सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

नर्मदामाई


नर्मदामाई
********
अडकला प्राण माझा 
माई तुझ्या तीरावर 
खळाळत्या प्रवाहाने 
जीव होई खालीवर ॥१
कलकल नाद जेव्हा 
येतो तुझा माझ्या कानी
कौतुकाने आनंदाने  
गाली ओघळते पाणी ॥२
विशाल रूपाने जेव्हा 
भेटतेस सरोवरी 
दडपते छाती माझी 
लीन होतो पदावरी ॥३
किती घाट किती थाट 
जागोजागी विखुरले 
भक्ती लोट पाहुनिया 
मन माझे गहिवरे ॥४
तुझ्या स्पर्शासाठी मन 
सदोदित हे व्याकुळ 
तुझ्या कुशीत येण्याला 
हा जीव असे आतुर ॥५
तुझ्या तीरी जन्म मिळो 
जर असे मज माई
फक्त तुझे प्रेम लाभो 
अन्य नको मज काही ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, २२ ऑक्टोबर, २०२३

खेळ

खेळ
*****
अपार मेघांनी भरलेल्या 
आकाशात 
असतेस तू वावरत...१
कधीतरी कुठल्यातरी 
फटीतून 
देत मला दर्शन..२
ते क्षणभर तेजाचे 
झळाळणे 
पुन्हा हरवणे .. 3
घडतच राहते क्वचित अवचित 
तरीही असते पसरवत 
तुझी आभा जगतात ... ४
ते सुखाचे इवलाले क्षण 
आनंदाने झेलित 
माझे जगणे असते  वाहत .. ५
नंतर मी राहतो साहत
मेघांचा दुष्टपणा
जो माहीत नसतो त्यांना ..६
कृपा अवकृपेविना चालतो 
हा अव्याहत खेळ 
भोवताली दाटतो रातराणीचा दरवळ ...७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

प्राण विसावा


प्राण विसावा
**********
प्रियतम ओठातून  
प्राणा गेली फुंकर 
हरवले देहभान 
झाले जीवन सुंदर ॥ १
गात्रातून थरारले 
तेच सूर हळुवार
तनमन झणाणले 
स्वप्न जाहले साकार ॥२
रानोमाळ धावणाऱ्या 
वाटा जाहल्या सुकर 
यत्न सारे हरवले 
मुर्त दिसता समोर ॥३
आता राहील इथेच 
सदा तुझ्या पायावर 
कधी तुझ्यावरूनही 
ढळू नये रे नजर ॥४
प्राण विसावा तू माझा 
जन्मोजन्मी आळवला 
जगतांना हरक्षणी 
ध्यानीमनी जपलेला. ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०२३

मिटींग

मिटींग
******

चला उठा पळा पळा 
मिटिंग आहे ठरली
बघा बघा मेलवर 
दवंडी आहे पिटली ॥१

सबबी सांगू नका रे
दूरवर पांगु नका रे 
साहेबाशी उगाचच 
पंगा तो घेऊ नका रे ॥२

का न कळे कधी कशी 
कोण्या मनी उगवली 
धावाधाव करूनिया 
माहितीही गोळा केली ॥३

गाळणी मधून पाणी 
सारेच जावे वाहुनी 
शब्द तसे काही आले 
गेले कुठे उडूनी ॥४

जी साहेब हो साहेब 
बोल सारे अदबीचे
कळल्या नाहीत तरी
पालन हो सुचनांचे ॥५

अभिमानी खुर्ची मग
मस्तपैकी फुशारूनी
फिरे गरगर उगा
ठरलेल्या  व्यासातुनी ॥६

आपलं काय तसाही
दिवस एक भरला
चलो यार ठरलेल्या 
गाडीचा टाईम झाला ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .




बुधवार, १८ ऑक्टोबर, २०२३

स्मृती

तुझ्या स्मृती.
********
तू नसतेस तेव्हा 
तुझ्या असंख्य स्मृती 
रुंजी घालतात मनात 
आणि मला ओढून नेतात 
तुझ्या सहवासात 

तेव्हा तू आकाश होतेस 
मला कवेत घेणारे
तेव्हा तू सुमन होतेस 
मला धुंद करणारे

तेव्हा तू फांदी असतेस 
माझ्यासवे झुलणारी 
माझे आसमंत भारावते 
तुझी निशब्द बासुरी 

तुझे नसणे घनदाट होते 
आणि माझ्यात आकार घेते 
खरेच तू जवळ नसतेस 
तेव्हाही इतकी जवळ असतेस 
की माझे पण 
तुझे होऊन जाते जाते 

त्या तुझ्या दुराव्याने अन विरहाने 
तू माझ्यात खोलवर रुजत असतेस 
अभिन्न होवून अन् राहतेस
माझ्यातील ओल टिकवून
जणू रंगातील पाणी होवून 

नाम रूपातील हे 
तुझे अस्तित्व 
मी माझ्यात धरून 
असतो  जगत सदैव
तुझा होवून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०२३

चांदण्याची गाणी


चांदण्याची गाणी
 ************

तुझी चांदण्याची गाणी  
मनी झरती येऊनी 
बोल पखरण ओली 
जातो चिंब मी भिजुनी ॥

तुझे हात हाती येता 
जन्म किती सरतात 
तुझ्या डोळ्यात वाकता 
स्वप्न किती फुलतात ॥

तुझ्या वेडात अजून 
शब्द नवे उमलती 
माझ्या गाण्यात नव्याने 
भाव पुन्हा अंकुरती ॥

मिठी मारते जीवन 
भरे श्वासामध्ये प्राण 
तम फिरते माघारी 
येते पूनव दाटून ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .


सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३

तुझिया प्रेमाने


तुझिया प्रेमाने
***********

तुझिया प्रेमाने झालो बळवंत 
जगा मारे लाथ आनंदात ॥

तुझिया नामाने झालो धनवान 
अवघा कृपण भोगालागी ॥

तुझिया सेवेने झालो सुखी असा
हीनवट पैसा वाटे मज ॥

तुझिया कृपेचा पिटतो डांगोरा 
दत्त दत्त स्मरा म्हणे जगा ॥

तुझिया भक्तीचा लेश जो पातला 
विक्रांत जाहला हर्ष राशी ॥

तुझिया प्रेमाची पिपासा सुटेना 
जन्मा यावे पुन्हा तुझ्यासाठी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...