शुक्रवार, १० जून, २०२२

ठिणग्यांची बीजे

ठिणग्यांची बीजे 
*************
आता आता जिझसही 
मला खुपू लागलाय
काय माझ्या रक्ताचा 
रंग एवढा भगवा झालाय

होय हे मन होते 
थोडे हिरवे
होय ते स्वप्न होते
शुभ्र पांढरे 
पण कोणी केलेले प्रहार 
जेव्हा कळू लागले 
वेदनांची शूळ 
जन्मापार जाऊ लागले 
कुणी लिहिल्या बखरीचे 
खोटे रंग कळू लागले  
एक अनाम दुःख माझ्या
आत भळभळू लागले 

बुरुज बांधून मन माझे 
संगीन घेऊन उभे राहिले 
मान्य मला बंधुत्व जगी
सौख्य पाहिजे नांदले 
अरे पण घर पाहिजे 
आपले आधी राखले 

आता पुन्हा नको 
ते अब्रूचे धिंडवडे 
टिचभर पोटासाठी 
उगा बाटवून घेणे 
लेकीबाळी बहिणींचे
बुरख्यात दफन होणे 
साला मै तो 
साब बन गया 
म्हणत मिरवत
भावाच्याच ढुंगणावर 
उद्दाम लाथा मारणे 
आपले नाही साधू म्हणून
क्रूरपणे ठार करणे

खरंच रंग माझा रक्ताचा 
आता बदललाय 
जळले रक्त बिंदू असंख्य 
आक्रोशाचा जाळ झालाय 

त्या लखलखित ज्वाला
मागतात आहुती  
माझ्या शब्दांची 
कळलेल्या प्रकाशाची  
ठिणग्याची बीजे 
प्रज्वलित करण्यासाठी .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

गुरुवार, ९ जून, २०२२

रस्तावर

रस्त्यावर
*****
तेच मन. .   
तीच भणभण 
कानात कोंबलेले . .
तेच इयरफोन 
युट्युबवरती अन . .
तेच गाणं 

तोच भाजीवाला 
रस्त्यावर विकत 
चाललेला ओरडत 
न संपणाऱ्या 
भाजीला खेचत 

उभ्या सिग्नलला 
चेहरे नसलेल्या .
सुंदर श्रीमंत 
विशाल गाड्या 
थोड्या बाजूला 
रस्त्याच्या कडेला 
जळक्या काड्या 
विझल्या विड्या 

धुर झरत होता
छाती भरत होता 
वाढणारा रस्ता 
वृक्ष गिळत होता 
अन कावळा 
उरलासुरला 
कुठली गाडी 
फेकतेय पिझ्झा 
डोळा ठेवून होता 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


बुधवार, ८ जून, २०२२

आकाश

 आकाश
********
आकाश  पसरलेले 
गर्द निळे  अथांग गहन  
अंत नसलेले 
कधीचे कुणाचे कशाचे
होवून प्रश्न न सुटलेले

अन मी !
एक बुडबुडा साक्षीचा 
होऊन डोळा प्रकाशाचा 
उंच फेकला गेला गोळा 
कुण्या अज्ञात आयुष्याचा 
न जाणता कसला कशाचा 

म्हटले तर होतो .
म्हटले तर नव्हतो 
पण माझ्यावाचून 
दुजा कोण असतो 
जगताला 
जाणणारा 
आणि
जन्म देणारा
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

स्वप्न




अकस्मात हाती आले.
देखणेच स्वप्न होते 
स्पर्शताच ओघळले
स्वप्न अंती स्वप्न होते 

काय सांगू जग माझे 
तेच परी नवे होते 
तेच शब्द तेच ओठ
नवे परी गीत होते 

किती असे ऋणाईत 
वेल्हाळ मी त्या क्षणांचा 
स्पर्श मज झाला असे 
मुग्ध आज जीवनाचा 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रस ग्रहण


कवितेचे रसग्रहण . मनोगत
दुसऱ्या कोणत्याही कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे आपल्या चष्म्यातून त्याचे जग पाहणे असते . ते पाहणे आपल्या कलाने आपल्या मूडप्रमाणे  आपल्या दर्शना प्रमाणे घडत असते . कधी कधी ते दर्शन , ते पहाणे , ते   रसग्रहण कवितेपेक्षा सुंदर होते .
रसग्रहण करताना एकतर ती कविता आपल्याला आवडावी लागते किंवा बर्‍याचदा तो कवी आपला आवडता असावा लागतो.त्याच्या शब्दांशी भावनांशी आपण बांधले गेलेले असतो .
तर कधी ती लेखनस्फुर्ती लिहायाल‍ा भाग पाडते.

