स्तब्ध फक्त 
फट कुठली उजेडी 
कुठे घडतोय स्फोट 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 










दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...