रविवार, ४ डिसेंबर, २०२२

(गणपती) साथ


साथ
************
देव गणपती माझा 
मज सांभाळतो किती 
माझ्या जीवन प्रवासी 
चाले धरूनिया हाती ॥

दार उघडण्या जाता 
देव डावीकडे असे 
रूप धुम्राचे सावळे 
मला आभाळची भासे ॥

दार उघडता देव 
उभा सामोरी असतो 
प्रभा तेजाची रूपाची 
मज पावन करतो ॥

डोई फेटा भरजरी 
दृष्टी प्रेमळ रोखली 
चल जा मी साथ आहे 
शब्द गुंजती अंतरी ॥

घर सोडता सोडता 
येतो गेटच्या जवळ 
सिद्धी विनायक होतं 
देई निरोप प्रेमळ ॥

तोच आरूढ वाहनी 
रथ माझा रे सावरी 
पथ निष्कंटक करी 
जणू आणे कामावरी ॥

आत जाता ऑफिसात 
असतो टेबलावरी 
काम प्रामाणिक माझे 
देई साक्षीची स्वाक्षरी ॥

कर्म हाती बघ तुझ्या 
मज सांगे गणपती 
मनी पेरतो सुबुद्धी 
वाट दाखवत खोटी ॥

त्याचा म्हणवितो गण 
कर्म पेलतो कळती 
फळ देता तया पायी 
सुख मिळते विक्रांती ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

मी म्हणून

मी म्हणून
*******
कोट्यावधी विश्वांनी कोदाटलेले हे जग आपापल्या तुरुंगात रमलेले हे जग 
कधी सुखाची परिभाषा करून 
राहते त्यातच गुरफटून अडकून 
कधी दुःखाची साखळी गळ्यात घालून
धरते हट्ट कोणी यावे अन 
द्यावी सुटका करून म्हणून 
एक शरीर जन्माला येते 
तेव्हा एक विश्व उगम पावते 
एक शरीर संपते 
तेव्हा एक विश्व मिटत असते 
या दोन घटना मधील काळात
अगणित संभावनाच्या नाटकात
घटनांच्या प्रवासातून वाहत असते जीवन  
आणि ते विसर्जित होते तेव्हा 
आपला माग ही मागे न ठेवता 
जाते अलगद संपून
वाट्याला आलेली सूर्यकिरणे 
अंगावर झेलून 
तीही मोजल्या वाचून  
त्यातलाच मी आणि माझे जीवन 
असे जेव्हा येथे कळून 
तेव्हा मी होतो दृष्टा 
वेगळा जगाहून 
अन विरघळते जगत 
त्यातील पसाऱ्यासकट 
आणि उरतो तो फक्त मी 
मी म्हणून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

दत्त भेटो वा न भेटो


दत्त भेटो वा न भेटो
*************

दत्त भेटो वा न भेटो माझे मागणे तो दत्त 
सुख मिळो वा न मिळो माझे सुख फक्त दत्त

तन थकले तरीही पाही डोळीयात दत्त 
मन उदास तरीही नाही सोडवत दत्त 

असो दूर कुठे जरी नच जाणीव कक्षेत 
उडी मारता अंतरी श्वास अटको शून्यात 

दत्त मानला मी प्रिय रूप सजले चित्तात 
रूपा पड्याल सत्यात तोच सदोदित दत्त 

दत्त शोधता शोधता उरे मीच एक दत्त 
भोग विकार विचार दिसे मन वागवीत

जरी चालला जगात आता उगाच विक्रांत
 ढोल ताशे वाजतात किर्र शांतता कानात

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

कळल्या वाचून


कळल्या वाचून 
************

कळल्या वाचून जग
जगन्नाथ कळेल का 
जाणल्या वाचून प्रीती 
भक्ती ही उमजेल का ॥

हवेपणाला लांघुन 
जेव्हा देणे घडते रे 
प्रेम जन्म घेते उरी 
भक्ती ती फळते रे ॥

प्रेम ज्याला मिळते तो 
जगी भाग्यवान जरी 
प्रेम ज्यास कळते तो 
भाग्य स्वयं खरोखरी ॥

प्रेम जगास अर्पुनी 
असा प्रेममय होतो 
तो देवाच्या शेजारी रे 
सहजी जातो बसतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

पूजन

पूजन
******
करावे पूजन लाख रुपयांनी 
माझे न म्हणुनि सर्व फळ ॥१

घडावे पूजन रिकाम्या हातांनी
जीव हा वाहुनी देवापुढे ॥२

तर ते पूजन अन्यथा व्यापार 
घडे स्वाहाकार स्वार्थासाठी ॥३

खरे ते पूजन येतसे घडून 
कामने वाचून ऐहिक रे॥४

करावे पूजन घडण्या स्मरण 
देवास जाणून घेण्यासाठी ॥५

सगुण निर्गुण अवघे मिटून 
माझे मी पण जाण्यासाठी ॥६

विक्रांत शरण दत्ताचिया दारी 
वळून अंतरी मागे भक्ती ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

साहस

साहस
******
ओठावरी कुणाच्या ते  
शब्द होते अडलेले 
मनी होते युद्ध तरी 
पराभव ठरलेले ॥
नको नको म्हणे मन 
बंधनात अडकले 
उडायचे होते पण 
पंख कुणी कापलेले ॥
तेच भय पुरातन 
अणुरेणू  व्यापणारे 
तहानले प्राण परी 
पाणी नको म्हणणारे ॥
सुरक्षेची जीत झाली
साहसाचा जीव गेला 
जी जी म्हणे धनी कुणी
ठरलेल्या शृंगाराला ॥
मेले जरी मन तरी 
जगणे ते प्राप्त होते 
अन खुळे स्वप्न निळे 
तुटलेली वाट होते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

भक्ती प्रकार


भक्ती
****:
धनिकाची भक्ती देव रावुळात 
राहे मिरवत ऐश्वर्याने ॥१
रत्न हिरे मोती बहुत सजती 
पहारे बसंती शस्त्रधारी ॥२
परी ती ही असे देवा दारी भक्ती 
कृतज्ञता व्यक्ती रूपा आली ॥३

जया न ऐपत पैसा न खिशात 
तया सुमनात तीच श्रद्धा ॥४
भाव हाच देव अंतरी नांदतो 
बाकी साधने तो अर्थ नाही॥५
होवून याचक देवाच्या दारात 
तया ही भक्तीत न्यून नाही॥६

पोटासाठी पूजा पोटासाठी मंत्र 
कमावणे तंत्र व्यवहारी ॥७
करती पुजारी तयाही अंतरी 
नांदतो श्रीहरी त्याची कृपा ॥८
घडते पुजाही देवाच्या मर्जीने
कुण्याही हाताने उगा नाही॥९

देवालागी सारी सारखी लेकरे 
देवा जो हाकारे तया भेटे ॥१०
विक्रांत भक्तीत नसे छोटा-मोठा 
मुंगी ऐरावता एक लाभ ॥११
अनन्य शरण  होताच देवाला 
देव ये हाताला  सहजीच ॥१२

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ .

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...