कधी कधी कविता आापल्याला आवडते पण तिचे रसग्रहण  करता येत नाही . त्या कवितेचे आपल्या मनात पडलेले अव्यक्त प्रतिबिंबच आपल्याला आवडते किंवा त्या अव्यक्त प्रतिबिंबा मध्येच गुंगून राहणे आपल्याला पसंत असते . अन ते रसग्रहण करणे म्हणजे परीक्षेला बसणे असे वाटते.

कधी कधी एकाच कवितेमध्ये अनेक अर्थ दडलेले असतात .ते शोधून काढणे मोठे गमतीचे आणि आनंदाची गोष्ट असते. एक प्रकारचा आनंदाचा खेळ असतो .पुन्हा एकदा सांगायचे म्हणजे सगळेच खेळ सगळ्यांना आवडतात असे नाही .

आता माझ्या कवितेबद्दल बोलायचे झाले तर
आसावरी ताईंनी या कवितेतील पहिला स्वर  पकडला तो अकार
स्वाती ताईंनी त्याच्यामध्ये उकार मिसळला तर रेखाताईं नी सुंदर दिर्घ मकार लावून कवितेला ओमकार रुपी प्रशस्ती दिली आहे. 
खरेच रेखाताईंनी तिचे फार सविस्तर सु्ंदर रसग्रहण केले आहे.  

आता या माझ्या कविते बद्दल मी थोडे बोलतो. 
या कवितेमध्ये मी तीन रूपक घेतली आहेत त्यापैकी पहिले रूपक आसावरी  त्यांनी त्वरित ओळखले स्वातीताई अन रेखाताईनी ते उलगडले

तर या कवितेचा पहिला अर्थ उलगडलेला आहे तो कविता आणि कवी यांच्यामधील नात्याचा. त्यांनी त्यास  अचूकतेने पकडले आहे . ते शब्द सुचणे न सुचणे शब्द सूचूनही कवितेमध्ये न बसणे किंवा अर्थ ध्वनी व्यक्त न होणे अशा प्रकारचे कविते मधील तळमळणे आपण सर्वांनीच अनुभवले असेल .

कवितेमधील दुसरा अर्थ आहे तो आहे प्रियकराने आपल्या प्रियेला जाणण्याचा केलेला प्रयत्न .
 स्त्री कधीच कोणाला कळत नाही हे एक सत्य आहे .ती एक अगम्य अनोखी अप्रतिम अदा (वस्तु म्हणणे बरे वाटत नाही) परमेश्‍वराने निर्माण केली आहे . तरीही ती कळावी, आत्मसात व्हावी ,आपण तिच्या जगण्याशी तिच्या मनाशी तिच्या भावनेशी एकरूप व्हावे ही एक नैसर्गिक  प्रवृत्ती पुरुषा मध्ये असते, ती येथे व्यक्त होते. , मला वाटते तो एक अपूर्णातून पूर्णत्वाकडे जाणारा ध्यास असतो. एक अस्थैर्यतून स्थैर्याकडे घडणारा प्रवास असतो.

कवितेमध्ये आणखीन एक रूपक दडलेले आहे ते रूपक आहे योग्याच्या शरीरात जेव्हा कुंडलिनी शक्ती, ती जगदंबा जागृत होते त्यावेळेला त्याला होणाऱ्या अनुभवाचे प्रतिबिंब या कवितेमध्ये पडलेले दिसते .कधी या कुंडलीनी शक्तीचा आवेग हा तीव्र असते की ती त्याला  झोडपून टाकते .तर कधी ती जाणवतही नाही .मनाच्या ही पलीकडे जाण्याअगोदर मनाचा त्या शक्तीशी जो अभिसार होतो खेळ होत असतो  त्या खेळात रंगात नटलेली ही कविता आहे .

