बुधवार, १८ जुलै, २०१८

अंगण शाळा



अंगण शाळा
.................

अंगणाची शाळा
अति लडीवाळ
निसर्गाचा खेळ
कळे तिथे ॥

येतात दारात
काऊ चिवू मैना
लावूनी पंखांना
रंग नवे ॥

झाडावर उंच
बसे मोठी घार
लपे पिलावळ
कोंबडीची ॥

वेलींवर फुले
पानांचे आकार
पाहून सुंदर
मन हर्षे

झाडांचा मोहर
पिकणारी फळे
खारोटांची बाळे
फांद्यावर

बेडूक डराव
सरड्याची धाव
शिकार सराव
मनी चा त्या

मोकळे आकाश
प्रशस्त अंगण
निजता चांदणं
डोळी भरे

कधी उबदार
उन्हात शेकणे
पाऊस झेलणे
ओंजळीत

येता प्रिय जन
रंगणारे खेळ
सुखाचे वादळ
पिंगा घाले

दिवाळी दसरा
होळी नि पाडवा
अंगणी विसावा
घेती सदा

अंगणा वाचूनी
वाढतात कुणी
कोषात रंगुनी
आपुलिया

तयांचे नशीब
पाहून मनास
होती काही क्लेश
उगाचच

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...