बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

तुझे चित्र

तुझे चित्र 
***

तुझे चित्र 
पाहते मला  
असेच सदैव वाटते मला 

अन मग
त्या चित्राला 
भाव माझ्या मनातला 

कळला असे 
वाटते मला 
तुझा स्पर्श होतो जीवाला 

तुझे जीणे 
माझे गाणे 
दोन क्षणाचे येणे जाणे 

या जन्माच्या 
पलीकडले 
काही कळते न कळलेले 

किती कसे 
अन कुठवर
या प्रश्नाला नाही उत्तर 

ते पाहणे नि
विरघळणे 
पुन्हा नव्याने घडते जगणे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०२२

वादळ

वादळ
******
कुठल्या जगी का उठते वादळ 
अवघाच खेळ अज्ञाताचा ॥

कोण कुणा भेटे कुठल्या ओढीने
पापण्यात गाणे साचलेले ॥

ओठी येती शब्द अर्थ नसलेले 
पाण्यात पडले  जैसे पान ॥

जरी म्हणावे या व्यर्थ अपघात 
परि वाटतात ठरवले ॥

कुठल्या जन्माचे प्रारब्ध साचले 
देणे वा उरले कुणासाठी ॥

विक्रांत चकित पाहतो जगणे
होऊन जगणे वाहतो मुक्त ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

अन्न

अन्न
*****
अन्न वासनांचे असते रे मूळ 
जैसे ज्याचे बळ धाव तैसी ॥१

सांगे भगवंत तया गीतेमाझी 
पाहिली तैसीची वृत्ती जगी ॥२

व्यापिले मनाला राजस तमाने 
घेता आवडीने तैसे अन्न  ॥३

सात्वीके प्रदीर्घे मन झाले शांत 
जैसे पाणी संथ जलाशयी ॥४

पाहिले मनाने घडणे पडणे 
घडू दे जगणे आकलनी ॥५

विक्रांता जिभेला जितने कठीण 
जगणे त्रिगुण म्हणुनिया ॥६

परी दत्तात्रेय करीतसे खेळ 
आणीतसे वेळ योग्य तैसी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०२२

नच सोडी


नच सोडी
*********
लिहितो कवणे बळेच रेटून 
भाव भक्तीविन दत्ता जरी ॥१

जगी मिरवतो ज्ञान पाजळतो 
असून रिक्त तो आत जरी ॥२

जळतो कामने क्रोधाने भरतो 
गुणी म्हणवतो जगात या ॥३

वैराग्याची बहु गातसे महती
विकार दिसती लाख  उरी॥४

नकोस देऊस असली भक्ती 
त्याहून बरी ती माया तुझी ॥५

 दत्ता त्याग तू भले विक्रांतला
हा श्वान धन्याला नच सोडी॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

डिपी आणि तुम्ही.


डिपी आणि तुम्ही.
*************
जर देवाचे नाव घेऊन
देवाचे चित्र डीपीवर लावून 
तुम्ही करत असाल फसणुक
 लोकांना लुबाडून 
भक्तीचा आव आणून 
लोकांशी खोटे बोलून 
करत असाल धनार्जन गोड बोलून 
कुणाचे तरी काहीतरी नुकसान करून 

तर ती पूजा ते देव तो नमस्कार 
तो टिळा हे सर्व थोतांड आहे 
त्यापेक्षा देव ना मानणारा 
नास्तिक लाख पटीने चांगला असतो 
तो निदान खरं तरी बोलत असतो 
खरं तरी वागत असतो 

आणि ती त्याचे खरे वागणे 
आणि खरे बोलणे 
पटलेले आचरणात आणणे 
त्याला देवापाशी निश्चित घेऊन जाते 

भले तो देव मनात असो किंवा नसो 
त्याचा देव डीपीत असो किंवा नसो 
सत्य हेच त्या देवाचेच रूप असते
मग तुम्ही त्याला देव म्हणा किंवा म्हणू नका.

पहा पटले तर तो डीपी बदला जरा.
त्रास कमी होईल.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

तो मी !


तो मी !!
********

करताच तू 
बंद द्वार 
रिता रस्ता 
होता समोर

आता पुन्हा 
चालायचे 
कुठे असे 
अन जायचे

जगायचे 
कशासाठी 
उरायचे 
कुणासाठी

अशा प्रश्नास 
नव्हते उत्तर 
नकोच होते 
आणि उत्तर 

तुझे स्वप्न
तुझा भास
मनी होता
तुझा ध्यास

जरी सोडवत 
नव्हते मना
पण थांबणे
होते पुन्हा

अन थांबलो 
तिथेच बसलो 
नंतर नाहीच 
तो मी उरलो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

कोसणे

कोसणे
*****
या माझ्या सरणाऱ्या प्रवासात 
तुझा हात नाही हातात 
हीच खंत आहे उरात 

तसाही पांघरून मी आलो इथे 
भाग्य भणंग हाताचे 
सांडले लवंडले सारे 
जपले मी अंतरी ठेवले 

भाग्य काही कधी 
आलेच होते वाट्याला 
चालताना कुण्या वळणाला 
भेटलीस तू वाटेला 
सरले वळण दिशा बदलल्या 
अपरिहार्य चालणे आपल्या दिशेला 

सुखावतो कधी त्या स्मृतीने 
दुखावतो कधी त्या भेटीने 
कोसतो अन त्या हातांना 
ज्यांनी सोडले तव कविता लिहिणे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...