रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

कोविड अपेक्षाभंग

😂
😃😄
😬😬😬
😅😅😅😅
😋😋😋😜😝

कोविड आला आणि 
सवे भीती घेऊन आला 
त्याचबरोबर थोडीशी 
आशा ही घेऊन आला 
की आता कदाचित 
काही नको असलेली धेंड सोंग 
आपोआप नाहीशी होतील म्हणून 
पण झाले भलतेच 
ढेंड आणि सोंग शाबूत राहीली
आणि भलतीच विकेट पडून गेली.
त्यामुळे माझी तर नक्कीच खात्री झाली 
की हा कोविड 
काही स्पेसिफिक लोकांसाठीच
बनवला गेला होता
सारे वी आय पी शाबूत 
सारे स्टार शाबूत 
माझ्यासकट 
किती मैत्रिणींचे नवरे ही शाबूत
किती अपेक्षाभंग हा 
केवढी मोठी शोकांतिका!!



🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

फांदी आभास

फांदी
****

हिरवीच असते 
तुटलेली फांदी 
झुलत असते 
वार्‍यावरती

जरी आता ती 
झाड नसते 
तरीही तिच्यात ते
वृक्षपण असते 

तसेच होते अस्तित्वाचे इथे 
जेव्हा ते जाते सुटून
जीवनाच्या आसक्तीतून
हवेपणाच्या मागणीतून

हिरवळ असते
सळसळ असते
ओलेपण असते
पण संकर्प तुटलेला असतो
आधार मोडलेला असतो

किती अन कसे पुढे
याला अर्थ नसलेला 
जगण्याचा आभास 
फक्त 
जीवन मिटलेला 


येणेवरी सुख जरी

येणेवरी सुख
**********

येणेवरी सुख जरी
तुझे खूप सुखावले 
डोळ्यातील डोळे तुझे
जळी का गं पाझरले 

गेली विझुनिया आग 
रान ओकेबोके झाले
जळलेल्या फांदीवर
स्वप्न का गं सादळले

ऋतू नव्हताचं जरी 
तुरे डोहाळ्याचे आले 
जाता गळून मोहर
वेड का गं मावळले

येते उधाणून वर्षा 
कोसळते धरेवरी
चिंब भिजतो कातळ
नच विरुढतो  परी

मोडू दे ग वाटा तुझ्या 
माघारल्या पाउलांनी 
बघ पुन्हा जाऊ नको 
कधी अशी अनवाणी 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

वाट बघणे ( उपक्रमा साठी)

(उपक्रमासाठी)
वाट बघणे
*******
डोळ्यात वाट बघते 
असे कुणी तरी होते 
पण खरे तर तेही 
फसवेच नाते होते

फसव्या त्या नात्यातील 
जरी बघणे खरे होते 
चोर शिपायाचा खेळ 
रंजन संपूर्ण होते 

खेळलो यार खेळ तो
झोकून देवून पार 
झिंगलो रंगलो मस्त
मजा आली दिन चार

फसल्याची खंत नाही
हरल्याचा संताप वा
काल संपला कालचा 
आज दिवस ये नवा

येईल कुणी अजून
जाईल जीवा खेळून
मी ही खेळेन डाव तो
पण खेळास जाणून

गुंतून फसणे घडो
वा फसून  गुंतणे ते 
किती मिळतात यांनी
कवितेस विषय ते 
🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘






शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

माय

माय
****

ठेवताच हात 
माय माथ्यावर 
आलो भानावर 
जागृतीच्या 

झालीस कृपाळू 
आई भगवती 
चैतन्याच्या वाती 
कणोकणी 

ओस जगण्यात 
स्वानंदाचे घोस
भेटले सायास 
केल्याविना 

जरी स्वप्नभास 
चैतन्य देहात 
प्रभा गवाक्षात 
पहाटेची 

जरी अहं तोच 
अज्ञान आकाश 
शलाकेची रेष
चमकली 

विक्रांत हा असो 
तुझ्या पायतळी 
कृपेची सावली 
मिरविता 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

नसणे


नसणे
******

नसणे आयुष्यात तुझे
मी स्वीकारले आहे.
असणेही भ्रम होता 
नसणे ही मानले आहे

असतोच अंत वसंता
आणि वर्षा ऋतूला
पानगळीसवे शिशिरा
मी देही पांघरलेआहे.

होताच मोहर साजरा
अन् वर्षेतील नव्हाळी
सरुनी सारे आज पण
मन रिक्त झाले आहे.

नकोच आता फुलणे 
नकोच व्यर्थ झुरणे 
होण्यास अग्नि सुमने 
काष्ट उत्सुक झाले आहे

भरुनी दशदिशात तू
आहेस साचलेली
विझुनि अस्तित्व माझे
माझ्यात दाटले आहे

हा अर्थ मनी  उमटला
स्मरता तुज विसरता 
हृदयांत मीच माझ्या
मजला ठेवले आहे.


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 






मोठेपण

मोठेपण
***-

दिलेस दातारा 
का रे मोठेपण 
वाहणे कठीण 
वाटतसे॥
 
आधीच होतो मी 
भाराने वाकला 
त्यावरील ठेवला 
हौदा थोर ॥

डोके काढी अहं 
मिळता कारण 
तयाला कोंडून 
ठेवू किती ॥

मोडुनिया पाय 
बांधुनिया हात 
ठेवले युद्धात 
ऐसे गमे ॥

का रे करी खेळ 
देवा अवधूता 
ठेव तुझ्या पदा 
विक्रांता या ॥

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...