गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

चळणे

चळते
******

बुद्धी का चळते
मन का मळते 
कुणास कळते 
काय कधी ॥१

कधी विश्वामित्र 
कधी पराशर 
तपस्वी हे थोर 
घसरती  ॥२

तेथे कुणाचा रे
लागतो ना पार 
भय हे अपार 
भक्ताठायी ॥३

धरून हाताला 
चकवा चुकवा  
मार्गाधारे लावा 
साधनेच्या ॥४

तरी तो तरेल 
यातून सुटेल 
तुजला भेटेल 
दयाघना ॥५

देऊन सुकाणू 
प्रभू दत्ता हाती 
विक्रांत वाहती 
नाव झाला ॥६

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

शिणलो

शिणलो
******

भक्तीच्या वाटा 
शिणलो बहुत
जहाले न प्राप्त 
परी काही ॥
असेल तो देव 
दिसेल तो देव
केली उठाठेव 
वाया गेली ॥
कैसे नि दैवत 
प्रसन्न त्वरित
म्हणूनिया वाट 
पाहिली म्या ॥
कुणा काय देऊ 
उगाचच दोष 
मन मज वश
झाले नाही ॥
दत्ता चालो तुझा 
थोर कारभार 
संसाराचा भार 
वाहतो मी ॥
विक्रांत सोडली 
अवघीच आशा  
अध्यात्माचा गाशा 
गुंडाळतो ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

मनाचे रंजन


मनाचे रंजन 
*********:

मनाचे रंजन 
थांबता थांबेना 
भले ते कळेना 
काही केल्या ॥

संगीतात मग्न 
नाटकात दंग 
पाहातसे रंग 
भावनांचे ॥

कुणाच्या सुखात 
कुणाच्या दुःखात 
कुणाच्या हास्यात 
रममान ॥

कधी काही खोटे 
कधी काही खरे 
चित्रबद्ध सारे 
जुने क्षण ॥

भोगते ते मन 
आता समजून 
राहते गुंतून 
सर्वकाळ ॥

येणे काय होई 
हा तो क्षण जाई
दाटलेला राही
मनी तम ॥

दत्ता दे रे मन 
सजग करून 
विक्रांत शरण 
म्हणुनिया ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

शोध

शोध
****

श्रेयाच्या शोधात चालतांना 
जगण्याचे इप्सित गाठतांना 
श्वासात श्वास असे तोवर 
आकाशपाताळ एक कर 
पालथ्या घाल दाही दिशा 
विसरून जा दिवस निशा 

ध्येयासाठी जग हवे तर 
ध्येयासाठी मर हवे तर 
लाखो येतात अन जातात 
कशास भर घालतोस त्यात

ही वाट एकटी चालतांना 
आसक्ती मागे खेचत असतांना 
कधीच मागे फिरू नकोस 
कुठे कुणास्तव थांबू नकोस 

मुक्कामा जागा नसेल तर 
खुशाल रहा उघड्यावर
पोटाला अन्न असेल तर 
पाण्यावर गुजरान कर 

निजाया वाकळ नसेल तर 
ही भूमी अंथरून घे 
पांघराया चादर नसेल तर 
हे नभ पांघरून घे 

तिथे सुख असणार नाही 
मानसन्मान मिळणार नाही 
अपमान होतील पदापदावर 
चोर समजून बसेल मार
तेव्हा याद येईल घर
धन सुरक्षा जीवलग यार 
सारे म्हणतील मागे फिर 
कर्तव्याचे अन पालन कर 

तरीही त्यास ठकू नकोस 
वाट घेतली चुकू नकोस 
शोधतांना मरण आले तर 
अरे माघारीहून तेही बरं

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

हाकारे


हाकारे
******

वाहतोय ओझे 
मीच अरे माझे 
कशाला जगाचे 
उगा घेऊ ॥

बुडुनिया जळा 
वृक्ष वठलेला 
साहावे ना मुळा 
सुख ऐसे ॥

गळलेली पाने 
ओघळली साल 
फांद्याचा केवळ 
सांगाडा तो ॥

घालुनि शपथा 
बधेनाच दत्त 
वाजवणे फक्त 
टाळ हाती ॥

जन्मःहा कुटतो 
बधिरची होतो 
आणिक मरतो 
एक दिसी ॥

विक्रांत बोकांडी 
मरणाचा फासा 
सुटण्याची आशा 
क्षीण वाटे ॥

म्हणुनिया दत्ता 
तुज जागवतो 
हाकारे घालतो 
पुन्हा पुन्हा ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

स्फुरण

स्फुरण
*****

माझिया स्फुरणी 
विश्वाची आटणी 
करून गुरूंनी 
दावियले  ॥

विश्वाचा आकार 
दिसता दिसेना 
मनास कळेना 
कोण मी रे॥

आता कुठे जावे 
काय ते करावे 
आण ना सहावे
दुजेपणी ॥

क्षणात घडते 
क्षणात मोडते 
लहर चालते 
विश्वाची या ॥

अहो जे नाही ते 
आहेसे कळते 
जसे की चालते 
जली जली ॥

कोण हे करतो 
कशास वाहतो
विक्रांत जाणतो 
तरी नाही ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

दत्त वजा

दत्त वजा
*****

शब्दशब्दांच्या पार
दत्त असे विराजित 
नच येत कधी कुण्या
मन बुद्धीच्या सीमेत ॥

जरी अपारअसीम 
प्रेमरज्जूने बधतो 
भावबळे स्नेह बळे 
मग हृदयी राहतो ॥

दत्त अनंत आकाश 
शब्द गिळुनि प्रचंड 
काळ ग्रासतो क्षणात
शून्य होवून ब्रम्हांड

वेडे पाखरू मग हे
कसे धरेल पंखात
देतो झोकून तयात
अन स्तवितो शब्दात

अर्थ वजा शब्द जसा
शब्द शब्दच नसतो  
दत्त वजा विक्रांत हा
नच विक्रांत असतो  


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...