बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२

जाणे सामोरी


जाणे सामोरी
**********

गीत कोवळ्या ओठांना 
जाळे संसार वेदना 
तीच आठव नकोशी 
गोड सावळ्या डोळ्यांना 

स्वप्न हरवती कुठे 
कुणा सांगता येईना 
दोन पाऊल सुखाची 
कुणा माझी म्हणावेना

मन गुंतवावे कुठे 
आत वळू नच देता 
झूल सुखाची देखण्या 
घ्यावी जगी वावरता 

जग द्वाड हे कुठले
उभे ठाकले छळाया 
साव होऊनीया लुच्चे 
संधी पाहती लुटाया 

मंद दिव्याचा आधार 
तुझा किती टिकणार 
अन  शिणले भागले 
पाय किती चालणार

जिणे थांबते का कधी
जन्म नाकारुन असा
जाणे सामोरे सार्‍याला 
हाच जीवनाचा वसा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.५६१

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२

जाणणे

जाणणे
******

स्वप्न खुळे घडण्याचे
अडविते घडणे रे
माणसाच्या पाठीमागे 
मनाचे या लोढणे रे 

टाकायचे लोढणे हे 
कधी घडतच नाही
टाकायचे यत्न सारे 
सारे लोढणेच होई

कळण्यात लोढण्याला
लोढण्याचा अंत आहे 
घडण्यात घडण्याची 
अन सुरुवात आहे 

जाणणारा जाणतो की
जाणण्यात मुक्ती आहे 
जाणणार्‍या जाणणे
हिच खरी युक्ती आहे 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘



सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

मी आहे


मी आहे
********
मीच आहे मीच आहे 
टक लावूनीया पाहे 

मीच आदि अंती आहे
इथे अन्य कोण आहे 

माझ्या विना जग नाही 
कळण्याला कळताहे 

परी सारी विसरून 
कोण इथे धावताहे 

वेदनात ओढवल्या 
बळेचि रडत आहे 

मी आहे  महाद्वारी या
पडूनिया उगा राहे 

बाप सांगे विक्रांतास
हाती एवढेच आहे


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

भजन

भजन
:****

देवाचे भजन कर म्हणे मन 
रेंगाळून पण जाते हरवून 

आणि मग गाव येताच फिरून
 येता आठवण जाते शरमून 

वाट हरवणे पुन्हा भटकणे
पुन्हा आठवणे घडते घडणे 

हरवते मन भटकते मन 
आठवते मन थांबल्यावाचून 

घडे आवर्तन चालले नर्तन 
विक्रांत थकून दत्ताला शरण

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

बाप मारुती कांबळे

बाप
****

तुझ्या ताटातला घास 
देसी माझिया मुखात 
घेशी ओढून जवळी 
किती मोहिनी डोळ्यात 

तुझ्या ताटाला ही डोळे 
तुझ्या भाताला ही डोळे 
आणि कौतुक मिरवे 
माझे पाहणे आंधळे 

तुझ्या शब्दांचे स्पंदन 
माझे जाणतसे मन 
माझे हरवून मन
तुझे उरावे स्पंदन 

बाप मारुती कांबळे 
दावी ज्ञानाचे सोहळे 
बीज पेरूनिया आत 
शब्दी शब्दांविन खेळे 

देव मांडला मोडला 
तुवा त्यागला पूजला 
देव होऊनिया स्वये
देवपणा नाकारला 

जगी थोर तुझी कीर्ती 
जरी निसर्गदत्त शी 
माझा होऊनिया बाप 
पोट भरवून देशी 

विक्रांत जाहला तुष्ट 
स्वप्न साकारले एक 
जरी सत्य तेही स्वप्न 
एक उरले कौतुक 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

मूळपीठ



मूळपीठ
*******

दत्त तोच हरी.
तोच गणपती 
नाम त्याची मुर्ती 
सनातन ॥

 रूप आवडीचे
नाम आवडीचे
स्मरता तयाचे 
प्रेम वाढे ॥

अन्यथा भेदाचे 
नाहीच ते काम
म्हणा राम राम 
दत्त भजा ॥

तरी तोच दत्त 
होवुनिया राम 
पुरवितो काम 
सकल रे ॥

सदगुरू सांगे 
तेच नाम धर 
शब्द ते ईश्वर 
अन्य नाही ॥

नामानुसंधान
नादानुसंधान
आत्मानुसंधान 
एक तेच ॥

विक्रांता दाविले 
दत्तात्रेये नीट 
भक्तीची हि रित
उकलून ॥

नामची ओंकार
शब्द शब्दातीत
शुद्ध मूळपीठ
मातृकांचे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


दरबार


दरबार
******

भरला होता दरबार बसले होते सरदार 
सत्तेचा आवाज उंच होत होता धारधार 

कधी माणूस तर कधी खुर्ची बोलत होती 
दरबारी सारे जुने गप्प गुमान ऐकत होती 

दरबार्‍यांच्या हाती चाव्या गरगर फिरणाऱ्या 
कोटी कोटी उड्डानाच्या उंच उड्या मारणाऱ्या

सरदाराही माहीत होते दरबारीही जाणत होते  तरीही मान हलवीत जी जी हुजूर म्हणत होते 

सरदाराची मोठी चावी दरबार्‍यांची छोट्या चाव्या काही वेडे पेर त्यात त्यांनी फेकून दिल्या चाव्या

मग त्या आवाज नव्हता वा ऐकला जात नव्हता कानी खणखणाट मोठा कुठे वाहत जात होता

विक्रांत प्यादे एक होऊन खेळ सारा पहात होता अजब दुनिया तुझी दत्ता किती असे म्हणत होता

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

धुनी

धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट  जल गेले हरपून  नील रत्न सागरात परी राहिला ओंड...