शुक्रवार, २० जुलै, २०१८

भयगंड



भयगंड

या देशातील दुसरा देश
मजला भीती दावतो
परका वेष परका आवेश
माझा रस्ता बदलतो

उग्र डोळे संशय भरले
अस्तित्व अधोरेखित करतो
ते माझे मी त्यांचा नाही
माझे मलाच सांगत राहतो

हळू हळू ते वाढतील
मला गिळून टाकतील
खरी खोटी आकडेवारी
मी बैचेन होऊन जातो

होय होय जरी ते इथले
माझ्याच भाग दुसरा झाले
कर्करोग तर नाही ना हा
मी औषध शोधू लागतो

भयगंड म्हणू मी यास की
मनी कुणी काही पेरले
पण जळता इतिहास मला
हो जागा सावध म्हणतो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १८ जुलै, २०१८

अंगण शाळा



अंगण शाळा
.................

अंगणाची शाळा
अति लडीवाळ
निसर्गाचा खेळ
कळे तिथे ॥

येतात दारात
काऊ चिवू मैना
लावूनी पंखांना
रंग नवे ॥

झाडावर उंच
बसे मोठी घार
लपे पिलावळ
कोंबडीची ॥

वेलींवर फुले
पानांचे आकार
पाहून सुंदर
मन हर्षे

झाडांचा मोहर
पिकणारी फळे
खारोटांची बाळे
फांद्यावर

बेडूक डराव
सरड्याची धाव
शिकार सराव
मनी चा त्या

मोकळे आकाश
प्रशस्त अंगण
निजता चांदणं
डोळी भरे

कधी उबदार
उन्हात शेकणे
पाऊस झेलणे
ओंजळीत

येता प्रिय जन
रंगणारे खेळ
सुखाचे वादळ
पिंगा घाले

दिवाळी दसरा
होळी नि पाडवा
अंगणी विसावा
घेती सदा

अंगणा वाचूनी
वाढतात कुणी
कोषात रंगुनी
आपुलिया

तयांचे नशीब
पाहून मनास
होती काही क्लेश
उगाचच

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १३ जुलै, २०१८

गुरकावणारा बॉस



गुरकावणारा बॉस

काय म्हणतोस मित्रा
बॉस गुरकावला
गुरकावू दे रे
त्यांच्यावरही कुणीतरी आहेच
तो गुरकावला की
हा गुरकावणारच
पण तू मात्र गुरकावू नकोस
कारण गुरकावणे असते
भयाच लक्षण
ताणलेल्या सहनशक्तीचे
तटकन तुटन जाणे
आपणच आपल्या
संवेदनशीलतेवर केलेला आघात
जसा हातोड्याने करावा प्रहार
फुलून आलेल्या फुलावर

ना ना .. त्यांना नाही कळणार
नकोच समजावून सांगू
ते पुन्हा प्रहार करतील
कारण मन बोथट होते
अधिकाराच्या शक्तीने
वर वर जातांना  लागलेल्या
ठेचांनी ,व्रणांनी

तू शांत राहा
निस्तब्ध ...
प्रवाह झेलणाऱ्या
कमळाच्या पानासारखा
खेद नको खंत नको
जर जन्मास आली
इवलीशी करुणा तुझ्या मनात
तर एक प्रार्थना कर
त्यांची संवेदनशीलता
जागी व्हावी म्हणून
अन् आभार मान
तुझी संवेदना
जागी आहे म्हणून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ११ जुलै, २०१८

जाब



जाब

चोर विचारतो जाब
जसा काही शिपायाला
तसा वाटतो प्रकार
इथे काहीसा चालला

त्याला नसते माहित
काहीच काय कशाला
तरी म्हणत असतो तो
हत्ती मोठ्याश्या ढगाला

काठी घाला पाठी म्हणे 
पाऊस पाहिजे आला
ओरडून बोल बोले
मुठी आदळे टेबला

हो हो म्हणती त्यास
नोकरशहा वाकले
काय करणार साले
पोट पाठीस लागले

म्हटला तर माहित
असतो खेळ सर्वांला
प्रश्न उत्तर पाठ नि
काय लिहावे कशाला

शिपाईही चोर होतो
जाळी लावून तोंडाला
अन राजा बडवतो
मुर्ख आंधळ्या प्रजेला

ज्याच्या हातात भोंगाना
त्याचा डिंडिम चालला
ठार बहीरे नाचती
हात लावून  कानाला

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

सुटता सुटता



सुटता सुटता


आयुष्याच्या या वळणावर
हवे नकोपण झाले धूसर
तरीही दाटता क्लेश भोवती
पुन्हा वाटते जावे दूरवर

जरी वाटतो सुटला सुटला
दिसतो अहं दडला खोलवर
अन् इवलाले मनी ओरखडे
देते फेकून रूप कलंदर

मी देहाने लाख भोगले
जीवनाचे रूप मनोहर
सुटता सुटता पण बंधन
जीव अडकतो का वेलीवर

विखरून गेले माझे मी पण
झेलून घेता ऋतू अंगावर
मातीत मिसळल्या स्वप्नांना
अन येऊ लागती पुनः अंकुर

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३ जुलै, २०१८

या वळणावर



या वळणावर 

न जाणे किती वर्षे झाली 
मी उभा आहे 
तुझी वाट पाहत 
आयुष्याच्या या वळणावर 
दिवस उलटत आहेत 
रात्र उमलत आहेत 
अन् जीवनचक्र 
पुढे पुढे सरकत आहे 

पण ते वळण अन् मी 
तिथेच आहे . . . .
त्या क्षणात गोठलेला 
प्रतीक्षेचा पुतळा झालेला 
माझ्या डोळ्यात आहे 
अजूनही तीच उत्कंठा 
तुला पाहण्याची 
माझ्या काळजात आहे 
अजूनही तीच आस 
तुला भेटण्याची 
मी शोधतो गंध 
तुझी चाहूल देणारे
मी पाहतो स्वप्न 
तुझा भास जागवणारे

निराशेची गडद काजळी 
टाकत आहे मला वेढून 
माझे भोगी मन 
हसते मला खदखदून 
दाखवते वेडावून 
आयुष्य व्यर्थ गेले म्हणून 
पण मला माहीत आहे 
तू भेटशील तर इथेच 
अन्य कुठेही नाही 

तुझी प्रेम भरली गीते
राहातो मी गुणगुणत 
तुझ्या विव्हळ विराण्यात 
राहतो मी आक्रंदत 
पण तू येशील ना रे ?
फक्त एकदाच ये 
एक अन् फूल मोगऱ्याचे 
अन् मला दे 
बस एवढेच मागणे आहे

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २ जुलै, २०१८

पारधी व पक्षी

पारधी व पक्षी 
********

फाटलेले पंख 
शिवण्याचा दोरा 
शोधतांना गेलो 
पारध्यांच्या घरा 

त्यांनी दिले छान 
गोड खानपान 
नि म्हटला घेरे 
पिंजरी बसून 

तयाच्या प्रेमाला 
विकलो हरून 
म्हटलो हवे तो 
घे पंखही कापून

आकाशाची याद 
गेली हरवून 
चरबीने अंग 
गेले नि फुगून 

आता जुळलेले 
पंखही असून 
उडणे परंतु 
येईना घडून 

हसतो पारधी 
पाहतो मोजून 
म्हणे येईल रे 
तुझा तोही दिन 


डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...