रविवार, ३१ जुलै, २०२२

वर्तुळ


वर्तुळ
*****

सुटल्याच अंती साऱ्या व्यर्थ गाठी 
दूरावले धागे गेले ताटातुटी ॥

तुला दोष नाही तुझा द्वेष नाही 
झाला अपघात पण गुन्हा नाही ॥

विझल्या मनाचे जग एकट्याचे
एकटे वाहणे ओझे जीवनाचे ॥

तुझे जग तुला आता माझे मला 
भेदल्या वाचुनी वर्तुळ वर्तुळा ॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.
529

शनिवार, ३० जुलै, २०२२

रिते डोह


रिते डोह
*******

तुझी गाणी
झाली जुनी
कोमेजल्या 
फुलावानी

रंग नाही 
गंध नाही 
विझलेले 
स्वप्न काही

तरी जीव 
तुटतोच
देठ उरी
रुततोच 

कातरश्या
संध्याकाळी 
काही शब्द 
ओठावरी 

नको तरी
आठवती 
रिते डोह
उपसती 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.


गुरू त्वा केला


गुरू त्वा केला
*********

मंत्र घेतला गुरु त्वा केला 
धोंडा ठेवला आरक्षणाला ॥

खुण ठेवली रांग लावली 
जरी न आली आपली पाळी ॥

चाले संसार हा व्यवहार 
पाय ठेवला  दो दगडावर ॥

तशी ती घाई तुजला नाही 
तरीही असे गळा माळही ॥

त्यावर तुझी भली वकीली 
ऐकून बुद्धी थक्क जाहली ॥

"मोक्ष असेल वा नसेलही
स्वर्ग दिसेल न दिसेलही॥

कुणा ठावुक कुणी पाहीला 
असला तर वांदा कशाला ॥

रिस्क कशाला हवी घ्यायला 
गुरुदेव तो असो हाताला " ॥


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘५२७

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

गुह्य


गुह्य
****

दत्त काय कुणा देत असतो रे 
दत्त कुणाचे का घेत असतो रे ॥

दत्त फक्त उभा दत्त असतो रे 
सरताच मळ प्रेमे भेटतो रे ॥

फळते प्रारब्ध कर्म ही फळते 
रुजते सजते बहरून येते ॥

त्याचे देणे घेणे नसते दत्ताला 
पाप पुण्य सारा मायेचा पसारा ॥

पाप अन पुण्य बाजूला सारतो 
असून नसणे तेथे उगवतो ॥

सुखानंद कंद तयाला भेटतो 
कृपा कर गुह्य विक्रांता सांगतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

गुरुवार, २८ जुलै, २०२२

नावापुरता

नावापुरता
*******
काही मोहर लगेच गळतात 
हिव येताच देठ तुटतात 

म्हणून वृक्ष का रडत बसतो 
माझे म्हणत आक्रोश करतो 

समोर येई ते  हरवत असते
जीवन पुढती जातच राहते 

नव्या दिसाचे नवीन आकाश
नव्या दिशा अन नवीन प्रकाश

जीवन फक्त आताच असते
जयास दिसते तयास कळते

त्या कळण्याला शरण गेला 
नावा पुरताच विक्रांत उरला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘५☘☘२☘☘.४

बुधवार, २७ जुलै, २०२२

डॉ.प्रदीप

***********************************

डॉ.प्रदिप आंग्रे
************

अनंत उर्जेचे भांडार 
पांघरून तनमनावर 
वावरत असतो प्रदीप 
बारा महीने अष्टौप्रहर 

आणि तळपत असतो 
एखाद्या सूर्या सारखा 
आपल्या आवडत्या
कर्तव्य कर्मभूमीवर

प्रदीप एक विलक्षण 
व्यक्तिमत्व आहे.
तो असतो 
मैत्रीसाठी सदैव तत्पर  
यारांचाही होवून यार
जीवास जीव देतो

तो असतो 
कर्तव्य दक्ष अधिकारी
वरिष्ठांना सदैव प्रिय असणारा
निष्ठा ,स्पष्टता कष्टाळूपणा
अंगभुत गुण असलेला .

तो असतो 
फॅमिली मेंबर 
आपल्या टिमचा 
बाप भाऊ मित्र होवून 
काळजी घेणारा

तो असतो 
आपल्या मताशी ठाम 
सहसा न बदलणारा
पण पटताच दुसर्‍यांची मते
ती  स्विकारणारा
त्यांना आदर देणारा
अॅ डमिनिस्ट्रेटर

अन कुणी वाकड्यात शिरले तर
त्याला पुरून  उरणारा
रांगडा शूर धुर्त लढवय्या ही

तौ देत असतो
परिचितांस गरजुंना
सदैव आधार
सावली देणार्‍या
वट वृक्षागत 

तो आहे
कधीही धाव घेणारे
माणुसकीचे भांडार

त्याला आपल्या यशाचा 
अभिमान आहे, पण माज नाही.
सुबत्तेच्या सुखामागील
कष्टाचे भान आहे.
अन भोगलेल्या
गरिबीची जाण आहे .

