रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

सर्प यज्ञ

सर्प यज्ञ 
******
जीवनाचे अत्यंत रसरशीत चैतन्यदायी 
तरीही भयावह रूप असते नागराजाचे 
त्याचा तो एकच फुत्कार
उमटतो शहारे अंगावर 
त्याच्या दंशभयाने या देहात  
वाहतात भयाचे कितीतरी लोट   
तरीही तो जेव्हा फडा उभारतो 
आणि डोलू लागतो कुठे थोडा दूरवर 
मंत्रमुग्ध होते नजर 
विस्तारतात बाहुल्या अन् 
विसरतो आपण आपले भान 

तो कधी काळा कधी पिवळा 
कधी ठिपक्यांचा तर कधी आकड्याचा 
कधी स्वतःच्याच जातीचा भक्षक 
किंग कोब्रा असतो
त्याचे प्रत्येक रूप 
असते भीषण सुंदर 
*
तो दिसत असतो जंगलात
 माळरानात शेतात निर्जन परिसरात 
एकांतप्रित तापट संन्याश्यागत 

त्याचे ते विषदंत असतात 
साधन शिकारीचे संरक्षणाचे 
पण  डसतात  कधीकधी 
मनुष्याला कळत नकळत 
अन् या त्याच्या  प्रतिक्षिप्त कृतीने 
घाबरून चिडून 
माणूस करू लागतो
संहार सा-याच सर्पजातीचा 
तो सर्प यज्ञ 
जो कधीच संपला नाहीत
अन् घडतच आहे विनाश
अश्या हजारो देखण्या जीवांचा 

माणसाला कळत नाही 
की तक्षकाय स्वाहा :
सोबत इंद्राय स्वाहा : नाही तर 
मनुष्याय स्वाहा : हेच घडू शकते .
कारण साखळीतील एक कडी तुटणे 
म्हणजेच साखळी तुटणे असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 



 

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

बुद्ध होत नाही तोवर

बुद्ध होत नाही तोवर 
***************"
निबीड भयानक अंधकारात 
संकटात दुःखात होता वाताहात 
आशेचा एक किरण शोधत असतो जीव 
दुःख संकट निराशा अपयश 
कुणालाच नको असते 
पण यशाचाच प्रतिध्वनी अपयश असते 
आणि सुखाचेच प्रतिबिंब दुःख असते 
सदा सगळ्यांनाच सदैव दुःख मिळत नसते 
किंवा सुखही मिळत नसते 

पण असतात काही अभागी जीव 
ज्यांच्या जीवनातील दुःखाची वाट 
दैन्याचा उतार सरता सरत नाही  

दुःखाचा जन्म मुळातच दारिद्र्यात आहे 
दारिद्र्याचा जन्म अज्ञानात आहे 
स्वतःचे अज्ञान स्वतःच्या क्षमतेबद्दल अज्ञान 
जगाचे अज्ञान जीवाबद्दलचे अज्ञान 
मनुष्यत्वा बद्दलचे अज्ञान
.
भौतिक सुखाच्या मर्यादा जाणून 
त्या मिळवणे ही एक पायरी आहे 
मनुष्य जीवनाची 
पण बहुतेक जीवनातील निरर्थकता 
एकूणच जीवनाची क्षणिकता तोच तोचपणा 
हे दुःखाचे कारण असू शकते का ?
म्हटले तर असते म्हटले तर नसते 
त्याच्याकडे कोण कसे पाहते 
त्यावर हे अवलंबून असते 

पण खरे दुःख आहे ते गमावण्याचे 
धन ज्ञान परिवार पद प्रतिष्ठा हरवण्याचे 
आयुष्यभर केलेली कष्टाची मिळकत 
उभारलेला डोलारा तो पडण्याची शक्यता 
हे जाणण्यात आहे 
हे सारे नेते मरण एका क्षणात 
अस्तित्वाच्या खुणा ही मिटवत 
हे नसणं मानसिक दुःखाचे कारण आहे 

अर्थात ज्याच्याकडे जास्त 
त्याची आसक्ती जास्त त्याचे दुःखही जास्त 
म्हणूनच संत महात्मे गातात 
निरासक्तीचे त्यागाचे गोडवे 
पण तेही मनाचे ट्रेनिंगच असते 
विवेकाने आणलेले वैराग्य असते 
.
दुःखाच्या निराकरणाचे मार्ग 
प्रत्येक जण शोधत असतो 
आपल्या कृतीप्रमाणे आपल्या समजेनुसार
पण हे अटळ सत्य आहे की 
दुःख कुणालाच सोडत नाही 
तुम्हाला दुःखासवे  जगावेच लागते 
कधी त्याला स्वीकारत 
कधी त्याचाशी तडजोड करत 
कधी हुशारीने शिताफीने 
जमेल तेवढे त्याला दूर ठेवत

