शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आरती


आरती
******
खणाणती टाळ सुर ठरलेले 
शब्द रुळलेले ओठी जरी ॥१

परि भाव नवे मनी क्षणोक्षणी 
चाले ओवाळणी आरतीची ॥२

तीच ती प्रार्थना सुखाची याचना 
मागताना मना लाज नाही ॥३

हे तो असे एक आनंदाचे गाणे 
जीवना भेटणे जीवनाने ॥४

देव भक्ता पडे देहाविन मिठी 
रेशमाच्या गाठी अंतरात ॥५

विक्रांत पेटली ज्योत अंतरात 
रोम रोमी दाट तेज फाके ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

गणेश रूप

 रूप
****
पाहता सुंदर रूप मनोहर
हर्ष अनिवार मनी दाटे ॥
लोभस साजरी मूर्ती गणेशाची 
बटू बालकाची कांतीमान ॥
शुभ्र मोत्यासम असे एकदंत 
कृपा वक्रतुंड मुखावरी ॥
निळसर शेला पीत पितांबर 
लेणी देहावर सुवर्णाची ॥
कटीसी मेखला हातात कंकण 
पायात पैंजण रुणझुण ॥
योगिया दुर्लभ भक्तासी सुलभ 
प्रेमाचे वालभ मुर्त असे ॥
रूप पाहूनिया हरपले भान 
मन झाले लीन पायी तया ॥
विक्रांत हृदयी नित्य विनायक 
पाहतो कौतुक भक्तीचे हे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

प्रतिमा

प्रतिमा
******
पुन्हा पुन्हा माझ्या मनात 
तुझ्या प्रतिमा उमलती 
सारेच दिवस पुनवेचे 
होत सागरा येते भरती ॥

पुन्हा एकदा जीवनाला 
जगण्याची येते उर्मी 
होता वर्षा स्पर्श जैसा 
सुखावते पुन्हा भूमी ॥

जाणतो मी दूरवर तू 
लागणार नाहीच हाती 
नील नभापलीकडे त्या 
तुझी दुनिया प्रिय वस्ती ॥

गीत तुझे ओठात माझ्या 
सुर जेव्हा होऊन येतात 
त्या सुखाच्या वादळात 
हरवतो मी तुझ्या रूपात ॥

तुझेपणाचे अथांग वेड हे
घेवूनी मी असा माझ्यात 
साद घालतो भान हरवून 
ये रे ये तू माझ्या हृदयात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .



मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३

आला गणपती


आला गणपती
************
आला गणपती आला गुणपती 
आला महामती विद्येचा तो ॥१
आला मिरवत वाद्य गजरात 
बसे मखरात सजलेल्या ॥२
झाली रोषणाई चढली झिलई 
अवघीच घाई घरी दारी ॥३
भरले बाजार पेढे फळे हार 
चालला व्यापार धामधुम ॥४
जमा झाले गावी अवघे ते भाई
भेटीगाठी जीवी जिवापाड ॥५
सज्ज सुगरणी सज्ज सुहासिनी 
पहा कौतुकानी रूप ल्याले ॥६
होतेसे गजर टाळांचा अपार 
गुलाल भुवर विखुरला ॥७
रांगोळ्याची नक्षी मिरवती दारे 
फटाके भूर्नळे हर्ष फुटे ॥ ८
गल्ली  बोळामध्ये मांडले मांडव
विराजित देव थोर तिथे ॥९
अन तयाचा तो वेगळाच थाट 
आरास अफाट मांडलेली ॥१०
 अनंत मूर्तीत एकच तो देव 
डोळीयात भाव प्रेममय ॥११
आता दहा दिस चालू दे दंगल
 नभात मंगल तेज कोंडो ॥१२
विक्रांत आनंद मनात दाटला 
विश्वात भरला ओसंडून ॥१३

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

वेध


वेध
***"
पुन्हा तुझा वेध लागे दत्तात्रेया
यावेसे भेटाया मज वाटे ॥
काय मी चालेल पायरी चढेल 
तुजला भेटेल पुन्हा देवा ॥
तुच बळ देता मज चालविता 
कर्ता करविता जाणतो मी ॥
सांभाळ दयाळा पुन्हा एक वेळा 
भेटीचा जिव्हाळा  देई मज ॥
जरी अंगी नाही पुण्याचा तो लेश
भक्तीचा आवेश बळे आणी ॥
गुणात  वाहतो मूढ अल्पमती 
ठेवियले चित्ती परी तुज ॥
आता तार मार बोलाव वा टाळ 
विक्रांत केवळ तुझ्यासाठी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

निभावणे

.निभावणे
********
आताही वाऱ्याचा झोत आला की 
झाड हिंदोळत आहे थरथरत आहे 
कधी फुलांची बरसात खाली करत आहे
तर कधी फळेही घरंगळत आहेत
ते झाड आनंदाचा वर्षाव करत आहेत 
पण वाऱ्याच्या झोतावर भूमीला स्पर्शणारे 
आणि स्वतःभोवतीच रिंगण घालणारे 
त्याचे ते अल्लड पण आता ओसरले आहे 
आता फांदीवर घर केलेल्या पक्षांची 
आणि पिलांची काळजी त्याला वाटत आहे 
रोज आशेने येणाऱ्या पांथस्थाची
कदर त्याला आहे 
तशी अजूनही वाऱ्याची सलगी त्याला आवडते 
पण आता त्याला वादळाची अन 
वावटळीची भीतीही वाटते 
म्हणून मग त्याची मूळे अधिकच 
खोल खोलवर जात आहेत 
आता उन्मळून पडणे त्याला परवडणार नाही
त्याला त्याचे वृक्षपण निभावायचे आहे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

दत्त घर

दत्त घर
******
दत्ताच्या घरात बसावे निवांत 
ऐसे या मनात 
बहू येते ॥१
परि त्या घराचे दार ना दिसते 
कुठून कुठे ते 
जायचे रे ॥२
कोण उघडेल कधी उघडेल 
मजला नेईल 
आत कैसे ॥३
विक्रांत यत्नाचे पाय मोडलेले 
पंख तुटलेले 
आपटून ॥४
भरून प्रतीक्षा ऐसी कणोकणी 
राहतो पडुनी 
पथी तया ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...