सोमवार, ८ जुलै, २०२४

धुमाची बाहुली

धुमाची बाहुली 
***********

उडता ठिणगी इथे याच क्षणी 
धडाडून अग्नी पेटेल रे ॥

सरेल अस्तित्व जगी वाहिलेले 
जरी नसलेले मनोमय ॥

सरेल कहानी नच लिहलेली 
जरी घडलेली दिसे इथे ॥

धुमाची बाहुली शोधी वावटळा 
तिचा कळवळा कुणाला ये . ॥

असणे नसणे क्षणाचे दिसणे 
दत्ता आहे जगणे कशाला रे ॥

तुझिया फुंकरी व्हावे शून्याकार
अवघा संसार मिटूनिया ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ६ जुलै, २०२४

दैवाधिन

दैवाधिन
*******
सरतांना वर्षा ऋतु
माळरानी थांबलेले
नभात दिसले मज
मेघ काही दाटलले ॥

कोसळल्याविना खुळे 
तुडुंब भाव भरलेले
लुब्ध कुण्या झाडावर 
वाहणे विसरलेले ॥

गर्द गहिरे विशाल 
स्वतःत हरवलेले
सरे ऋतू दिन गेले
तरीही रेंगाळलेले ॥

त्या मेघा ठाव नव्हते
अपार आहे धरती
कुठेतरी कुण्या डोही
मिळेन तयास वस्ती ॥

भूमी विना मेघाला रे
दुसरी  गती नसते 
पण कुठे कधी कसे 
दैवाधिन हे असते ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

ए सी लोकल

एसी लोकल
**********
चार लोकांचीच चैन 
ए सी लोकल असते .
प्लॅट फॉर्म वर गर्दी 
उगाच वाढत असते. 

एक  लोकल जाताच
गर्दी ही चौपट होते
अन रेल्वेला बोलांची
लाख लाखोली मिळते

एक दोन डबे एसी
लावा तुम्ही लोकलला
कुणाचाही मुळी सुद्धा  
नकार  नाही त्याला

चार पैसे खर्च करून
सुख सोय हवी ज्यांना
सुखनैव ती ही सदा
मिळू देत की त्यांना

पण त्यांच्या सुखासाठी 
त्रास का हो  गरिबांना
पूर्ण रिती लोकल जाते
पाहवत नाही डोळ्यांना
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ४ जुलै, २०२४

निरोपाचे वेळी

निरोपाचे वेळी
************
निघतांता खुळे डोळे व्याकुळले 
क्षणभरा साठी होते थबकले 

रोज घडणारी घडली न भेट 
मग मना लागे उगा चुटपुट

उगा खोलवर कुण्या मनी जाणे
बरे नव्हे तुझे असे हे वागणे

माझिया मनाचे आकाश रे तुझे 
चांदणे तयात तुला पाहण्याचे

 तुला पाहता मी सारे विसरते
तुझिया स्वरूपी  हरवून जाते

अरे या सुखाची काय सांगू मात 
क्षण तेच देती धुंदी जीवनात 

सुख या क्षणाचे माझे नेऊ नको 
निरोपाची वेळी नभी पाहू नको

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३ जुलै, २०२४

भाजी आणण्यावरून

भाजी आणण्यावरून 
****************
एक भाजी आणण्यावरून 
गढूळ होते वातावरण 
थकलेला तो थकलेली ती पण 
घरंगळले त्राण 
शक्ती गेलेली हरवून 
तो हलत नाही आपल्या जागेवरून 
तिची बोलणी या कानातून 
त्या कानात जातात वाहून
मग ती उठते कुढून चिडून 
काहीतरी ठेवते शिजवून 
त्याचा वाटा बाजूस काढून 
चक्क जाते मग निजून 
काहीही बोलल्या वाचून
प्रश्नास उत्तर दिल्या वाचून 
तोही जातो मग समजून 
मनामध्ये तसाच उबगून 
खावी न खावी भाजी 
थांबतो ठरवल्या वाचून 
खाल्ले नाही काही तर 
भांडण वाढणार असते 
अन खाणे ही तर खरोखर 
त्याचीच हार असते 
मानापनाच्या संभ्रमात 
अखेर भूक जिंकते 
अन उद्याचे भांडण 
पोटामध्ये विझून जाते
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २ जुलै, २०२४

पिसाळणे

पिसाळणे
******
जनावर पिसाळू देत कितीही 
ते सांभाळता येते बांधता येते 
पण माणूस पिसाळला की .
फारच अवघड होते 
त्याला न बांधता येते 
न ताडता येते न सांगता येते

माणूस पिसाळला म्हणजे 
त्याला कुत्रे चावलेच असे काही नसते 
माणूस पिसाळला म्हणजे 
त्याला रेबीज झालाच असे काही नसते

कुत्रे न चावता माणूस
तेव्हाच पिसाळत असतो
आणि जगावर भुंकत असतो
जेव्हा तो स्वतःलाच चावत असतो

माणसाचं एक नवल असते 
त्याला आपण पिसाळलो 
हे थोडेसे कळत असते 
पण त्या पिसाळल्याचे कारण 
त्याला सापडत नसते 
कुत्रं सापडत नसते 
माकड सापडत नसते 
मांजर सापडत नसते 
म्हटले तर ते त्याच्या आतच असते 
म्हटले तर कुठेच नसते .

त्याचं ते पिसाळलेपण 
एक शाप असतो त्याच्या स्वतःसाठीही 
आणि भोवतालच्या जगासाठी ही
त्याला उ:श्याप नको असतात 
किंबहुना त्याला उ:शापाची तमाही नसते
खरंतर ती एक अंतहीन नरक यात्रा असते

अशावेळी त्याच्यासाठी मनात उमटते 
ती फक्त एक प्रार्थना .
मनात दाटते करुणा 
त्याच्या न संपणाऱ्या संचितासाठी
त्या  त्याच्या आत जळणाऱ्या वणव्यासाठी 
आणि सभोवतालच्या झाडासाठीही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १ जुलै, २०२४

दत्ताविण




दत्ताविण
**** *
अन्य काही नको  मज दत्ताविन 
होऊनी अभिन्न राहो मन ॥१

नको रे वैभव यश कीर्ती मान
दुःखाचे कारण मनास या ॥२

तव पाऊलास जडो माझे चित्त 
जाणीवे सकट जग सुटो ॥३

रहावे डुंबत तुझिया प्रेमात 
शून्याच्या घरात सर्वकाळ ॥४

जन्मास आल्याचे  घडावे सार्थक 
संता दारी भीक प्रेम मिळो ॥५

असावा विक्रांत दत्त मिरवत 
जिणे ठोकरत कामनांचे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...