शुक्रवार, १३ जुलै, २०१८

गुरकावणारा बॉस



गुरकावणारा बॉस

काय म्हणतोस मित्रा
बॉस गुरकावला
गुरकावू दे रे
त्यांच्यावरही कुणीतरी आहेच
तो गुरकावला की
हा गुरकावणारच
पण तू मात्र गुरकावू नकोस
कारण गुरकावणे असते
भयाच लक्षण
ताणलेल्या सहनशक्तीचे
तटकन तुटन जाणे
आपणच आपल्या
संवेदनशीलतेवर केलेला आघात
जसा हातोड्याने करावा प्रहार
फुलून आलेल्या फुलावर

ना ना .. त्यांना नाही कळणार
नकोच समजावून सांगू
ते पुन्हा प्रहार करतील
कारण मन बोथट होते
अधिकाराच्या शक्तीने
वर वर जातांना  लागलेल्या
ठेचांनी ,व्रणांनी

तू शांत राहा
निस्तब्ध ...
प्रवाह झेलणाऱ्या
कमळाच्या पानासारखा
खेद नको खंत नको
जर जन्मास आली
इवलीशी करुणा तुझ्या मनात
तर एक प्रार्थना कर
त्यांची संवेदनशीलता
जागी व्हावी म्हणून
अन् आभार मान
तुझी संवेदना
जागी आहे म्हणून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...