शनिवार, ९ जून, २०१८

तूच


तूच ...
*****
तुच माझे स्वप्न आहे
चांदण्यात सजलेले
तुच माझे गाणे आहे
शब्द लेणी कोरलेले

तूच वेडी कांक्षा माझी
रात्रंदिन वाहिलेली
तू तितिक्षा जीवनात
सदा उरी साहिलेली

तूच तप्त तप आहे
डोळीयात मांडलेले
नाव तुझे ओठी माझ्या
प्राण तुला वाहिलेले

तूच सूर्य नभातील
कणकण व्यापलेला
तूच आत बाहेर तू
जाणूनी न जाणलेला

सांगणे काहीच नाही
मागणे आणिक काही
तृप्त असा तुझ्यात मी
वेगळे काहीच नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ८ जून, २०१८

जलदा ओंकारा


जलदा ओंकारा

निळूल्या सागरी

सावळी साऊली
हर्षाच्या पावुली
वर्षा आली

सरला वणवा

सरली काहिली
आतूरही झाली
अवनी सारी

मोडली बांधली

घरटी कावळी
मोरनी धावली
रिंगणात

आता बरसेल

प्रिय घननिळ
सुखाने भरेल
जीव सारा

निरपेक्ष कृपा

करिसी अनंता
सृष्टीची ही सत्ता
म्हणउनी

जलदा ओंकारा

उदारा कृपाळा
नमूं कोटी वेळा
प्रभू तुला


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ५ जून, २०१८

सांज मैफिल



सांज मैफिल

खूप खूप वर्षांनी
जुन्या मित्रांच्या कोंडाळ्यात
गावाच्या वेशीवर
असतांना भटकत
आठवणींचे मोहळ
असतांना जागवत
येऊन ठेपली सांजवेळ
प्रकाश वस्त्र आवरत
अशोक  गप्प्या राजू दिलीप
किती बोलू किती सांगू
असंख्य घटना शब्द कथा
प्रत्येकाच्या गाठोडित

पाखरांची किलबिल हळू होत गेली
विंचरणेची खळखळ जाणवू लागली
दूरवर स्टँडवरचे दिवे लागले
अन् मित्रांचे पाय घराकडे वळू लागले

त्या संध्याकाळी
आम्ही वाटलेली असतात
हरवून गेलेली कित्येक वर्ष
भरलेल्या असतात
अनेक रिकाम्या जागा
अन सोडवलेली
कित्येक अधुरी उदाहरण
ते बाक ती शाळा ती घंटा
ते खेळ ते क्रीडांगण तो धिंगाना
एका सांजेत उलगडलेले सारे बालपण

तो पूल ते पाणी तो वारा
त्या गप्पा ते हास्य त्या टाळ्या
या सार्‍यांचे जणू
एक रसरशीत तैलचित्रच
होऊन बसले आहे मनात
भूतकाळाच्या दिवाणखान्यात
अन कुठल्यातरी निवांत क्षणी
पडताच त्यावर नजर
ओघळतात त्यातून अजूनही
तेच ते निरागस मैत्रीचे रंग
गहिऱ्या सांजरंगात मिसळून
गप्पांच्या मैफिलीचा कलौळ
टाकतो आसमंत भरून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in



सोमवार, ४ जून, २०१८

सांज लय


सांज लय

सांजवेळी एकटाच
घराच्या मी छतावर
पश्चिमेचे गार वारे
घेत मंद अंगावर

न्याहाळत होतो सुर्य
तदाकार होत होत
विसरले देहभान
जाणीवेला आक्रसत

कृष्णमेघ इवलाले
भेदूनिया मज गेले
किरणांचे मृदू स्पर्श
अंतरात उतरले

हळू हळू मीच झालो
माझ्यातील आकाशाचा
अंतरात मग फूटे
झरा एक आनंदाचा

जाणिवेत उमलले
लक्ष ग्रह गोल तारे
विश्व होतो पाहात मी
कवळून सारे सारे

सांजवेळ झाली तेव्हा
वेळ सुवर्ण साजरी
कृष्णजींचे शब्द गुढ
रुणझुणले अंतरी

कालातीत असे काही
मज भेटुनिया गेले
नामातीत गुढगम्य
अंतरात उमटले

(कृष्णजी=जे.कृष्णमूर्ती )

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ३ जून, २०१८

सांज भेट



सांज भेट 

तू भेटलीस मला एका दुपारी अन 

थांबलीस सांजवेळ होईस्तोवर 
तुझे लाजाळू शब्द होत गेले धीट 
तुझी झुकलेली नजर होत गेली तिखट 
तुझे बुजणारे स्पर्श होत गेले अविट
ती संध्याकाळ होती जणू एक जादूई गीत 

तू काय बोललीस कुणास ठाऊक 

मी काय बोललो तेही न आठवत 
डोळे होते तुला नजरेत साठवत 
अन् मन तुझी प्रतिमा रेखाटत 
एक ओळख विणत गेली घट्ट मैत्रीत 
एक वृक्ष बहरत गेला भर ग्रीष्मात 
एक दार उघडले मिट्ट काळोखात 
प्रकाशदूत होत आलीस तू जीवनात

तिला संध्याकाळ कसे म्हणू मी 

खरं तर तो एक उष:कालच होता 
स्वप्नांचे अलौकिक रंग घेऊन आलेला 
किंवा सकाळ दुपार संधीकाळ 
जणू त्या एका क्षणात एकवटला 
तेव्हापासून लखलखीत झाले जीवन 
पुन्हा कधीही झाकोळलेच नाही 
कुठल्याही कारणाने 
कुठल्याही शंकेने कुठल्याही संकटाने 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.in

सांज स्मृती



सांज स्मृती

सांजवेळी तुळसीला
आई लावे दिवा जेव्हा
मन भरे प्रकाशाने
देव आहे वाटे तेव्हा

सोनियांच्या प्रकाशात
अवतरे वरदान
कृतकृत्य होई मग
घरातला कणकण

परिचित मृदगंध
घुंगरांची खळखळ
मौन घेतल्या वृक्षांची
कानी पडे जपमाळ

येई दुरून कुठून
स्वरगंगा आळवली
गंध भाकरीचा ताजा
दिसे चूल पेटलेली

माझ्या मनातला गाव
जरी हरवला आता
कुण्या सांजेला एकांती
मज दिसे चित्रकथा



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १ जून, २०१८

ज्ञान



ज्ञान

कसले ज्ञान नि
कसले अज्ञान
शब्दांनी अंगण
भरलेले ।।

पृथ्वीच्या गतीने
सूर्याचे दर्शन
येतसे घडून
रोज नवे ।।

कसले शेवाळ
दूर ते सारणे
तृष्णेच्या कारणे
कृती होय ।।

कुठाय साप ते
उघडे  चंदन
नेलेत तोडून
तस्कराने ।।

मनात हडळ
धनही मनात 
फाटकी लंगोट
जन्मभरी ।।

असू देत मला
प्रकृतीचा सोस
देवा तुही भास
एक आहे ।।

प्रकृती पाहून 
विक्रांत शीणला
पोटाला रिघाला 
पुरुषाच्या  ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...