रविवार, २२ जानेवारी, २०२३

कळकळ

कळकळ
*******

एक कळकळ  हवीय केवळ 
तेणे तो धावेल चक्रपाणी ॥१

तया नको दान   यज्ञ पूजा घर 
शुद्ध ते अंतर जाणे फक्त ॥२

मांडली आरास  आणले जनास 
मांडावे धनास देवा सवे ॥३

येणे वाढे मान  व्यर्थ उपादान 
माझे मी पण पुष्ट झाले ॥४

चैतन्य कृपेने  विक्रांता कळले 
मन हे वळले अंतरात॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जान २३

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

राम भागीदार

 
राम भागीदार
***********

राम भागीदार माझिया धंद्याला 
मग रे तोट्याला वाव नाही 

साऱ्या भांडवला तयाची मालकी 
स्मरणात चुकी घडेचि ना 

होता व्यवहार जगती असार 
म्हणती संसार फोल जया 

तोच होय सार फायदा अपार 
जीवना आधार पूर्णपणे 

तयाला काळजी अवघ्या धंद्याची 
जणू जगण्याची भक्तांचिया

पडे पुण्य गाठी सांगती चैतन्य 
होताच अनन्य देवापायी

विक्रांते व्यापार केला केल्याविन 
हृदयी ठेवून हाच बोध

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

फुटता फुटता

फुटता फुटता
**********
मी चांदण्याचे गुज तुजला 
सांगण्यास आलो होतो 
पाहून नभा मिठीत तुझ्या 
परतून पण गेलो होतो ॥१ ॥
भरवशावर ज्याचा मी 
किती युद्ध जिंकलो होतो 
ते शस्त्र मोडले दारी तुझ्या 
इमान द्यायला आलो होतो ॥ २॥
कितीदा तरी स्मृतीत तुझ्या 
चिंब चिंब भिजलो होतो 
ते आषाढाचे स्वप्न लाघवी 
पाहण्यास नच धजलो होतो॥३॥
नावही तुझे माहीत नव्हते 
दारावरून कितीदा गेलो होतो 
आणि कळता कधी अचानक 
हृदयी गोंदून बसलो होतो ॥४॥
ते गोंदनही किती काळ मग 
उगाच धरून जगलो होतो 
जीवनातून तू हरवून जाता 
मी जीवनावेगळा झालो होतो ॥५॥
घाव भरले अन व्रण उमटले 
जीवनात जरी रुळलो होतो 
फुटता फुटता कळे दिव्याला 
मी ज्योतीला  मुकलो होतो॥६॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

गोकुळ गावाला

गोकुळ गावाला
***********

किती पुरवतो लाड 
मी तो असुनिया द्वाड
किती घालतो मी घोळ 
तरी करीसी सांभाळ ॥
नाही मारत ठोकत 
नाही उपाशी ठेवत 
हळू सांगतो कानात 
चूक कळते मनात ॥
चार दिवस सरळ 
पुन्हा काढतोच कळ
कुणा फजित करून 
घेतो उगाच हसून ॥
कुणा दाखवतो भीती 
कधी चुकवतो रिती 
अशी खोडील ही वृत्ती
मज सोबत खेचती ॥
बहु  दटावतो मना
करी शास्त पुनःपुन्हा 
गाल फुगवून मज ते
सांगे गोकुळात होते ॥
खूप थकलो मनाला 
सांगे विनवून तुला 
बंदि गोकुळ गावाला 
कर तुझ्या या खट्याळा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

रविवार, १५ जानेवारी, २०२३

स्वामी छायेत


स्वामी छायेत
***********

दत्त पदी हे माझे जीवन 
स्वामी पदी म्या केले अर्पण ॥१
घेतो माझे मी  हे म्हणवून
माझे नुरले परि जीवन ॥२
अवधूताचा मार्ग धरला 
स्वामी छायेत जन्म चालला ॥३
आता मागू मी काय कुणाला 
कल्पवृक्ष तो मज भेटला ॥४
काय कळावे मजला स्वामी 
सागर तीरी मुंगी जणू मी ॥५
परि दीनाचा तोच दयाळू 
करितो माझा प्रेमे सांभाळू ॥६
तोच धरतो तोच सोडतो 
हरवू जाता खेचून घेतो ॥७
किती वाणावे तया कृपेला 
श्रीगुरुदास सुखी जाहला ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘


शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

अव्याहत

(फोटो साभार आसावरीताई)

अव्याहत
*********

कुठे जीव अडतो 
कुठे सल रुततो
तरी जन्म चालतो 
अव्याहत ॥

कुठे बीज अंकुरते 
कुठे माती सुखावते 
कुण्या राती हरवते 
अचानक  ॥

बीज कोणी पेरले 
रोप कोणी चोरले
कोणा नच कळले 
शोधशोधून ॥

दोन दिवसाचे 
गाणे उन्मेषाचे 
होते स्वप्न साचे 
पण काही रे ॥

हिरव्या सुखानी 
सजते अवनी
येतसे रुजूनी
पुनःपुन्हा ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

दत्त लहरी


दत्त लहरी
**********
मोहाच्या कर्दमी दत्त बुडवतो 
आणिक हसतो मोठ्याने रे ॥

अपकीर्ती धूळ दत्त उडवतो 
आणि रडवतो पुन्हा पुन्हा ॥

प्रतिमा फोडतो चित्र उलटतो 
नकोसे करतो जगतात ॥

आणिक थांबता बाहेरी धावणे 
येऊन प्रेमाने कुरवाळतो ॥

देतो उघडून प्रज्ञेचे विभव 
भक्तीचे लाघव लाडक्यांना ॥

विक्रांता कळल्या दत्ताच्या लहरी 
कोंडून अंतरी धरीला रे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘




वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...