बुधवार, १४ मे, २०१४

दत्ताळलो आम्ही




दत्ताळलो आम्ही
भक्ताळलो आम्हीं
विरक्तीच्या पथी
रक्ताळलो आम्ही

तया प्रेमा साठी
आतुडलो आम्ही
शब्दांच्या बुडाडी
गोंधळलो आम्ही

लय सूर ताली
नादावलो आम्ही
घडेनाच काही
पस्तावलो आम्ही

बोलाविल्या विना
द्वारी आलो आम्ही
प्रतिक्षेत जन्म
खंतावलो आम्ही

कधी रानोमाळी
भटकलो आम्ही
शोधात तयाच्या
हरवलो आम्ही

पाशात व्यसनी
सापडलो आम्ही
न राहिलो जिते
वा न मेलो आम्ही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/










मंगळवार, १३ मे, २०१४

प्रिये वाचून निराश





आम्ही उदास उदास
प्रिये वाचून निराश |
कुठे शोधू ते कळेना
कसे शोधू ते कळेना
शत सहस्त्र पहिल्या
परि मिळेना ती खास |
किती केल्या आटाआटी
गावे घातली पालथी
पुरा होईना अजुनी
माझ्या जीवाचा या ध्यास |
धर्म जात ओलांडली
कुठे फिल्डिंग लावली
साऱ्या जाहल्या पसार
उरले हातात भास |
आता दिसताच कुणी
रस्त्यावरती लावण्यी
स्वप्न खळ्ळकते आत 
लागे काळजास  फास  |

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १२ मे, २०१४

तुझ्या प्रसन्न हसण्यातून






तुझ्या प्रसन्न हसण्यातून
अन बोलक्या डोळ्यातून
एक चैतन्य उमटते
श्वासामध्ये संगीत होते

तुझ्या नितळ ओठातून
अन सावळ्या कांतीतून
एक सौदर्य पसरते
मला मंत्रमुग्ध करते

तुझे बोलणे रोखून पाहणे
आणि सहजतेने वावरणे
माझे मन मोहून टाकते
तुलाच फक्त पाहत राहते


तू रागावून ओठ दुमडून
बोले लटका आव आणून
माझे जगणे कविता होते
शब्दावाचून गाणे गाते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...