शुक्रवार, २१ जून, २०१९

धुक्यातील गिरणार




जीवा घालणारी साद
दाट धुक्यातील वाट
दीप दूरवर मंद
याद साठलेली आत 

पान पान ओेले चिंब
चिंब भिजलेले मन
चहू बाजूने गगन
दत्त विराट होऊन 

पाय अनवाणी वेडे
होते अधीर धावत
खडे टोचणारे काही
नाव ओठात णत

झालो पवित्र पावन
तूच श्वासात देहात
शिर भिजलेले ओले
तुझा डोईवर हात 

कण कण  सुखावला
दत्त चैतन्यी सजला
आलो कुठून कुठला
सारा विसर पडला

दत्त गिरणारी बाप
ऐसा कृपावंत झाला
तनामनाची गाठोडे
वर उचलता झाला  

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

बुधवार, १९ जून, २०१९

देई रे कोपरा



देई रे कोपरा
**********
प्रत्येक पायरी 
असे प्रभू दत्त 
शिखर न अंत 
चालण्याचा ॥
प्रत्येक श्वासात 
कृपेचा प्रपात 
तुझिया ऋणात 
जगतो मी ॥
असा घडो यज्ञ 
प्रभू जगण्याचा 
घडो सर्वस्वाचा 
स्वाहाकार ॥
सरू दे संकट 
सरत्या क्षणांचे 
रित्या या काळाचे 
तेच पुन्हा ॥
देई रे कोपरा 
तुझ्या कपाटात 
मज स्वरूपात
ठेवी दत्ता ॥
शोधतो विक्रांत 
कडी कपारीत 
यावे अवचित 
दिगंबरा ॥
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

शनिवार, १५ जून, २०१९

रहा सदा साथ





रहा सदा साथ
**********


बहुत जन्मात
तुझी आठवण
करूनिया मन
तुझे झाले 

पेटलेला दीप
असे अंतरात
देऊनिया हात
सांभाळी रे 

पुन्हा ठेव पदी
दे हरवून
जन्म मरणातून
सोडव रे 

मागण्यास आता
आन काही नाही
जीवनाची वही
भरलेली ॥

भेटलास बापा
रहा सदा साथ
मागतो विक्रांत .
तुज आता 

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in




शुक्रवार, १४ जून, २०१९

रेवा माय




रेवा माय
***

जगतोय दूर किनारा सोडून 
माय दूरावून तुझिया पासून 

तुझिया स्मृतीचे इवलेसे क्षण  
वेचतो त्यातून आनंदाचे कण

ये कधीतरी जा गे घेऊन
तुझ्या कुशीत मी मजला सांडीन

होईल काश भरून चांदणे 
हरित पर्णाची लेईन वसणे 

जल लहरींचे चंचल नर्तन 
अथांग डोह वा जाईन होवून

कुठल्या दारचा होईल वा ओटा
गूढ रानातील अनवट वाटा

पुन्हा एकदा हे अवघे सोडून
वाटे फक्त तुझा  जावे मी होवून 



© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

००००००


गुरुवार, १३ जून, २०१९

भरदुपारी




भरदुपारी
*************


भरदुपारी त्या उन्हात
आलीस तू सावली होत
सुखावले तनमन माझे 
झाली सुमनांची बरसात 

तापलेल्या तव गालावर
होते कमलदळांचे सरोवर 
घनगर्द कुटिल आभाळ
उतरलेले अन भालावर 

शब्द आले तव वाऱ्यावर 
होत एक शीतल लहर 
वीज नजरेतील तुझ्या
गेली माझ्या आरपार

अशी येत जा तू कधी 
सखी होत माझी दुपार 
वाळवंटी माणसांच्या या 
देत मजला हिरवा आधार 


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

गजानन शेगावीचा





गजानन शेगावीचा 
********************

शरणागत भक्तां
देई कृपादान
देव गजानन
शेगावीचा 

भक्त जो भक्तांचा 
योगी योगीयांचा 
विदेही ज्ञानाचा 
अवतार

करुणा सागर
आर्तासी आधार
जाहली साकार  
कृपा जणू

भक्त संकटात
रक्षिले अपार
ग्रंथांचा आधार
देऊनिया

किती सावरले
किती सांभाळले
किती आवरले
मरतांना  

किती एक जना
पोटाशी लाविले
पुत्र पौत्र दिले
कृपादान

दूर आधी व्याधी
केली येता दारी
भक्तीची पायरी
दाऊनियां

विक्रांत ओळखी
खूण अंतरीची
मूर्त श्री दत्तांची
गजानन  

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

बुधवार, १२ जून, २०१९

भारी माझा दत्त गं




भारी  माझा दत्त गं
************


कळी काळाला भारी 
भारी  माझा दत्त गं धृ ॥
रुसलेल्या ओटीत 
भरतो आनंद गं
वाढवितो गोकुळ
कृष्ण अंगणात गं ॥
सांभाळतो कळीला
ऊन पावसात गं
थांबावितो अवकाळा
हाती शुल घेत गं 
डा पीडा भूतबाधा  
बुडे कृष्णाईत गं
कुण्या पुण्याईने ये
माझ्या पदरात गं ॥
आला अवचित हा
सखा जीवलग गं
हरखतो विक्रांत
पाहून कौतुक गं

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
००००००

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...