बुधवार, ११ जुलै, २०१८

जाब



जाब

चोर विचारतो जाब
जसा काही शिपायाला
तसा वाटतो प्रकार
इथे काहीसा चालला

त्याला नसते माहित
काहीच काय कशाला
तरी म्हणत असतो तो
हत्ती मोठ्याश्या ढगाला

काठी घाला पाठी म्हणे 
पाऊस पाहिजे आला
ओरडून बोल बोले
मुठी आदळे टेबला

हो हो म्हणती त्यास
नोकरशहा वाकले
काय करणार साले
पोट पाठीस लागले

म्हटला तर माहित
असतो खेळ सर्वांला
प्रश्न उत्तर पाठ नि
काय लिहावे कशाला

शिपाईही चोर होतो
जाळी लावून तोंडाला
अन राजा बडवतो
मुर्ख आंधळ्या प्रजेला

ज्याच्या हातात भोंगाना
त्याचा डिंडिम चालला
ठार बहीरे नाचती
हात लावून  कानाला

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

सुटता सुटता



सुटता सुटता


आयुष्याच्या या वळणावर
हवे नकोपण झाले धूसर
तरीही दाटता क्लेश भोवती
पुन्हा वाटते जावे दूरवर

जरी वाटतो सुटला सुटला
दिसतो अहं दडला खोलवर
अन् इवलाले मनी ओरखडे
देते फेकून रूप कलंदर

मी देहाने लाख भोगले
जीवनाचे रूप मनोहर
सुटता सुटता पण बंधन
जीव अडकतो का वेलीवर

विखरून गेले माझे मी पण
झेलून घेता ऋतू अंगावर
मातीत मिसळल्या स्वप्नांना
अन येऊ लागती पुनः अंकुर

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३ जुलै, २०१८

या वळणावर



या वळणावर 

न जाणे किती वर्षे झाली 
मी उभा आहे 
तुझी वाट पाहत 
आयुष्याच्या या वळणावर 
दिवस उलटत आहेत 
रात्र उमलत आहेत 
अन् जीवनचक्र 
पुढे पुढे सरकत आहे 

पण ते वळण अन् मी 
तिथेच आहे . . . .
त्या क्षणात गोठलेला 
प्रतीक्षेचा पुतळा झालेला 
माझ्या डोळ्यात आहे 
अजूनही तीच उत्कंठा 
तुला पाहण्याची 
माझ्या काळजात आहे 
अजूनही तीच आस 
तुला भेटण्याची 
मी शोधतो गंध 
तुझी चाहूल देणारे
मी पाहतो स्वप्न 
तुझा भास जागवणारे

निराशेची गडद काजळी 
टाकत आहे मला वेढून 
माझे भोगी मन 
हसते मला खदखदून 
दाखवते वेडावून 
आयुष्य व्यर्थ गेले म्हणून 
पण मला माहीत आहे 
तू भेटशील तर इथेच 
अन्य कुठेही नाही 

तुझी प्रेम भरली गीते
राहातो मी गुणगुणत 
तुझ्या विव्हळ विराण्यात 
राहतो मी आक्रंदत 
पण तू येशील ना रे ?
फक्त एकदाच ये 
एक अन् फूल मोगऱ्याचे 
अन् मला दे 
बस एवढेच मागणे आहे

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २ जुलै, २०१८

पारधी व पक्षी

पारधी व पक्षी 
********

फाटलेले पंख 
शिवण्याचा दोरा 
शोधतांना गेलो 
पारध्यांच्या घरा 

त्यांनी दिले छान 
गोड खानपान 
नि म्हटला घेरे 
पिंजरी बसून 

तयाच्या प्रेमाला 
विकलो हरून 
म्हटलो हवे तो 
घे पंखही कापून

आकाशाची याद 
गेली हरवून 
चरबीने अंग 
गेले नि फुगून 

आता जुळलेले 
पंखही असून 
उडणे परंतु 
येईना घडून 

हसतो पारधी 
पाहतो मोजून 
म्हणे येईल रे 
तुझा तोही दिन 


डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, १ जुलै, २०१८

डॉ.तांबे एक अजात शत्रू मित्र


डॉ.तांबे एक अजात शत्रू मित्र
**********************

काही व्यक्तींशी कुणाचेही
शत्रुत्व होवूच शकत नाही
अश्या मोजक्या व्यक्तीत
नाव येईल तुझे मित्रा  

