शुक्रवार, २५ जून, २०२१

दत्तेच्छा।



दत्तेच्छा
*******

देवे भेटविले 
कित्येक साधूंना 
लाविले चरण 
धरावया ॥

कधी इच्छेविना 
इच्छे वा धरून 
जाऊन नमन 
करविले ॥

खरे तर सारे 
तयाच्या आधीन 
एक कृपा क्षण 
त्यांचा पुरे ।

आधी होता हट्ट 
कशाला ते जावे 
दत्ता तूच द्यावे 
देणे जे ते ॥

जर का नसेल 
द्यावयाचे तुला 
पडून पायाला 
राहू दे ना ॥

दत्त माझा सारा 
जाळी अभिमान 
त्यांचे थोरपण 
दावुनिया ॥

तयांचे हातून 
स्वतःच येऊन 
ऊर्जेचे स्फुरण 
प्रेमे देत ॥

सारे गुरुतत्व 
असे दत्त रूप 
अरूपाचे रूप 
घेऊनिया ॥

विक्रांत दत्ताचा 
अवघ्या संतांचा 
दास हा जन्माचा 
लीन झाला ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

जल वनवासी


जल वनवासी
**********

डेझी चाळीचे निवासी 
आम्ही जल वनवासी 
डोळे लावून नळाला 
आसुसलो दिन निशी 

धन गेले जरी कोटी 
परी पाणी नाही ओठी 
दारी धोधोधो पाऊस 
मनी असूया दाटती 

आशा मनात धरून 
आलो इया वर्धमानी
हाय परी इथे असे 
तिच कोरडी कहाणी 

कशी तुटती पाईप 
जल जोर कमी होतो 
खाज कोणाच्या हाताला 
कोण बळे दाता होतो 

शेठ म्हणतो मी केले 
जेव्हा आला पाणी दिले 
आता घाला हेलपाटे 
शोधा मुन्सिपाल्टीवाले 

होतो तिथे बरे होतो 
वेळ म्हणायची आली 
बाबा वर्धमानी ऐसी 
सारी हौस पुरविली 

तसा विक्रांत दुष्काळी 
जिल्हा नगर मधला 
अर्ध्या बादलीत स्नान
होता करता झालेला 

दिन तेच आठवले 
चक्र पूर्ण एक झाले 
होते प्रारब्ध राहिले 
वर्धमानी फेडियले 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

😄😄

बुधवार, २३ जून, २०२१

युद्ध

युद्ध
🏵🏵

तेही एक युद्ध होते 
हेही एक युद्ध आहे 
तेव्हा शत्रु दृश्यात होते 
आता शत्रु मनात आहे

तेही मानवनिर्मित होते 
हे ही मानवनिर्मित आहे 
तोच शोक अक्रोश तेव्हा 
आताही तोच होत आहे 

तेव्हाही जगलेच जीवन 
आता ही जगतच आहे 
येतील साथी होतील युद्धे
यात जगता नवे काय आहे

जिने सुरू केले हे जीवन 
प्रज्ञेस त्या का नको हे जीवन 
सृजन विसृजन पुन्हा सृजन 
चाले स्मृतीच्या बंध पाशाविन

अनंत जनन अनंत मरण 
अनाम अनंत अवघे जीवन
विक्रांत पाहतो कळल्यावाचून
दत्ता काढ रे मजला यातून 

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .




सोमवार, २१ जून, २०२१

विक्रांत आवडी

विक्रांत आवडी 
***********
विक्रांत आवडी 
सदैव दत्ताची 
राहु दे कृपेची 
हीच खूण॥

लावू दे रे देही
विभूती  सुंदर
नाम वा अबीर
भाळावर

नाही जरी संत 
अथवा महंत 
भोग अंगणात 
रमलेला 

रूणझुण याद 
तुझी अंतरात 
फुटता पहाट 
नित्य असो 

अन निजतांना 
निगूढ  निद्रेत 
तुज आळवत 
मिटो नेत्र 

बाकी मन स्वार 
चालले जीवन 
कधी स्थिरावेन 
तुज ठायी .

