शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

वाटणी

वाटणी
*****
जेंव्हा रक्त भांडते 
रक्ता सोबत
तेंव्हा रक्ताच्या थेंबाथेंबातून 
वाहणारे नाते असते 
फक्त हळहळत  
खोल तडफडत

कुठल्यातरी  समर्थ 
हातांनी  लावलेल्या
अन वाढवलेल्या
त्या वटवृक्षाचे 
तुकडे पडतांना पाहून 
येते कणव दाटून 
त्या व्यर्थ जाणार्‍या 
कर्तृत्वासाठी मनातून 

फांदी फांदीस्तव
होतात खलबतं
डहाळी डहाळीसाठी 
ते करतात  युद्ध
कलहाच्या या आगीत
सरते पुंजी कष्टाची 
अन जातात वाया 
किती एक वर्ष आयुष्याची  

तुटणार्‍या प्रत्येक
फांदी सोबत
मेलेल्या नात्यांची
प्रेत असतात जळत
आपल्या कोवळ्या 
हिरवाई सकट


अधिकाधिक तुकड्यासाठी
लढणाऱ्या कावळ्यागत
अधिकाधिक लचक्यांसाठी
गुरगुरणाऱ्या लांडग्यागत
सारे नातलग होतात जणू 
सांबाच्या पोटी जन्मलेल्या 
मुसळागत 

फुलणाऱ्या फळणाऱ्या
अन् विस्तारणार्‍या
प्रत्येक झाडाचे
हेच का असते प्राक्तन ?
खरेच नाही कळत 


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...