गुण दोष सार्‍यातच असतात
पण ते इवलाले दोष
सहज विसरून जाता यावेत
इतके गुण घेवून आलास तू

चाकोरीतील शांत जीवन
सहज मान्य होते तुला
अन मिळालेल्या जीवनाचे
उपकार स्वीकार होते तुला

ती भावना हृदयात बाळगून
तू पाहिलेस जणू रुग्णांना
आणि जमवलीस माणसे
देवून तिलांजली अभिमाना

तसा चिडायसाच ही तू
बर्‍या पैकी वैतागायचास तू
कोकणातील आग शब्दात
सहज आणायचास तू

पण जोडलेली माणसे कधीही
तुटू द्यायचा नाहीस तू
अन चुकलीच यदाकदाचित तर
स्वागताला सज्ज असायचास तू

प्रेम करून माणसे हृदयी ठेवयाची
का राग करून मनात ठेवायची
निर्णय ज्याचा असला तरीही
तुझ्यासाठी दूसरा झालाच नाही

म्हणूनच तुझ्या सरळ सोप्या
अन घोळकयात रमणार्‍या
व्यक्तिमत्वाला आमचा
पुन:पुन्हा सलाम मित्रा !

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





शनिवार, ३० जून, २०१८

भरोसा



भरोसा


साऱ्या वाटा सुटल्या आहेत 
साऱ्या दिशा मिटल्या आहेत
आता फक्त तुझाच भरोसा 
काही आशा उरल्या आहेत 

पायाखालती आधार नाही 
सोबतीस या संसार नाही 
प्राण ठेविले पायी तुझिया
काय तरी तू येणार नाही 

प्रीती  वाचुनी भक्ती जळते 
आरंभा विना कर्म मरते 
आणि तरी खुळचट आशा 
तेच मनस्वी स्वप्न मागते 

ये तू देही म्हणते जीवन 
सर्वस्व मी करीन अर्पण
पण कुणाच्या चाहुली विन
सांज तमी जाते  हरवून  

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 

भार



भार
***

जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा
भार होतो कुणालाही
अगदी जाणून बुजून
अथवा कळत नकळतही
तेव्हा याचा अर्थ
असाच निघतो की
तुम्ही खरोखर लायक नाही
निखळ मानव्याची
प्रांजळ बिरुदावली मिरवण्यासाठी !

सत्तेचा दंड हातात आल्यावर
येणारी कठोरता
अपरिहार्य असेलही
कधीकाळी केंव्हातरी
पण लोकांनी तुमचा
आदर करायचा सोडून
द्वेष करावे असे वर्तन
घडते तुमच्या हातून
तेव्हा नक्कीच समजा
तुम्हाला माणूस व्हायचे
बाकी आहे अजून

आयुष्यात दुःख अपमान
पराभव अन्याय येतो
साऱ्यांच्याच वाट्याला
गरज नाही मधुरता मिळेल
हाती आलेल्या प्रत्येक फळाला

त्या न जिरलेल्या दुःखाची वाफ
भाजवत असेल तुम्हाला
त्या ठसठसणाऱ्या अपमानाच्या
असह्य वेदना डसत असेल
तुमच्या काळजाला
त्या जळलेल्या सुखाच्या धुराने
अंधत्व आले असेल डोळ्याला

अन् या नको त्या गोष्टी घेऊन
वावरत असाल तुम्ही
तर खरंच सांगतोय
या जगाच्या पाठीवर
तुमच्या एवढे दुर्दैवी कोणीच नाही

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...