बुधवार, १२ मे, २०२१

पाय घसरता.

पाय घसरता
*********

पुन्हा पाय घसरला
पुन्हा पाय मोडला
होय तस वय झालंय 
अन वजनही वाढलय
हे हि  खरं आहे.

पण बघताच येत नाही 
अजून नीट वळून
कोण जातंय कुठून
ओळखीचं अनोळखीचं
नाहीच येत कळून
तसा चश्माचा प्रॉब्लेम तर 
आहेच सोबत अजून 

पण आता विचारू नका 
कुणाकडे बघत होता म्हणून 
झालय बायकोन विचारून 
(अन् असं  सांगतो का कोण
कुणाला हरिश्चंद्र होवून )

पण तशी मजाही असते काही
या घसरण्यात
विचारणारे भेटतात 
सावरणारे भेटतात 
सल्ले देणारे भेटतात 
मुरगळा काढणारे सुद्धा भेटतात

पण ज्याच्या मुळे घसरलो 
ते काही केल्या नाही भेटत .
नाही . .
जाब नसतो विसरायचा
वा शोध घ्यायचा कारणाचा
माहित आहे हे नेहमीचे
फळ धांदरट पणाचे
जमलच तर फक्त 
एक निरोप 
असतो द्यायचा 
.
.
.
तोच तो हो
पायरी नीट करायचा .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘






 

मंगळवार, ११ मे, २०२१

साईनाथ

साई नाथ
********
असूनी मातीचा
जन्म हा धुळीचा
केला आकाशीचा 
मेघ मज॥१

तयाच्या कृपेचा
प्रसाद मिळाला
धन्य हा जाहला
जन्म इथे ॥२

नसूनही काही 
जगी मिरविला 
फुगा जै भरला 
रंगीतसा  ॥३

भरताच गर्वे 
त्यांनीच फोडला 
धुळी मिळवला 
एकवार ॥४

उमजता चूक
धडा शिकलेला
पुन्हा उचलला
हसूनिया ॥५

पुन्हा फुगवला 
भोक बुजविला 
हवेत सोडला 
हलकेच ॥६

जरी मी उडतो 
हवेत डोलतो 
परी हे जाणतो 
दोरी कुठे ॥७

फुटणार भुगा 
तुटणार दोरा 
हातात दातारा 
तुझ्या सारे ॥८

खेळतो मी नाथा 
आता तुझ्या हाता 
हीच सार्थकता 
मज पुरे ॥९

साई गुरूतत्व
नमितो विक्रांत
कृपाळूवा दत्त 
पदी नेतो॥१०


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

जडतात जीव


जीव
*****
जडतात जीव 
सजतात जीव 
मोडताच वाटा 
विझतात जीव ॥

हसतात जीव 
रमतात जीव 
विरहात छोट्या 
रडतात जीव ॥

कधी जीवा कळे 
पुढे काय आहे 
विसरून परी 
राहतात जीव ॥

क्षणाचीच प्रीत 
क्षणाचेच गीत 
मिलना आधीच 
हरतात जीव ॥

तरी तीच बाधा 
होऊनी विषाची 
वेदनात दग्ध
जळतात जीव ॥

आणि अंती हाती 
राख सुमनांची 
भरुनिया देही 
जगतात जीव ॥

काही वेचलेले 
शब्द सजलेले 
विस्मृतीत खोल 
गाडतात जीव ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, १० मे, २०२१

मायबाप स्वामी

मायबाप स्वामी
************

मायबाप स्वामी माझे 
बंधू-भगिनी सोयरे 
तयार कृपा सावलीत 
आहे माझे सुख सारे ॥

फार काही सेवा जरी 
झाली नाही माझे हाती 
हेतू विन प्रेम परी 
करी माय भगवती॥

कृष्णमेघ आषाढीचा 
उदार तो सर्वा ठाई 
येता जरा अंगणात 
प्रेमी तया चिंब होई ॥

पुरविले किती हट्ट 
साथ दिली संकटात 
दत्त दत्त म्हणे वाणी 
स्वामी माझ्या हृदयात ॥

काय असे पुण्य होते 
स्वामी आले जीवनात 
विनवी विक्रांत तया 
फक्त पदी राहू द्यात.॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

लेखणी



लेखणी
******

कुणी म्हणे शस्त्र  
कुणी वा लेखणी 
धन्य खरोखर 
तियेची करणी ॥

कधी हळुवार 
होत अलवार 
ओघळते आत
होऊन पाझर ॥

कधी होते आग 
तोफ तोंडागत 
येई त्या समोर 
राहते जाळत ॥

कधी होउनिया 
मुग्ध प्रेम गीत 
देई उमलून 
हृदयी वसंत ॥

मायेच्या वात्सली 
कधी ओसंडते 
सुखाचा सागर 
उरात भरते ॥

जितुकी जे भाव 
तितुके ते रूप 
आणिक अरूप 
रूपी दाखविते ॥

विक्रांत सदैव 
तियेचा तो  ऋणी
अक्षर सृष्टीचे 
दान हे घेऊनी ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शनिवार, ८ मे, २०२१

कट्यार

कट्यार
******:

बांधुनिया कटी
बहु मिरवावे 
प्रसंगी वधावे 
अरी उर ॥

शयनी भोजनी 
विना ताटातुटी 
घडावी ती प्रीती 
ऐसे वाटे ॥

परी म्यानासह
तुज मांडलेले 
दिवाणी ठेविले 
सजवून ॥

कलाकुसरीने 
सूक्ष्म घडविले 
वाहव्वाचे झाले 
क्षेत्र जणूं ॥

रहा शोभेचीच
अस्पर्श रक्त तू 
विसर शस्त्र तू 
आहेस हे ॥

तर मग जन्म 
कशाला कट्यारी 
स्मृतीचिन्हांपरी 
मिरवाया ?॥

अवेळीच जन्म 
अकर्मीच कर्म
हरवून धर्म
जगणे हे॥

देई सोपवून 
ऐश्या कुण्या हाती 
न हो धुळ माती 
गंजुनिया ॥

आत्मरक्षणाला
वधाया रिपूला 
सज्ज हो कटिला 
भगिनींच्या॥


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

शुक्रवार, ७ मे, २०२१

विनाकारण

एक विनाकारण कविता 
. . 
विनाकारण प्रेम होते 
ऐकले होते 
अन कुठे कुठे  वाचले होते 
तसे तर आम्हीही 
विनाकारण प्रेम केले 
विनाकारण शब्द खर्चीले 
पायावरती प्राण वाहिले 
पण तरीही कुणीही कुणीही 
विनाकारण आम्हा न पाहिले 
प्रेम घडते हृदय जडते 
नच का कधी केले जाते 
हे ही आम्हा ठाऊक होते 
ऐकुन वाचून कुठेतरी ते
पुढे विनाकारण खूप भटकलो 
अन् लग्न करूनी पुरे म्हणालो 
काही कारणे झाला संसार 
भाजी मिरची धान्य बाजार 
मुले जन्मली ती वाढविली 
शक्ती मतीने सुजाण केली 
आणिक संसार तेल मिठाचा 
जग राहटीचा केला साचा 
पण जे होते 
विनाकारण . .

विनाकारण 
मनात अजून 
अगदी अगदी 
विनाकारण,. . .

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...