मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

एक स्वप्न



एक स्वप्न
******

पाहिले होते कधी मी
एक स्वप्न नित्य खुळे
मिटलेल्या डोळीयात
रुजावे आकाश निळे

एक दार गुहेचे त्या
उघडावे माझ्यासाठी
नि मज घेऊन जावी
करुणेची लाट मोठी

लक्ष्य  जन्म मरणाची
येरझार हरवावी
शेवटच्या श्रावणाची
सर चिंब देही यावी

अग्नि स्पर्श अवधुती
जन्म मज आकळावा
नावगाव जात गोत
व्यर्थ पसारा मिटावा

शुष्क बोध शास्त्रातला
देहात या पालवावा
तन मन कण माझा
अनंताचा अंश व्हावा


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

तूझिया वाचून




|| तूझिया वाचून ||
**************

आता मी माझ्यात
तूझिया वाचून
क्षणांची बांधून
मोट चाले ||

कोरडे नयन
कोरडे मन
कोरडे जगणं
उदासीन ||

आटला धावा
आटली तहान
तमी हरवून
संवेदना ||

मिटली पाकळी
सुटली अंजुळी
हरवून गेली
प्रार्थना ही ||

दाटला अंधार
मिटला हुंकार
प्राक्तना सादर
अधोमुख ||

मनाच्या खेळा
होवून आंधळा
फिरलो गरारा
वाटे आता ||

विक्रांत पेटली  
जाणीव विझली
काळोखी गिळली
कुणी कैसी  ||

डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

होत नाही





होत नाही

*******

मनीचे आस्वाद विषाद
मिटता मिटत नाही
म्हणून ज्योत निरंजनाची
दिसता दिसत नाही

ओल्या काडी प्रमाणे
येई एक एक विचार
पडतो आगीत पण
जळता जळत नाही

धूर धूर आणि धूर
व्यापून सारे अवकाश
निर्मळ क्षण प्राणात
भरता भरत नाही

दबते गुदमरते ठिणगी
जळता जळत नाही
पेटायची इच्छा आतील
शांत होता होत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

दिप लाव डोळियात




नवी विटी नवे राज
तोच खेळ चाले आज

येतो अन जातो श्वास
जगण्याचा गमे भास

वाहतेय पाणी फक्त
उभा राहे उगा तट

आणि किती रातदिस
सारे ठाव अंधारास

खोलवर खुळी आस  
जन्म जणू गळफास

जोखडाचा अर्थ काय
कळण्यात वय जाय

आता तरी बांध तोड
ओला कर तुझा माठ

जीवनाशी पैज घेत   
दिप लाव डोळियात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

चिंता


चिंतेचे चिंतन
*******

असे म्हणतात 
मनातल्या चिंतांचा गुंता 
कधीच सुटत नाही 
जेवढा तुम्ही सोडवायचा 
प्रयत्न कराल 
तेवढा अधिकच गुंतत जाई 

चिंतेचे जाळे 
नेहमी पकडू पाहते 
ओसाड तळ्यातील 
चकाकती मासोळी 
आपल्या नॉयलनी धाग्यात 
पण येते परत परत
गवत अन् पालकुट
घेऊन सोबत 

काळजी वाटणे 
किती साहजिक असते
प्रेमाच्या महा वस्त्राची 
जणू ती एक सुंदर किनार असते 
पण त्या काळजीची 
जेव्हा चिंता होते तेव्हा 
त्या वस्त्राची रयाच घालवते 

खरं तर चिंता करणे 
हे मनाचे एक 
नको तेउपद्व्यापी 
खेळणे असते
आकाशातील ढगात जणू
बागुलबुवा पाहणे असते

मनातील चिंतेचा गुंता 
न सोडविणे
हाच त्यापासून सुटण्याचा 
सर्वात सोपा मार्ग असतो 
कारण चिंतेचे चिंतन 
हेच चिंतेचं वाढवणें असते
अन आपण चिंता करतोय 
हे जाणवणे यातच 
चिंतेचे विरघळणे सुरू होते

चिंता देऊ शकत नाही संरक्षण 
चिंता बदलत नाही भवितव्य 
चिंता असते फक्त एक भणभण
कुस्करणारी आपले स्वर्गीय क्षण

पण या चिंतेच्या अलीकडील 
मी माझे हरवले तर 
ती चिंता जगताची होते 
अन् जगताची चिंता करणारा 
हा समर्थ होतो 
हेही तेवढेच खरे 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

जखम



जखम
****

माझे असणे
ही माझ्या अस्तित्वावर
असलेली
सर्वात मोठी जखम आहे
माझे काहीतरी असणे
माझे काही तरी करणे
माझे कुणीतरी असणे
माझे कुणीतरी होणे
हे घावांवर होणारे घाव आहेत
ही जखम मिटावी
ही व्यथा सुटावी
म्हणून केलेल्या
साऱ्या आटाअाटी
जखम भरायचे सोडून
विस्तारित करीत आहेत
पण ही जखम देणाऱ्या
त्या शस्त्राचे
त्या वस्तूंचे
त्या हाताचे
कारण काय कारक काय
या अनुत्तरित प्रश्नांच्या
वेदना लहरी
पुन्हा पुन्हा त्या जखमाकडे
चित्त घेऊन जात आहेत
ही जखम माझा अंत करेल
कि घेऊन जाईन मला
त्या महावैद्यांकडे याचे उत्तर
तर काळच देईल
पण तोवर या जखमाचे
अस्तित्व स्वीकारत अन् सांभाळत
जगणे क्रमप्राप्त आहे मला .


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

तुझ्या कारणे



तुझ्या कारणे
*********

शब्द ओले
रुजून आले
रंग झाले
डोळ्यात

कानावरती
नाद नाचती
ऐकू येती
रंध्रात

नाच नाचतो
गीत रचतो
सूर गुंफतो
कैफात

मन दिवाने
गाय तराने
होत चांदणे
पाण्यात

इथले जगणे
स्वप्न साजणे
तुझ्या कारणे
घडे ग

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सुखाचा डोह

सुख डोह ******** पाय मी पहावे माझ्या माऊलीचे  सुख आळंदीचे घ्यावे सदा ॥ मनी ज्ञानदेव सदैव चिंतावे  गुणगान गावे वारंवार ॥ अरूपाचे ...