कृपेविन काही
येते न घडून 
विक्रांत जाणून 
आहे दत्ता ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

*********::::

रविवार, २० जून, २०२१

सोय

सोय
*****

या रे या शरण 
अवघे टाकून 
मजला धरून 
रहावया ॥

मग मी पाहीन 
तुम्हास तारीन
घेऊन जाईन 
जन्मा पार ॥

एकच टिमकी 
वाजते जगती 
आणिक वाहती
जन्म मृत्यू ॥

एक आश्वासन 
केवळ मनास 
एवढे जगास
पुरे होते ॥

जीवाला आधार
भयाचा बाजारी
स्वर्गाची उधारी
ठेवायाला॥

नाही तरी घर 
संसार व्यापार 
हेच असे सार 
तयासाठी ॥

दोघांचीही सोय 
दोघेही निवांत 
पाहतो विक्रांत 
हसूनिया ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

शनिवार, १९ जून, २०२१

भिजलेला घाट

भिजलेला घाट
***********

भिजलेला घाट 
भिजलेली वाट 
भिजलेला तृप्त 
इंद्रायणी काठ॥

भिजले देऊळ 
भिजले राऊळ 
भिजला सोन्याच्या 
देवाचा पिंपळ ॥

भिजलेले मन 
भिजलेले तन 
भिजल्या डोळ्यात 
भिजलेलं गाणं ॥

भिजले आकाश 
भिजला प्रकाश 
भिजले हळवे 
उषेचे निश्वास ॥

थांबले निनाद 
टाळ घोष नाद 
निरव प्रशांत 
उगवला आत ॥

अन मिटताच 
पाहती लोचन 
जाणावे स्पंदन 
स्फुरे कणकण ॥

धडाडे मृदुंग 
तीव्र काळजात 
टाळ झांज नाद 
खणाणे कानात ॥

रामकृष्ण हरी 
शब्द पांडुरंग 
आनंदात दंग 
झाले अंतरंग॥

सुखावलो माये
ज्ञानाई कान्हाई
ठायी ठायी दिसे
किती नवलाई ॥

विक्रांत डोळ्यात 
माईना पसारा 
कृष्ण घननिळा
वेटाळे जिव्हारा  ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘








भिजलेला घाट
***********

भिजलेला घाट 
भिजलेली वाट 
इंद्रायणी काठ
भिजलेला ॥

भिजले देऊळ 
भिजले राऊळ 
भिजला पिंपळ 
सोनियाचा॥

भिजलेले मन 
भिजलेले तन 
भिजलेलं गाणं 
डोळीयात ॥

भिजले आकाश 
भिजला प्रकाश 
उषेचे निश्वास
हळुवार ॥

थांबले निनाद 
टाळ घोष नाद 
निरव प्रशांत 
उदो झाला ॥

अन मिटताच 
पाहती लोचन 
जाणावे स्पंदन 
कणोकणी ॥

धडाडे मृदुंग 
काळजाच्या आत 
खणाणे कानात 
टाळ झांज ॥

रामकृष्ण हरी 
शब्द पांडुरंग 
आनंदाचा रंग 
अंतरात ॥

सुखावलो माये
ज्ञानाई कान्हाई
दिसे नवलाई 
ठायी ठायी ॥

विक्रांत डोळ्यात 
माईना पसारा 
कृष्ण घननिळा
वेटाळून ॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

गुरुवार, १७ जून, २०२१

गाणे तुझ्यासाठी


तुझे गाणे
*******

तुझे गाणे तुझ्या साठी 
वाटते जरी मी गातो 
तुझे गाणी माझ्या साठी 
खरे तर मी लिहितो ॥

सुटु नये हात तुझा 
म्हणुनी हा अट्टाहास 
बळेबळे आणे आव 
जना वाटे फक्त खास ॥

बाकी तर तसा आहे 
संसारात बुडालेलो
मोह पाणी लोभ फुले 
अवघ्यात खुळावलो ॥

हरखते मन जगी 
रूप गुण पाहतांना 
हळवे हव्यास तरी 
गोड वाटे गुंततांना ॥

साऱ्यामध्ये भय परी 
नको तू तो दुरावाया
म्हणुनिया लाडेकोडे 
येतो तुज सुखावया ॥

लायकी ती जरी नाही
येण्या तुझी अनुभूती 
आल्यागत वावरतो 
मिरवितो तुझे प्रीती ॥

अपराध कितीतरी
हातून असे घडती
बुडतांना कर्दमात 
असू दे रे दोर हाती ॥

झाली तर घडो भेट 
जन्म नाही हा शेवट 
तोवरी साहून घे रे 
विक्रांतची कटकट॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...