गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

शब्दात फिरणे




शब्दात फिरणे
*************
अनावर शब्द
दत्ता तुझ्या पायी
परि  दृष्टी नाही
मूर्त तुझी 

अजून कोरडे
काय शब्द माझे
म्हणुनि कृपेचे
बोल नाही 

मग मौनडोही
बुडव मजला
तुझिया रूपाला
पाहू दे रे 

अंतर्बाह्य राही
व्यापुनी जीवाला
अर्थ अस्तित्वाला
कळलेला 

सुटावे विक्रांत
शब्दात फिरणे
मौनात मुरणे
व्हावे सदा


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, २९ जानेवारी, २०२०

ज्ञानीयाच्या गाठी

 

ज्ञानियाच्या गाठी 
************

ज्ञानियाच्या गाठी 
ज्ञानाच्याच गोष्टी 
भाकरीची पोटी 
याद नाही

येई जिवलगा
घेऊनिया हाती 
अमृताची वाटी 
काठोकाठ 

काय सांगू बाई 
शब्द कवतुक 
ओघळते सुख 
श्रवणात

बोलता बोलता 
जीवीचे ते गुज
सांगती सहज 
बहुमोल 



अदृष्य ते दृष्य
दिसू लागे डोळा 
भेटीचा सोहळा 
मनोरम

चैतन्याची कळा
चैतन्यात गोळा 
चैतन्य निराळा 
तरी भासे

जाहला सत्संग 
सत्याचाच संग
विक्रांत निसंग 
क्षणा भेटी


©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

दत्त तत्व





 
दत्त तत्व
*****
माझे नाहीपण
तुझिया वाटेला
म्हणून जगाला
कळेचिना ॥

आयुष्य म्हणजे
अभ्राचा आकार
जल रेखावर
जन्म चाले ॥

हरवले भान
देह आणि मन
तरीही स्फुरण
दत्त असे ॥

आघात वाचून
कुठले स्पंदन
परि कणकण
गुण ग़ुणे ॥

नसल्या वाटेचे
जरी वाटसरू 
चाले येरझारू
खुणावर॥

नसे सुरुवात
मग कैसा अंत 
बुडला प्रेमात
शब्द माझा ॥ 

विक्रांत अस्तित्व
दत्ताचे कवित्व
धूम्र वलयात
गंध होय ॥

निर्गुण निजले
त्रिगुण सरले
दत्त आकळले
तत्व आत ॥

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...