रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

फुलबाजी


फुलबाजी
********* 

मी माझा आकार 
मी माझा विचार 
फिरे चक्राकार 
फुलबाजी ॥

दिसते रिंगण
नसते रिंगण 
नाचे  बालपण 
आनंदाने ॥

सरते ज्वलन 
इंधन संपून   
आणिक जीवन 
भास तो ही ॥

नवीन काडीला 
नवी आग फुले 
आणि खेळातले 
नवे पण ॥

विक्रांत हा नाही 
विक्रांत तो नाही 
पाहणेच पाही
पाहण्याला  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

शब्दखेळ


शब्दखेळ
****

दत्ता  तुझिया दारात  
खेळ शब्दांचा मांडला 
तया वाचून रे अन्य 
काही येत न मजला ॥

शब्द जलाने दयाळा 
तुजला स्नान घातले 
शब्द धूत पंचा घेत 
जल उरले टिपले ॥

शब्दगंध केशरी ते
भाळी दुबोट रेखिले 
शब्द वस्त्र रेशमी हे
रूपा सगुणा वेढीले ॥

शब्दफुले वाहुनिया
शब्ददीप पाजळले 
शब्द धुपाने सखया 
दत्ता तुज ओवाळले ॥

शब्द हिना गंध धुंद 
तव प्रेमे मी लावले 
देह शब्द झाला सारा 
नमिता दत्त रूप आले ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

कृपा सद्गुरूंची


कृपा सद्गुरूंची 
***********

कृपा सद्गुरूंची 
असे आषाढाची
भरल्या नभाची
ओतप्रोत ॥

कोसळे अपार 
जणू धुवाधार  
साऱ्या जगावर 
अहेतूक ॥

वृक्ष वेली तृण 
संतृप्त होऊन 
जाती बहरून 
उल्हासात  ॥

पशु पक्षी मीन 
सुखे नादावून 
साजरे जीवन 
करताती ॥

विक्रांत सुखाचा
जहाला प्रपात 
नवीन क्षणात 
हर एका ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

दत्त भगवंत

दत्त भगवंत
*********

अनादि अनंत 
दत्त भगवंत 
सर्व हृदयात 
वास जरी ॥

शोधून दिसेना 
भजून मिळेना 
सहजी कळेना 
आदेश तो  ॥

व्यापतो जगाला 
व्यापतो कणाला 
हरेक मनाला 
सुखावतो ॥

गोवून रूपात
घालून नामात
बळे त्या विश्वात 
आणियले

जरी का राहतो 
शब्दाच्या अतीत 
तेवतो सतत 
आत्मरुपी ॥

विक्रांत अंतरी 
घालतसे उडी 
पाहे घडी घडी 
रूप त्याचे

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

गिरनार

गिरनार 
*******
तेच शिखर डोळ्यात 
तीच पावुले ह्रदयात
तीच धुनी कणकणात 
जळते आहे॥

तेच आकाश अफाट 
तोच वारा बेफाट
तेच चित्त चाकाट 
स्तंभित आहे॥

तोच गंध चाफ़्याचा 
तोच स्पर्श धुक्याचा 
तोच अश्रु सुखाचा 
ओघळत आहे॥

तोच विक्रांत इथला 
तोच अजून तिथला 
त्याच उभ्या कड्याला
बिलगून आहे ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

चातक


चातक
******

डोळ्यात चातकाचे मी
सजवून स्वप्न वेडे 
आलो सोडवत तेच
अशक्य अप्राप्य कोडे 

सूरवात ना जयाला 
नच अंत ठरलेला 
पुन:पुन्हा वलयात 
जन्म त्याच का पडला 

धुक्यात गडद गर्द 
पदरव कुणाचे हे ?
जे दूर दूर से जाता 
हृदयी कल्लोळ का हे ?

असेच पडती बंध
मज ठाऊक नव्हते 
रुपते खुपते खोल 
मी फक्त ऐकले होते 

तू ये ना बघ एकदा
वांच्छेत जन्म थांबला 
हा पक्षी पथ चुकला 
पंखात सांज दाटला 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

मीपण

मीपण
******
माझ्या मनातील 
मी पण उघडे 
जोडून तुकडे 
उगा वाढे ॥

होतो रे आताच 
जरी का वाटते 
तेव्हा ते नसते 
असणेही॥

घडल्या कृतीत 
नसे करणारा 
येई अवतारा 
नंतर तो ॥

आणिक येताच 
मागील क्षणाला 
म्हणतो आपला 
कर्तेपणी ॥

कृती हीच कर्ता 
असे खरे तर  
म्हणा हवे तर 
नसे कर्ता ॥

परी सरताच
त्याचे भान येते
अन चालू होते
मनोराज्य ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...