शनिवार, ११ मे, २०२४

योगीश्वर

योगीनाथ
********
भेटीविना तुझ्या पाऊल न पडे 
योगीयांचे गाडे अडलेले  ॥

मज ना कळते तुझे ठरवणे 
कुणा काय देणे कशासाठी ॥

अजात पाखरू तोंड उघडले 
घरटी बसले व्याकुळसे ॥

तैसे माझे मन यावे तू म्हणून 
डोळ्यात आणून प्राण पाही ॥

कुठल्या कुहुरी कुठल्या शिखरी 
असे तव स्वारी योगीनाथा ॥

येई क्षणभरी कृपा दान करी
मुद्रा मनावरी  उमटवया॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १० मे, २०२४

एवढेच पुरे



एवढेच पुरे 
********
वेदनांची स्मृती म्हणजे असते भय 
आनंदाचे स्मृती म्हणजे असते आकांक्षा 
आणि ही दिसणारी अस्वस्थता 
भय आणि इच्छेची प्रतिमाच असते 
अरे खरच की 
तर मग काय करायचे कसे बाहेर पडायचे

अरे ही इच्छाच ! त्यातून सुटायची 
पुन्हा त्या चक्राची पुनरावृत्ती करते

असे हे लखलखीत सत्य 
डोळ्यासमोर ठाकते 
तेव्हा खोलवर दडलेले 
अंधाराचे ठसे विरघळू लागतात
 
म्हणून थांब इथेच !
हे जाणणे, हे पाहणे महत्त्वाचे 
पुढे काय घडणार कशाला पाहायचे 

त्यामुळें ते चक्र जन्म घेते
त्या चक्रात फिरणे घडते
म्हणून ते चक्र थांबणे महत्त्वाचे 

त्या स्तब्धतेत निरवतेत 
अस्तित्वात असणे तुर्त एवढेच पुरे 
पुढचे पुढे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


मंगळवार, ७ मे, २०२४

मेघ सावळी

मेघ सावळी
********
मेघ सावळे व्याकुळ ओले
जेव्हा  निळ्या नभात जमले
हर्षनाद तो गंभीर गहीरा
ऐकून वेडे मन बावरले

शामल रूप लोभसवाने 
मनात आले आकाराला 
काळवेळ मग हरवून गेला
उभी ठाकले मी यमुनेला

झर झर सर आली धावत 
लगबग जशी तुझ्या पावलात 
चिंब चिंब मज धुंद भिजवत
वेढूनिया जल निळ्या मिठीत
 
तरू वेली फळ पुष्प आघवे
तू च होवून होते ठाकले
मग मीपण माझे हे इवले
झोकुनिया तयात दिधले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

 

सोमवार, ६ मे, २०२४

फोटो

फोटो
*****

क्षणभर वाटले ठेवावा तुझा तो फोटो 
सेव्ह करून गॅलरीत 
किंवा पाठवावा क्लाउड वर
पहावा उगाचच कधी मधी

तशीच दिसतेस तू अजून 
तेच पिंगट लांब केस 
तेच राखाडी डोळे 
सुंदर कमानदार भुवया 
मोठाले कपाळ 
त्यावर मध्ये मध्ये येणाऱ्या बटा 
तेच तुझे गूढ मधुर स्मित 
सडपातळ तनु आणि 
चांदणे पांघरून यावे
तशी नितळ कांती 

तस तुला कुठे कळणार आहे 
हे माझे सेव्ह करणे
म्हणजे कोणालाही कळणार नाही 
मग काय हरकत आहे
 
तुला तर तेव्हाही कळले नव्हते 
आताही कळणार नाही 
इतक्या वर्षानंतर कळणे न कळणे 
सारे व्यर्थ आहे म्हणा 
पण शेवटी का न जाणे 
मी ते सारेच फोटो डिलीट केले 
वाऱ्याने अचानक उघडलेली खिडकी 
बंद करावी तसे 
आपला आतला विस्कटलेला
निवांतपणा ठीकठाक करावा तसा 
मी आलो वर्तमानातील कठोर वास्तवात 

आश्चर्य वाटत होतं 
मनात खोलवर दडलेल्या पुरलेल्या 
विसरलेल्या वेड्या स्वप्नांचे मूर्ख आकांक्षांचे
त्या अजूनही जिवंत आहेत 
मेंदूच्या कुठल्यातरी पेशीत 
आपली जागा अडवून 
जणू शिलालेख होऊन 
कदाचित जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत
 न पुसली जाण्याची जिद्द धरून !
असू देत . .
तशी मेंदूत 
बरीच जागा असते रिकामी पडलेली 
असे शास्त्रज्ञ म्हणतात .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ४ मे, २०२४

खूण

खूण
****
मनाच्या कपाटी जपून ठेवला
बंद कुलुपात कुणा न दाविला ॥

तोच तो राजस सुंदर चेहरा 
अति मनोहर लोभस हसरा  ॥

कुणी ग चोरला कुणी ग लुटला 
होता जन्मभर खजिना जपला ॥

जाऊन गुरूला वृत्तांत वदला
वंदून पदाला उपाय पुसला  ॥

तोच ग अंतरी प्रकाश दाटला 
 सखा सर्वव्यापी सर्वत्र दिसला ॥

देई ज्ञानदेव खुण ती मजला
भ्रांतीत पडला जीव सुखावला ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ३ मे, २०२४

वाटा

वाटा
******
 वाटा देहाच्या मनाच्या 
कशा कळाव्या कुणाला .
रोज नकार तरीही 
दाटे प्रतिक्षा डोळयाला

स्मृती आनंदाची तीच
शोधे त्याच त्या सुखाला 
बंद दरवाजे तरी 
मन ठोठावे कडीला 

चाचपडत चालला 
खुळ्या आंधळ्याचा शोध 
नाही पाहीला किरण 
कसा होणार रे बोध 

देह मातीचा मातीला 
मन वाऱ्याचे वाऱ्याला 
गंध कुठून हा आला 
या रे मृगाच्या सरीला

कुठे भिजलेले स्वप्न 
कुण्या डोळा ओघळले 
सारे सांडून आभाळ 
प्राण श्वासात भरले 

मन मिटल्या एकांती 
शब्द श्वासात विरले
देणे सरले जन्माचे 
मागे कोणी न उरले

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २ मे, २०२४

नट

नट
****
ज्याचा पैशावर डोळा जो पद करी गोळा 
काय करावे त्या गबाळा सांभाळून ॥
ज्याचा रुबाब इवला दिसे उसना घेतला 
काय करावे त्या नटाला वाखाणून ॥
त्याचे बोलणे चतुर दावी अभ्यास भरपूर 
काय करावे त्या फितूर लबाडाला ॥
ज्याने लुटले जगाला स्वतः मारून मनाला 
काय करावे त्या कुटाळ पाषाणाला ॥
त्याने विकले इमान वर मिरवी महान 
जन्म ठेवला गहाण ज्याने सैतानाला ॥
देह विकूनिया दासी पोशी घरा नि दाराला
तिचे अर्जन कष्टाचे तिच्या लागावे पदाला  ॥
नको याची रे संगत देवा देऊस पंगत 
नको लावूस हि पीडा मोले घ्यावयाला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...