पण ते येतच राहते 
अचानक संकटाच्या रूपाने 
आणि आपले व्याज घेतच राहते 
प्रत्येक जीवाकडून 
जोवर तुम्ही बुद्ध होत नाही तोवर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

येई आता


येई आता
*******
दिलेस जगणे हे मज दत्ता 
काय ते हाता होते माझ्या ॥१
कुठे कसा अन् काय मी होतो 
जरी न जाणतो दयाघना ॥२
तूच उचलले गगनी ठेवले 
लाड पुरविले जगती या ॥३
परि ती खेळणी मजला देऊन 
ठेवीसी रिझवून दूरवरी ॥ ४
खेळ उमजला हा आता मजला 
बहुत चालला जगती या ॥ ५
थांबव सारे अन तू येरे 
उचलुनि ने रे मज आता ॥ ६
जगतो विक्रांत तुज आठवत
येई अवधूत दत्तात्रेया ॥ ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

शिव्या कृपा


शिव्या
*********
शिव्याविन पापा कैसी हो आटणी
देवाची ही देणी  कृपामय  ॥१

कळल्यावाचून जगती जगता 
पाप घडे हाता ऋषीच्याही ॥२

तर मग आम्ही मातीचे पुतळे
जळी विरघळे स्पर्शे होता ॥३

पडू देरे शिव्या व्हावी रे हेलना 
भेटी दयाघना त्वरे व्हाया ॥४

परी राहो मन तेधवा ही स्थिर
अवघा स्वीकार प्रसाद हा ॥५

किती रे शिणसी बापा अवधूता 
निर्मळ विक्रांता करावया ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .





सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

पुरस्कार


 सना पंडीत यांच्या FB पोस्ट वरून सुचलेले 

 १ पुरस्कार म्हणजे काय रे भाऊ ?
: - अरे ते तुला माहित नाही का जे देणाऱ्याला द्यायचे नसते पण घेणाऱ्याला घ्यायचे असते .
अन देणाऱ्याला ज्याला द्यायचे असते त्याला देता येत नसूनही  ज्याला दिले त्याला हसून दाखवायच असते .
२ म्हणजे भिक का रे भाऊ ?

: - नाही रे 'ती गोष्ट आपल्या आपल्यातच वाटायची असते ,कधी तुला घे तर कधी मला दे असं म्हणत मिळवायची असते .
३ म्हणजे आहेर का रे भाऊ . ?

: - छे तुला तर काहीच कळत नाही .
जी दिल्याने पेपरात छापून येते सगळीकडे नाव होते .
४: - म्हणजे चोरी का रे भाऊ ?

: - छे आता याला कसे समजावे .
जी दिली असता फक्त चार लोकांनाच कळते बाकीच्यांना काहीच माहित नसते . रस्त्यावरच्या भाजीवाल्याला वडापाववाल्याला आणि फेरीवाल्याला तर कळतच नसते .
: म्हणजे करमणूक का रे भाऊ . ? 
😊🥴😄😁

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

क्षणभर

क्षणभर
*******
हे सारेच क्षणभर 
हे सारेच कणभर 
पण असू दे रे 
अन हसू दे रे 
श्वासात प्राण भरून 
डोळ्यात चंद्र ठेवून 
जगु दे रे
हे सारेच सरणार 
हात रिते राहणार 
उद्याचे काय रे 
कोणी पाहिले रे 
आज हात उभारून 
ओठात गाणे घेवून 
नाचू दे रे 

उद्या हे नसणार 
स्वप्न तुझे तुटणार 
स्वप्न तुटू दे रे 
भान हरू दे रे 
जीवना मिठी देऊन 
स्वप्न डोळ्यात भरून
निजू दे रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

फुकटचे धन

फुकटचे धन
********
फुकटाच्या धनाचा त्या
लोकांना या लोभ का रे 
नरका जाती-पितर 
दिसत त्या नाही का रे ॥१
पापाचे ते घडे भरे 
चढे रास वर वर 
पुन्हा पुन्हा जन्मा येणे 
किती दुःख तळमळ ॥२
गरीबीचे दुःख नको 
व्यथा नको फाटक्यात 
हळुवार पेटवा रे 
देव दीप अंतरात ॥३
दोन घास पोटाला का 
दयाघन देत नाही 
मरणाचे भय का रे ?
जर ते सुटत नाही ॥४
कोटी कोटी जमव रे 
साथ काही येत नाही 
सारे जरी ठाव तुला 
तरी का वळत नाही ॥ ५
चार घास दोन वेळा 
राम नाम घेत खायी
विक्रांत सुखात नांदे 
आनंदाला अंत नाही ॥ ६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...