मंगळवार, ३ जुलै, २०१८

या वळणावर



या वळणावर 

न जाणे किती वर्षे झाली 
मी उभा आहे 
तुझी वाट पाहत 
आयुष्याच्या या वळणावर 
दिवस उलटत आहेत 
रात्र उमलत आहेत 
अन् जीवनचक्र 
पुढे पुढे सरकत आहे 

पण ते वळण अन् मी 
तिथेच आहे . . . .
त्या क्षणात गोठलेला 
प्रतीक्षेचा पुतळा झालेला 
माझ्या डोळ्यात आहे 
अजूनही तीच उत्कंठा 
तुला पाहण्याची 
माझ्या काळजात आहे 
अजूनही तीच आस 
तुला भेटण्याची 
मी शोधतो गंध 
तुझी चाहूल देणारे
मी पाहतो स्वप्न 
तुझा भास जागवणारे

निराशेची गडद काजळी 
टाकत आहे मला वेढून 
माझे भोगी मन 
हसते मला खदखदून 
दाखवते वेडावून 
आयुष्य व्यर्थ गेले म्हणून 
पण मला माहीत आहे 
तू भेटशील तर इथेच 
अन्य कुठेही नाही 

तुझी प्रेम भरली गीते
राहातो मी गुणगुणत 
तुझ्या विव्हळ विराण्यात 
राहतो मी आक्रंदत 
पण तू येशील ना रे ?
फक्त एकदाच ये 
एक अन् फूल मोगऱ्याचे 
अन् मला दे 
बस एवढेच मागणे आहे

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...