शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

दादासाहेब भवार


दादासाहेब भवार
*************

माझ्या स्मृतीतील
म .तु अगरवाल रुग्णालयामधील 
इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट 
हे भवार त्याच्या नावाशिवाय 
पूर्णच होऊ शकत नाही 
किंवा त्या विभागाच्या चित्रांमध्ये भवर असणे 
हे वर्ल्डकप मध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकर किंवा कपिल देव असल्यासारखेच होते

भवार चा सर्वात मोठा गुण म्हणजे
त्याची नम्रता साधेपणा 
आणि कुठलेही काम करताना 
नकार न देण्याची वृत्ती 
काम करताना त्यांनी कधीही 
वयाचा भाऊ केला नाही 
किंवा आजारपणाचे कारण सांगून 
काम टाळले नाही 
किंबहुना नाही हा शब्द त्यांच्याकडून 
मी तरी कधी ऐकला नाही
कामाची वस्तू मिळाली की काम होऊन जाईल 
हे त्यांचे म्हणणे असायचे 
आणि ती वस्तू उपलब्ध केली 
कि खरच ते काम होऊन जायचे 

खरंतर आपल्याला 
तीन निघाडा काम बिघाडा 
अशा तीन बिल्डिंग मिळालेले आहेत 
आणि तीन बिल्डिंगमध्ये काम करताना इलेक्ट्रिशन लोकांना सुद्धा कामाचा 
खूप ताण पडतो पडला आहे .
तरीसुद्धा त्यांचे मी खूप कौतुक करतो .
की त्यांनी आपलं काम तरी खूप चांगलं निभावलेले आहे 
आपल्या कुणाला वा रुग्णांना 
पाणी मिळाले नाही असे  झाले नाही .
त्यासाठी त्यांनी स्वतःच्या काही आयडिया लढवल्या काही माणस 1 मदतीला घेतली 
आणि ते काम पूर्ण केले आहे 

तळेगावकर भवर बोरकर  भोळें 
 या सगळ्यांच्या  आडनावाच्या पाठीमागे र च यमक आहे . 
आणि हे सगळ्या इलेक्ट्रिशन चे काम वायर अन वाटर बरोबरच असते 
या योगायोगाची मला नेहमीच मोठी गंमत वाटते .

 खरंतर नवीन इमारतीमध्ये भवार तळेगावकर सारख्या माणसांची आपल्याला खूप गरज होती 
तिथे त्यांचे कौशल्य खूप खूप उपयोगी पडली असते 
पण सारेच काही मनासारखे होत नसते 
जीवन असेच असते 
थोडे सुख देते थोडे दुःख देते 
कधी जवळ घेते कधी दूर ढकलते 
कधी लवकर रिटायर करते 
तर कधी रिटायर होण्याची वाट पाहाया लावते

पण हरकत नाही 
भवर अजूनही तब्येतीने खणखणीत आहेत 
कामाची इच्छा करणारे आणि काम करणारी आहेत 
आणि त्यांचे काम हे इलेक्ट्रिशनचं काम 
अतिशय सुंदर काम आहे 
हे मला माहित आहे 
कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला ही  कळतात आवडतात 
त्यामुळे या आवडत्या कामामध्ये 
ते मग्न राहावेत आणि सुखी समाधानी राहावे हीच इच्छा .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

द त्त

दत्त
****
गुंतला 
देहात 
अडकला 
मनात
धरसोडीच्या 
तिढ्यात
मायेच्या 
वेढ्यात 
जीव हा 
सतत 

तया फक्त 
एक वाट
दत्त दत्त
तया फक्त 
एक गीत 
दत्त दत्त
तुटण्या बंध
दत्त दत्त
होण्या मुक्त 
दत्त दत्त

धनुष्य हे दत्त
बाणही दत्त
लक्ष ही दत्त
लक्षणारा दत्त

देह मनाची
करून प्रत्यंचा
लक्षून आत
जाता अलक्षात
भेटतो दत्त
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .






गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

ओळखीची

न ओळखीची
***********

तू न ओळखीची सखये आताही 
नव्हतीस बघ अन कधी तेव्हाही

तुला जाणण्याचे यत्न हे फुकाचे
केले बहुत मी व्यर्थ जरी साचे

तू सावली चंद्राची कुठेतरी हरवली
तू  प्रतिमा जलाची कुणी न पाहिली

तू गंध प्राजक्ताचा रंध्रात भरला
तू रंग मोगऱ्याचा दृष्टीत दाटला 

तू प्राण माझ्या व्याकुळ प्राणाचा
तु साज  माझ्या आतुर स्वप्नांचा 

जरी न जाणतो मी तुला पाहतो मी
स्पर्शाविन चंद्र  हा दिठीत माळतो मी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .





मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०२३

दिवा लावायचा आहे!


दिवा लावायचा आहे
***************
संध्याकाळ झाली आहे 
दिवा लावायचा आहे ॥

स्वच्छ पितळेचा चकचकीत घासलेला 
तेलही अगदी काठोकाठ भरलेला 
ताटात ठेवला आहे ॥

हळदी कुंकुम चंदन अक्षतांनी सजला 
तर मग आता रे उशीर कशाला
 बघ अंधारून आले आहे ॥

येई जरा त्वरा कर हाताचा आडोसा धर 
जरासा श्वास सांभाळ ज्योत पेटव ज्योतीवर 
तू कुठे अडकला आहेस ॥

माझ्या मनी काहूर माझा जीव आतूर
सारे काही तयार परी ना तुझी चाहूल 
संध्याकाळ झाली आहे ॥

दिवा लावायचा आहे 
ये ना लवकर !
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

नर्मदामाई


नर्मदामाई
********
अडकला प्राण माझा 
माई तुझ्या तीरावर 
खळाळत्या प्रवाहाने 
जीव होई खालीवर ॥१
कलकल नाद जेव्हा 
येतो तुझा माझ्या कानी
कौतुकाने आनंदाने  
गाली ओघळते पाणी ॥२
विशाल रूपाने जेव्हा 
भेटतेस सरोवरी 
दडपते छाती माझी 
लीन होतो पदावरी ॥३
किती घाट किती थाट 
जागोजागी विखुरले 
भक्ती लोट पाहुनिया 
मन माझे गहिवरे ॥४
तुझ्या स्पर्शासाठी मन 
सदोदित हे व्याकुळ 
तुझ्या कुशीत येण्याला 
हा जीव असे आतुर ॥५
तुझ्या तीरी जन्म मिळो 
जर असे मज माई
फक्त तुझे प्रेम लाभो 
अन्य नको मज काही ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

खेळ

खेळ
*****
अपार मेघांनी भरलेल्या 
आकाशात 
असतेस तू वावरत...१
कधीतरी कुठल्यातरी 
फटीतून 
देत मला दर्शन..२
ते क्षणभर तेजाचे 
झळाळणे 
पुन्हा हरवणे .. 3
घडतच राहते क्वचित अवचित 
तरीही असते पसरवत 
तुझी आभा जगतात ... ४
ते सुखाचे इवलाले क्षण 
आनंदाने झेलित 
माझे जगणे असते  वाहत .. ५
नंतर मी राहतो साहत
मेघांचा दुष्टपणा
जो माहीत नसतो त्यांना ..६
कृपा अवकृपेविना चालतो 
हा अव्याहत खेळ 
भोवताली दाटतो रातराणीचा दरवळ ...७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

प्राण विसावा


प्राण विसावा
**********
प्रियतम ओठातून  
प्राणा गेली फुंकर 
हरवले देहभान 
झाले जीवन सुंदर ॥ १
गात्रातून थरारले 
तेच सूर हळुवार
तनमन झणाणले 
स्वप्न जाहले साकार ॥२
रानोमाळ धावणाऱ्या 
वाटा जाहल्या सुकर 
यत्न सारे हरवले 
मुर्त दिसता समोर ॥३
आता राहील इथेच 
सदा तुझ्या पायावर 
कधी तुझ्यावरूनही 
ढळू नये रे नजर ॥४
प्राण विसावा तू माझा 
जन्मोजन्मी आळवला 
जगतांना हरक्षणी 
ध्यानीमनी जपलेला. ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

परिक्रमा

परिक्रमा ******* गावा गावात फिरत आहे  अन्नक्षेत्री जेवत आहे अन् अर्थ या जीवनाचा  माईकडे मागत आहे  प्रचंड पाणी प्रवाहाचे  नितळ नि...