मंगळवार, ७ मार्च, २०२३

होलीके


होलीके
******

कशाला येऊ मी भेटाया होलीके
साहू गे चटके
तुझे उगा ॥१
येथे काय कमी आहे माझी आग
जळतात राग
अविरत ॥२
पेटवली धुनी दत्तात्रेये आत
समिधा अनंत
पडतात ॥३
हे काय असेल एकाच जन्माचे
अपार राशीचे
इंधन रे  ॥४
जळाल्या वाचून आता ना सुटका
पुण्याचा नेटका
यज्ञ झालो ॥५
तुझे जळू दे ग जमलेले तण
मळलेले मन
माझे जळो ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

उमाळा


उमाळा
******

तेच स्निग्ध चांदणे 
पुन्हा माझ्या मनात
तेच नितळ गाणे
पुन्हा माझ्या कानात

तो स्पर्श आळू माळू
पुन्हा झिरपला डोळा
पौर्णिमेचे बळ अन् 
ये सागर  कल्लोळा 

किती किती कुठे पाहू 
ही जोत्सना उरात घेवू 
हरवता देहभान 
काय कुणास देवू 

हा सुगंध कुठला 
कणकण मोहरला 
हा भाव गहिरा 
साऱ्या नभात व्यापला 

काय सांगू कुणाला 
विक्रांत उधान जाहला 
जीवनाने झेलला या
एक सुखाचा उमाळा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..


रविवार, ५ मार्च, २०२३

ज्वाला


ज्वाला
*****
सुटतात गाठी जळता शेवटी 
हरवून बंध जाती सारी नाती ॥
पडे देह आगी कापुराच्या वाती 
लपेटून ज्वाला पंचतत्वा नेती ॥
तिथे मोडते रे हरेक आकृती .
असे क्षण हाच फक्त तुझ्या हाती ॥
सुखासवे जाते ओझे वेदनाचे 
मावळती भास सत्य त्या दिसाचे ॥
जुने पान जाता नवे पान येते 
चक्र जीवनाचे वाहत राहते ॥
रेखाटने क्षण कर्म जीवनाचे
भरो रंग त्यात मन रांगोळीचे ॥
अवधूत रंगी रंगला विक्रांत 
धडाडून ज्योत भगवी मनात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

शनिवार, ४ मार्च, २०२३

दत्त देईल ते


दत्त देईल ते

********

दत्त देईल ते घ्यावे दत्त नेईल ते द्यावे ॥

दत्ता हृदयी धरावे आणि काही न मागावे ॥

 रोगा रोग म्हणू नये भोगा भोग म्हणू नये ॥

सारे येतसे वाट्याला जीवा देही पडलेल्या ॥

नाव प्रारब्ध त्या द्यावे कर्मभोग वा म्हणावे ॥

घडो घडते आघवे त्याला बाजूला सारावे ॥

चित्त दत्ताशी बांधावे सारे जीवन जगावे ॥

ऐसे संतांचे बोलणे जगो विक्रांत कृपेने ॥

 https://kavitesathikavita.blogspot.com

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी
*********

तुझ्यासाठी किती केल्या उठाठेवी 
पांघरले जग आलो देह गावी 

तुझ्यासाठी मोक्ष सारला मी दूर 
सजवला देह जाहलो कापूर 

तुझ्यासाठी आड वाटेला लागलो 
जन्म मरणाचा चकवा धावलो

तुझ्यासाठी झालो उन्हात पळस
लक्ष तारकांची काळोखी अवस

तुझ्यासाठी फुल पानात सजलो 
सागर सरिता जीवनी बुडालो 

तुझ्यामुळे जन्म माझिया मिठीत 
अव्यक्त ते व्यक्त पाहिले दिठीत

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

गुरुवार, २ मार्च, २०२३

भूमिका


भूमिका
*****
नाटकातील नटागत 
वठवावी लागते भूमिका 
जगतांना या जगात 

कधी जिवलग मित्र होत 
कधी दिलदार सोबती बनत 
कधी नियमात कठोर वागत 
कधी नियमाचे धागे तोडत

 पण उमटच नाही मनात कधीच कटुता 
रुजत नाही आत कधीच दुष्टता 
माहीत असतो तुम्हाला तुमचा मुखवटा 
आणि समोरील व्यक्तीतील गुणवत्ता 

वेळ काळ परिस्थिती अन् ती व्यवस्था 
असते तुम्हाला पळवत 
किंवा खेचून नेत 
परंतु त्या पलीकडचे नाते 
माणसातील माणुसकीचे 
असते आत वाहत  
नितळ निवांत 
आत्मीयतेने भरलेले 
सदैव शांत
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

बुधवार, १ मार्च, २०२३

ओला घाट

ओला घाट
********

मी थांबलो आहे वेस ओलांडून 
परका उपरा बेवारस होऊन 
अन तुला ती खबरही नाही अजून
का तू बेखबर आहे खबर असून ?

मी विझलो आहे संपूर्ण जळून 
आग आणि प्रकाश सरून 
अन तू ती राखही पाहत नाहीस ढुंकून
ते भाग्य मी आणू कुठून ?

हे जगणे माझे चालू आहे अजून 
संपत नाही म्हणून, पण प्राण..
तो तर कधीच गेला आहे उडून 
रे तू आहेस ना सारे जाणून ?

तुला धावत ये म्हणत नाही 
अन् मी  रडतही बसत नाही 
तुझ्याविना न कळणार कुणाही
यात ही अर्थ असेल काही ?

प्रतिक्षेत त्या दक्षिणदारी बसून
मी आहे प्रतिक्षाच होवून
जरी हे जीवन गेलेय वाहून
तो घाट ओला आहे अजून !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ ..

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...