शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

नर्मदा




नर्मदा

तिथे गेल्यावर
मी माझा नुरतो
आकाश होतो
निळेशार ॥
तिथे गेल्यावर
मी माझ्यात मुरतो
धरती होतो ॥
हिरवीगार
तिथल्या घाटावर
लहरत असतो
पाणी होतो
धुवाधार ॥
तिथल्या तटावर
मृत्तिका होतो
विखरून जातो
हळुवार ॥
तिथल्या वाटावर
सारे हरवतो
फक्त होतो
तदाकार ॥
माय नर्मदा
मी तुझे लेकरू
घे ह्रदयी मज
एकवार ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

जाणिवेची ज्योत





जाणिवेची ज्योत


मनाचिया आत
जाणिवेची ज्योत
पाहते सतत
जगण्यास ||

पाहणे पाहते
वेगळी उरते
क्वचित दिसते
क्षणभर    ||

तिचे ते अस्तित्व
कधी मज कळे
अंतर उजळे  
क्षणभरी ||

पुन्हा जगण्याचा
उधळतो वारा
कैफाचा धुरळा
कोंदाटतो ||

पुन्हा डोळ्यामध्ये
जमा होते पाणी
मिटते पापणी
आपोआप ||


घडावे जगणे
कळावे जगणे  
अस्तित्व फुटणे
गूढ गम्य  ||

विक्रांता कबुल
क्षणी या मरणे
परी ते पाहणे
घडो दत्ता   ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

पाहणे

पाहणे
****

पाहणे हे माझे
मजला कळले
अंतरी दिसले
नसलेले ॥

निद्रेच्या कुहरी
स्वप्नांचा मेळावा
सजला देखावा
पटावीन ॥

मिटला कोल्हाळ
बाजार उठता
शांतीचा बोभाटा
तोही नाही ॥

गेला अवधूत
करूनी दीवाना
विक्रांत शहाणा
रिक्त झाला ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
htttp://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

उ:शाप तू


या माझ्या अंधार यात्रेत
कवडसा एक झालीस तू
जगण्याला अर्थ नवा नि
प्रकाश घेवून आलीस तू   

म्हटले तर जळणे होते
भोवताली धूर ओढून
म्हटले तर मरणे होते
उगाचच आत कुढून

जसा हलका वारा येवून  
उगा जावी ठिणगी पेटवून
आलीस अवचित तशी तू
जगणे माझे गेले उजळून

चकित झालो माझा मी
धडधडणे माझे पाहून
कल्मष जणू होते जिणे
उ:शाप तू आलीस घेवून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

येणे तुझे



येणे तुझे

येणे तुझे चांदण्याचे 
हिमशुभ्र शरदाचे 
उमलते भान माझे 
निवळत्या काळोखाचे

झिरपते हास्य तुझे
गात्रांतून खोलवरी
जीवनाला अर्थ नवा 
येतो पुन्हा क्षणभरी 

अभ्राविन नभ रिते
दूरवरी मंद तारे
तुझ्या पावलांचे गाणे
अंतरात थरथरे 

जमवून जग सारे 
रिक्त आहे झोळी माझी 
ओंजळीत जागे अन
वेडी खुळी आशा तुझी 

तुटलेल्या कड्यावर
जरी उभी जिंदगानी
पिस पिस होते पु्न्हा
हिंदोळते नभांगणी

डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

पाथेय ..

पाथेय ..

हे सुख दु:खाचे पाथेय
घेवून जगतोय मी
याला वरदान म्हणावे की
शासन म्हणावे मी

या सुखाच्या संवेदना
या दु:खाच्या वेदना
मनामनातून फुटणाऱ्या
अनिर्बंध उसळणाऱ्या
या असंख्य भावना
इतके दिलेस तू
जे कधीच संपत नाही

कोणत्या शिदोरीतून
तू कुणाला काय दिलेस
याचाही पत्ता नाही
अन मला खरेच कळत नाही
काही गरज होती का यांची  

पण पोट तर भरलेच पाहिजे
आंबट तिखट गोड कडू
पर्याय नाही
नाहीतर जगता कसे येईल

बऱ्याच वेळा मी ठरवतो
फेकून द्यायचे तुझे हे गाठोडे
अन घ्यायचे इथलेच स्वच्छेने
जे हवे ते जसे तसे
पण..कळते
मी जे घेतो जे शोधतो  
माझे म्हणून घेतो
ते ही तू दिलेले पाथेयच असते

माझे मला मी अन ...
तुझे तू दिलेले प्राक्तन   
नाकारणे हे सुद्धा !!


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

प्रतिक्षा



प्रतिक्षा
******

तुझ्या प्रतीक्षेचे ओझे
घेऊन थांबले आहे
येथील तू कधी तरी
श्वासात उरले आहे


अस्तित्वाचा प्रश्न उगा
होवूनी शिणले आहे
तो तुझा स्पर्श होण्यास
बहु आतुरले आहे

स्मृती विभ्रमात अन्
चिंबशी भिजले आहे
किती लोटली युगे मी
काळोखी बुडाले आहे

येशील ना रे आता तरी
माझ्यात मिटले आहे
ओठांवरी गाणे जुने
होऊन सजले आहे

तुझ्यास्तव रंग नवे
मी आकाश झाले आहे
जगण्याचे स्वप्न उरी
घेऊन बसले आहे

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...