रविवार, २४ जुलै, २०२२

सांभाळले दत्ता


सांभाळले दत्ता 
*************

सांभाळले दत्ता 
जसे आजवरी 
तसेच सांभाळी 
या पुढती ॥१

फार काही तुज
मागितले नाही 
चालवले देही 
प्रारब्धात ॥२

परि संकटात 
मागे तुला हात 
तुझिया दारात 
आलो सदा ॥३

असेल दयाळा
लांच्छन भक्तीला 
वेच ही पुण्याला 
जमविल्या॥४

ठेच लागे मन 
माय आठवते 
पित्याला स्मरते 
संकटात ॥५

मात तात तूच 
माझी दयाघना 
करीशी करुणा 
सदोदित ॥६

म्हणून पायाशी 
सतत निर्धास्त 
राहूनी विक्रांत 
जगे जिणे ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com .
☘☘☘☘☘

शनिवार, २३ जुलै, २०२२

निस्पंदता


निस्पंदता
********

मन शांत शांत 
अन आकांक्षा 
शिशिरात वितळलेल्या 
निरभ्र आकाशागत

या क्षणी तरी 
माझे काहीतरी होणे 
आणि मी कुठेतरी पोहोचणे 
या अट्टाहासाचा 
झालेला अंत 
साऱ्या चाकोरीचा 
आलेला उबग
आता नाही त्रास देत 

होय हे खरे आहे 
पुन्हा वारा येईल 
पुन्हा लहरी येतील 
विचार विकार आवडनिवड 
एका मागून एक येत 
हरवेल ही निस्पंदता 

पण या क्षणाच्या
नितळ चांदण्यात 
मी मला आहे गवसत 
चांदण्यात विरघळत हरवत 
शब्दा सकट

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, २१ जुलै, २०२२

मिराशी


मिराशी
*******

मिरवतो मीच माझीही मिराशी 
महापुण्यराशी दत्त भक्ती ॥

येता-जाता दत्त म्हणे उच्च रवे
जनास ते दावे सुख माझे ॥

जळू देत कुणी हसू देत कुणी
म्हणू देत कुणी काहीबाही ॥

व्यर्थ हि संपत्ती पार्थिव जगती
परी महानिधी भोगतो मी ॥

सुखाचे हे लोट मावेना अंतरी 
कातळा उकळी निर्झराची ॥

भरुनी ओंजळी शब्द फुले फळे 
जगती उधळे विक्रांत हा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २० जुलै, २०२२

गैरसमज


गैर समज
********

माझ्या कविता वाचून 
समजू नकोस की 
मी प्रेमात आहे 
तुझ्या अजून 

हे तर शब्दांचं इमान 
मी ठेवलं आहे राखून 

खरंतर तसं तुझं येणं  अन जाणं 
शब्दांना मिळाले होते एक कारण 
यायला उमलून 

पाऊस पडणं 
टाकी फुटणं 
वा कुणी पाणी घालणं 
ओलाव्याला लागतेच 
काही कारण 

ते घडून गेले की 
बीज जाते रुजून 
आणि रोप येथे उगवून 
फुलं फुलतच राहतात 
कविता उमलतच राहतात 
एका मागून एक 
जीवनाचं सत्व 
शब्दात ओतून 
स्मृतीचा दरवळ 
स्वतःत भरून 

अन ती ओल 
तिलाही अंत आहे 
कदाचित तोवर 
येईल ही दुसरा ऋतू 
दुसरा पानाडी 
कुठल्यातरी टाकीचं
होईलही
अपघाती फुटणं 

कारण कालचक्र 
अनंत आहे 
आणि हे जीवनही
या कवितातेत 
गुफटलेले.


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, १८ जुलै, २०२२

प्रयोजन


प्रयोजन
*******

विस्मृतीच्या क्षितिजावर आता तू 
एखाद्या दूरवर जाणाऱ्या 
जहाजाच्या डोलकाठीगत
क्षणात दिसतेस क्षणात हरवतेस

आता आताच होती इथे किनाऱ्याला 
पाहता पाहता गेली दूर क्षितिजाला 

तुझे जाणे अपेक्षितच होते
कारण तू आहेस  एक जलपरी 
एक स्वप्नांचे गलबत 
पाठीवर आकांक्षाचे ओझे
घेऊन निघालेले जीवन 

आणि मी इथे 
या शिळेवर गोठलेला बांधलेला 
एक दीपस्तंभ 
आकाशात डोके खुपसून
लाटांमध्ये  पाय सोडून
पाहतो आहे तुला सदैव 

कधी येशील न येशील 
कधी पाहशील न पाहशील 

लाटांच्या नर्तनात 
वार्‍याच्या हेलकाव्यात 
सुखाच्या साम्राज्यात 
राहशील नाचत 
मग्न आपल्याच विश्वात 
सागारातील प्रवाहात
प्रवाळात शिंपल्यात
रंगीबेरंगी मासोळ्यात
निळ्या पांढर्‍या पक्ष्यात
दूरदूरच्या विश्वात

पण कधीतरी वादळात 
आठवशील मला तू 
किनार्‍याचे स्थैर्य 
मागशील मला तू 
संकटात घडीभर 
येशील माझ्याकडे तू
तेवढेही सौख्य पुरे आहे मला 

अन नाही आले वादळ तरीही
मी तुझ्यासाठीच इथे आहे 
हे मला पक्के ठावुक आहे 
अन माझ्या असण्याचे 
प्रयोजन तू असावीस
याहून मोठे भाग्य ते कुठले 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, १७ जुलै, २०२२

प्रेम



प्रेम
*****
धरतीच्या भेटी मेघ आसुसले 
सर्वस्व सांडले मग त्यांनी ॥१

नाव न उरले गाव न उरले 
एकरूप झाले तन मन ॥२

थेंबथेंबातून प्रेमाची कहाणी 
येई ओघळूनी ओली चिंब ॥३

असेच असते प्रेम खरेखुरे 
व्यवहार सारे बाकी व्यर्थ ॥४

राधाकृष्ण जरी नाव असे दोन 
एकएकाहून  भिन्न नाही ॥५

विक्रांत घेऊन राधा हृदयात 
कृष्ण डोळीयात साठवतो ॥६

शनिवार, १६ जुलै, २०२२

संकष्टी


संकष्टी
*******

धावतो संकटी देव गजानन 
मुषक वाहन लंबोदर ॥१

म्हणून शोभते नाव विघ्नराज 
साकारती काज पूर्ण तेथे ॥२

शरणागताला रोकडी प्रचिती 
देई गणपती निसंशय:॥३

विक्रांत दिधली देवे ऐसी खूण
हृदय भरून आले मग ॥४

तयाच्या प्रेमाचे स्मरण संकष्टी 
आचरतो व्रती म्हणुनिया॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...