गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

जाणिवेची ज्योत





जाणिवेची ज्योत


मनाचिया आत
जाणिवेची ज्योत
पाहते सतत
जगण्यास ||

पाहणे पाहते
वेगळी उरते
क्वचित दिसते
क्षणभर    ||

तिचे ते अस्तित्व
कधी मज कळे
अंतर उजळे  
क्षणभरी ||

पुन्हा जगण्याचा
उधळतो वारा
कैफाचा धुरळा
कोंदाटतो ||

पुन्हा डोळ्यामध्ये
जमा होते पाणी
मिटते पापणी
आपोआप ||


घडावे जगणे
कळावे जगणे  
अस्तित्व फुटणे
गूढ गम्य  ||

विक्रांता कबुल
क्षणी या मरणे
परी ते पाहणे
घडो दत्ता   ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...