तो आहे एक हळवा
कुटुंबंवत्सल  पिता 
आपल्या मुलींच्या अभ्यासा पासून
बारिक सारिक मागण्या
न विसरता ,न कंटाळता 
पूर्ण करणारा
त्यांच्या प्रगतीकडे बारीक लक्ष देणारा 
त्यांचं भवितव्य घडविणारा

तो आहे 
एक परफेक्ट पति
दिवसभर कामावरून 
थकून आल्यावरही 
येता येतात सहजच
घरी भाजी नेणारा 
वा बाजारात खरेदीसाठी
परत जाणारा .
दिवाळी गणपती पाडवा
मनापासून साजरी करणारा
उत्साहाचीच मुर्ती .

त्याचे बोलणे असते
सदैव स्पष्ट मोकळे ठाम
त्याचा आवाज 
एखाद्या बुलंद तोफे सारखा .
अंतर्विरोध नसलेला
जणू काही त्याच्या 
स्वभावाचेच प्रतीकच 

कधी कधी या जगात यश 
सहज असे चालत  येतें
तर कुणाला  ते मिळवावे लागते 
खूप प्रयासाने 
त्यांच्यासाठी ते कष्टसाध्य असते 
प्रदीप हा त्या दुसऱ्या लोकांमध्ये मोडतो 
त्याने जे यश मिळवले आहे
ते संपूर्णतः त्याचे स्वअर्जित आहे 

प्रत्येक पायरी खोदत खोदत 
त्यावर आपले नाव लिहित 
तो गेला आहे वर वर चढत 
यशाच्या शिखरावर

प्रदिपने आरोग्य केंद्र सांभाळले 
ओपडी  अन कॅज्युल्टी सांभाळली
वार्ड सुद्धा सांभाळले
तसेच ॲडमिनिस्ट्रेशनच्या पोस्टवर बसून
मोठमोठी रुग्णालये सुद्धा सांभाळली
अहो, 
ती कुर्ला भाभा आणि बीडीबीए रुग्णालये
जणू काही मधमाशांची पोळीच आहेत
त्यातील राणीमाशी ती सकट सांभाळणे 
हे फारच अवघड काम होते
ते त्यांनी सहजपणे केले 

आपल्या आयुष्यातील 
प्रत्येक पायरीवर प्रत्येक माचीवर 
प्रत्येक शिखरावर 
त्यांनी आपल्या नावाचा 
ठसा उमटवला आहे
कीर्तीचे झेंडा रोवला आहे 
इतकी शक्ती इतकी निष्ठा इतके समर्पण 
क्वचित कुणाकडे असते 

त्यामुळे त्यांनी कोंविड सेंटर 
समर्थपणे सांभाळले 
यात नवल ते काय 
संपूर्ण मुन्सिपालटी ही
समर्थपणे सांभाळली असती
त्यात मला तरी 
मुळीच संशय वाटत नाही

त्याने माणसे पारखली 
जवळ केली सांभाळली 
वापरली आणि जपली सुद्धा 

त्याचे आरपार बोलणे 
परिस्थितिनुसार वागणे 
होमवर्क करणे
कामात झोकून देणे 
केलेल्या कष्टाचे कागदावर आणि 
प्रत्यक्षात मुर्त होताना दाखवणे
हे त्याच्या यशाचे गमक आहे 

खरंतर प्रदिप सारखी माणसं
कधीच रिटायर  होत नसतात 
होऊ शकत नाहीत 
बदलते ते फक्त त्यांचे कार्यक्षेत्र 
जणू तेही त्यांची वाटच पाहत असते
त्यामुळे प्रदीपला 
त्याला हव्या असलेल्या क्षेत्रात 
नवीन जगात नवीन यश शिखरे 
पादांक्रांत करायला
अनेकोनेक शुभेच्छा मी देतो.


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.

मंगळवार, २६ जुलै, २०२२

भगवती


भगवती
******

श्यामला कोमला रुद्रायै कमला 
चिन्मयी मृण्मयी आराध्ये सकला 

उदारे विशुद्धे सदोदित सिद्धे 
रक्षसी आपदे सदैव भक्ती दे

कल्याणी श्रीमणी विश्वाची जननी 
निजभक्त दासा सौख्याची कहाणी

माता भगवती वस मम चित्ती 
तुजविण मज नच अन्य गती 

शुभांगी दिव्यांगी शिवांगी अर्धांगी 
विश्व नाट्य लीला करशी निजांगी

हर्षित अर्पित तव पदावरी
विक्रांत सुमन जीवन स्वीकारी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘.५२२

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...