सना यांनी आग्रहाने  मला काविता द्यायला लावली .माझी टाळाटाळ धुडकावून लावली.त्या बद्दल धन्यवाद .
पुन्हा एकदा सर्वांचे आभार .

असे कसे म्हणू
***********

जर का तू अजूनही
सापडली नाहीस मला
तर तू हरवली आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥

जर का तू अजूनही
दिसलीच नाहीस मला 
तर तू कळली आहेस 
असे कसे म्हणू मी तुला॥

तुझे सोनसळी लावण्य 
अन उर्जेचे अवतरण
मजला जाणवत नाही 
असे कसे म्हणू मी तुला॥

एक अनाकलनिय 
गुढ तरीही हवे हवेसे
अनूभुतीचे जग नकोय
असे कसे म्हणू मी तुला॥

येण्या जाण्याचे सारेच
स्वातंत्र्य आहे तुला
तू बेपर्वा चंचल आहेस
असे कसे म्हणू मी तुला॥

शक्ती वृती जगण्याची 
आस प्यास ह्रदयाची
तुुला विसरून जगावे
असे कसे म्हणू मी तुला॥

स्वप्नांचा देश दाखवते 
सुखाची सावली होते
तुझी प्रतिक्षा सुंदर नाही
असे कसे म्हणू मी तुला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘





ती

ती
********

लखलखत्या डोळ्यात 
स्वप्न सोनियाचे
स्मित  मोगऱ्याचे धुंद
जणु चांदण्याचे

अर्थ मागणारे धीट
ओठ  प्रश्नकारी 
वेड पांघरले त्याचे
शब्द वाऱ्यावरी 

रंग  उधळले कुणी
गूढ संध्याकाळी
मिटणाऱ्या क्षितिजाचे
स्वप्न हे अवेळी

एकटेच यमुनेला
कुणाचे असणे
सभोवार उधळले
चांदण्याचे गाणे 

ओंजलीत प्रकाशाचे
किती कवडसे 
हरखला जीव तरी
कुणा द्यावे कसे ?

जगण्याचा डाव झाला
खेळणेच आता 
हरणे जिंकण्याचा
प्रश्नच नव्हता

तिच्यातील तोच जरी 
रुपडे बाहेरी 
तिची मूर्त बाहुतली
तयाच्या अंतरी


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘






सोमवार, ६ जून, २०२२

त्याची आई

 त्याची आई
**********
आपल्या बापाच्या 
मृत्यूनंतर 
आपली आई  गेली पळून
सर्व पैसे घेऊन 
कुणाचातरी हात धरून 

हे सांगताना 
तो वरमला नाही 
त्याने नाही केली 
आईची नालस्तीही  

तो सांगत होता 
आपल्या आर्थिक 
आपत्ती ची कारणे 
कदाचित ती घटना 
झाली होती एक 
सामान्य घटना ...
त्याच्या आयुष्यातील 
आणखी एक दुर्घटना 

तो धरून चार भावंडे 
ती कशी जगली 
कशी वाढली 
हे विचारायचे धाडस 
नाही केले मी 

दुर्धर आजाराने 
कोसळलेला डोलारा 
सावरता सावरता 
तो जगत होता 
तो पडला होता 
जखमी झाला होता 
पण हरला नव्हता 

ताकत तर माझ्यातही नव्हती 
त्यातून त्याला बाहेर काढायची 

पण ती त्याची कहाणी 
तो संदर्भ 
इतका खोल रुतला माझ्यात 
की मातृत्वाची दिव्य स्वरूप .
माझ्या समोरून गेले तडकत 
काय गुदरले असेल त्याच्यावर 
कल्पनाच नव्हती करवत 

आणि सहज जगजाहीरपणे 
तो ही का असेल सांगत .
 हे सगळे
जग  त्याच्याकडे 
चमत्कारिक नजरेने 
असता पहात  

का हेच असेल औषध 
त्याच्या व्यथेचे वेदनेचे 
उघडे करणे हे घाव दुःखाचे ?
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...