शनिवार, ६ जुलै, २०१९

जळो मोठेपण




जळो मोठेपण 
आले उगवून 
मनाला व्यापून 
नको तरी

बरवे राहावे 
कुणी नसलेले 
दत्तात रमले 
चित्त माझे

नको ती उपाधी 
दयाघना पाठी 
सोडव रे गाठी 
पडलेल्या

होणे कुणी नाही 
देणे कुणा काही 
आठवण ती ही 
नसु देरे

तुझिया प्रेमात 
राहावे जगत 
आनंदे पाहत 
रूप तुझे

विक्रांत मागतो 
जाग जगण्यात 
योग असण्यात 
सवे तुझ्या

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in
००००

शुक्रवार, ५ जुलै, २०१९

जीव दत्त पायी




जीव दत्त पायी
***********

फेडूनिया ऋण 
काही जीवनाचे
मजला जायचे 
आहे जरी ॥

अडकला जीव
माझा दत्त पायी
मज अन्य काही 
नको वाटे ॥

चाललो घेऊनी 
संसाराचे ओझे
आलो प्रारब्धाचे 
मापे जरी ॥

सांभाळ रे दत्ता 
नेई आता पार
मजला आधार 
अन्य नाही ॥

वाहतो विक्रांत 
प्रारब्ध प्राक्तनी
दत्ताला स्मरूनी
सदोदित 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, ४ जुलै, २०१९

सुटो अहंकार




सुटो अहंकार
********

माझिया मनाचा
सुटो अहंकार
जेणे तुझे दार
अडविले ॥

होऊन धुकट
येते तुझ्या आड
डोळ्यास झापड
लावतसे ॥

तूच माझा सखा
स्वप्न सजविता
मरणाची गर्ता
चुकविता ॥

इवल्या फुंकरी
सरू दे आभाळ
कृपेची सकाळ
करी बापा ॥

नाव अवधूत
गाजो तुझे मही
त्राही त्राही पाही
विक्रांता या ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


बुधवार, ३ जुलै, २०१९

नेई मज दत्ता




नेई मज दत्ता
पुन्हा चांदण्यात
पुन्हा पावलात
स्वर्ग नांदो ॥

पुन्हा माथ्यावरी
झळाळो तो चंद्र
ओघळावा सांद्रतुही मनी ॥

तीच लवलव
हिरव्या पानात
चंदरी रसात
दिसू दे रे ॥

कभिन्न कातळी
हरूनियां भान
माझे हे मी पण
जाऊ दे रे ॥

दरीतला वारा
येऊ दे भरारा
मनाचा पिसारा
फुलू दे रे ॥

साद कानांवर
जय गिरणार
पुन्हा एकवार
पडू दे रे ॥

लोभस ती मूर्ती
दिसू दे चरण
डोळ्यात भरून
पाहू दे रे ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

मंगळवार, २ जुलै, २०१९

आई






लायकी वाचून
नाही ना धावत
तुजला मागत
प्रेम प्रभू ॥
बाळ हे मळले
घाणीत पडले
आईने त्यजिले
काय कधी ॥
तैसा जरी मज
दोषांनी वेढले
वाया घालविले
जन्मात या ॥
घेई गे जवळ
करी गे सांभाळ
करून सकळ
दोष दूर ॥
कुपुत्रा सुपुत्र
करण्याचे बळ
तुजला केवळ
मायबाप ॥
विक्रांत वाचाळ
बोलतो बरळ
करिसी सरळ
दत्तात्रेया.॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
****०००००

सोमवार, १ जुलै, २०१९

तुझी आठवण


तुझी आठवण
**********
तुझी आठवण
आयुष्य भरून
चांदणे होऊन
ओघळते ॥

माझ्या अंधारात
क्षणभर पेटून
देई वरदान
प्रकाशाचे॥

जावे हरवून
तुझाच होवून
मी माझेपण
वाटे सदा॥

दुनिया जरी ही
बाजार होऊन
जातेय घेऊन
रोज मला॥

खुळी जरी मम
स्वप्न हरवून
सरले जीवन
नटलेले॥

खेद खंत नच
कधी ये दाटून
तुझाच होवून
जगतो मी॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

प्रेम उधानले ओले




 प्रेम उधानले
********

प्रेम उधानले ओले
गर्द आभाळ हे झाले
मन मृदुल मवाळ
नवे अंकुर फुटले  ॥ 

आस डोळ्यात दाटली
कुण्या रूपात खिळली
किती सांगावे जीवाला
होडी  वादळी धावली  ॥

युगे उलटली तरी
तोच हव्यास साजरा 
घन ओथंबले तन 
मिठी मारते अंधारा ॥

जादू स्पर्शात दाटते
कुण्या पुसट क्षणाला
जन्म हरवतो पुन्हा
त्याच स्तिमित पळाला ॥

ओझे मनाचे सुटते 
उगा प्रतिष्ठा गोठले
पंख भरारती मुक्त
स्वप्न पाहत सावळे ॥

ओढ अनाम अतृप्त
जन्मा वेढून राहते
काया थकली कोवळी 
कुण्या शोधात शिणते ॥

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...