शनिवार, २९ जून, २०१३

प्रश्न अधांतरी






निष्पाप कळ्या अकाली

पडती जेव्हा गळुनी

या न त्या कारणांनी

जातो मोहर झडुनी



काय म्हणावे असल्या

या शापित प्राक्तनाला

लागे ना अर्थ इथला  

मज कश्याचा कशाला



असे जन्म काय सारा

अपघात मालिका हि ?

नच माझ्या हाती काही

वा न तुझ्या हाती काही



मरणात थांबलेले

प्रश्न अधांतरी सारे

मज नकोच कुणाची

उगा छापील उत्तरे



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/




गुरुवार, २७ जून, २०१३

तो गेल्यावर ........




तो आता मरून गेला आहे
तो जाणार हे माहित होत
तो गेल्यावर खूप खूप
रडू येईल अस वाटत होत
पण रडू फुटलेच नाही.
सव्वीस वर्ष संसाराची
त्याची माझी अन
या वन रूम किचनची
दोनच रूम दोनच जीव
तिसरा स्वर गुंजलाच नाही  
सार स्वीकारलेली मी
त्याची बेकारी
त्याची व्यसन
त्याच आजारपण
माझे घरात अन घराबाहेर
रात्रंदिन खस्ता खाण ...
काहीच नाही तरीही
त्याचा आधार होता
उभ्या पिकात
बुजगावण्या सारखा
तो संसारात उभा होता
आता त्याच्या जाण्यामुळे
तसा फरक पडणार नाही
सारे ऋतू गेले पिकांचे
जमीन कधी फुलणार नाही
फक्त आठवण ठेवावी लागेल  
घरा बाहेर जातांना
कि आता कुलूप लावल्या शिवाय
कुठेही जायच नाही

या साऱ्याकडे किती
कोरडेपणे मी पाहत आहे    
नको वाटत असूनही
सुटकेची एक जाणीव
मनात दाटून येत आहे
वन रूम किचन आता
केवढे मोठे वाटत आहे


विक्रांत प्रभाकर         
http://kavitesathikavita.blogspot.in/






सोमवार, २४ जून, २०१३

नाचणारी मुलगी



एका पायावरती नाचत
लहानगी ती थबकत थबकत
चाले आपुल्या नादात
बे दुने चार बेत्रिक बेत्रिक
बोबड गाणं काही गात
एक वेणी सुटलेली 
केसं हि होती विस्कटली
पाठीवरती दप्तर भरली
शाळा नुकती सुटलेली
होतो तिजला पाहत,हासत
मज पहिले तिने वळत
जरा थांबली ती क्षणभर
अन गोड हसली गालभर
मान आपुली तिरकी करत
अमुल्य स्मित मजला देत
मग पळाली वाऱ्यागत
ते स्मित इतके लोभस होत
कि बालपण मम हृदयात
अलगद उमलले झंकारत
कंपणात स्मृती लहरीच्या
मग मीही गेलो तसाच वाहत
एका पायावरती नाचत
तेच तिचे गाणे म्हणत ,
बे दुने चार बेत्रिक बेत्रिक

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २३ जून, २०१३

साहेबाची व्हिजीट

साहेब येणार उद्या दौरयावर
व्हिजिट देणार 
ऑफिसला
काढा जळमट करा झाडलोट
कंपाऊंड गेट
रंगवून घ्या
उचला ढिगारे मातीचे सारे
जुनी अवजारे
लपवा ती
देण्यास सलामी प्यादे युनिफोर्मी
जरी कुचकामी
उभी करा
साबण आणावा संडास रंगवावा
टेबली ठेवावा
पुष्प गुच्छ
नवे पायपोस कपबश्या ग्लास
तत्पर दास
लावा कामी
शेलक्या फायली कामे झालेली 
समोर ठेवली
पाहिजे तया
एकच दिवस सोसायचा त्रास
नंतर उदास
सर्व काही
येतील साहेब जातील साहेब
होतील गायब
पेन्शनात
दरसाली पण येईल फर्मान
करण्या दाटून
सरबराई
जग भित्रयांचे रोजी नि रोटीचे
तयास सत्तेचे
सदा भय

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, २२ जून, २०१३

भयाकुळ पावूस




सावळ्या लाटा आकाशी बेफान
सडसडते आसूड फुटती धारातून
रानटी वारा धावे पिसाटून
कानात पाशवी भेसूर घोंगावून
वृक्ष कडाडत पडले उन्मळून
हिरव्या वेलीही भरल्या कुंकवान
धुकट काळोख सर्वत्र झिरपून
चिंतेचे सावट दाटले विषण्ण
काळीज फाटे विजा चमकून
कापरे देहात मेघ गडाडून
पक्षांची घरटी मातीत पसरून
शोधती निवारा कुठे फडफडून  
गोठ्यात गुरे निश्चल थबकून  
भयाची सावली सर्वत्र दाटून
दार अंगण जलमय होवून
वाहते घरदार वाटते चमकून  
पडवीच्या पत्र्याचे तांडव वादन
शब्द रवात गेले हरवून
कुण्या घराचा पत्राही उडून
पडे कडाडत अंगणी येवून
ठिबकू लागली कौल कुठून
भांड्यांनी घर गेले भरून  
कधी सांजावले आले नाकळून
सर्वांगाचे मग होऊन कान
उरे कानोसा भये थिजून
देवा विठोबा वाचव यातून
हतबल शरण चिंतीत मन

विक्रांत प्रभाकर              
http://kavitesathikavita.blogspot.in/


शुक्रवार, २१ जून, २०१३

तडजोड





एक हात उशीखाली
एक पाय लोडावरी
येत ऐकू श्वास जरी
योजनांची होती दूरी

तडजोड करुनिया
मन होते थकलेले
मानलेल्या सुखापायी
अर्धे वय वाया गेले

जसा तिने सांभाळला
तसा त्याने फुलवला
एका वेड्या हट्टापायी
ऋतू सारा वाया गेला

उद्या येता पुन्हा जाग
पुन्हा डबा करायचा
त्याने त्याच्या चाकरीचा
तोच रस्ता चालायचा

विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...