जखम
****
माझे असणे
ही माझ्या अस्तित्वावर
असलेली
सर्वात मोठी जखम आहे
माझे काहीतरी असणे
माझे काही तरी करणे
माझे कुणीतरी असणे
माझे कुणीतरी होणे
हे घावांवर होणारे घाव आहेत
ही जखम मिटावी
ही व्यथा सुटावी
म्हणून केलेल्या
साऱ्या आटाअाटी
जखम भरायचे सोडून
विस्तारित करीत आहेत
पण ही जखम देणाऱ्या
त्या शस्त्राचे
त्या वस्तूंचे
त्या हाताचे
कारण काय कारक काय
या अनुत्तरित प्रश्नांच्या
वेदना लहरी
पुन्हा पुन्हा त्या जखमाकडे
चित्त घेऊन जात आहेत
ही जखम माझा अंत करेल
कि घेऊन जाईन मला
त्या महावैद्यांकडे याचे उत्तर
तर काळच देईल
पण तोवर या जखमाचे
अस्तित्व स्वीकारत अन् सांभाळत
जगणे क्रमप्राप्त आहे मला .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा