जालिंदर नाथ
**********
वैराग्य अग्निच
जगी प्रगटला
धरेवर आला
जालिंदर||
काय सांगू त्यांच्या
वैराग्याची कथा
क्षणी राजसत्ता
लाथाडली ||
संसार समस्त
जाणुनिया व्यर्थ
जाहला प्रबुद्ध
अंतर्यामी||
निर्जर वनात
निर्भय होऊन
निजाचे कल्याण
शोधतसे||
असुनी मदन
जाहला संपूर्ण
वैराग्य संपन्न
अग्नीसवे||
स्वयम् अग्नीदेवे
तयाला वाहिले
दत्तपदा नेले
शिष्यत्वास ||
दत्तकृपा पूर्ण
जाहला सज्ञान
कृतार्थ जीवन
सारे केले ||
कानिफाचे नाथ
झाले गुरुनाथ
वाढविला पंथ
दाही दिशी ||
ऐसा तपी थोर
नाथ जालिंदर
तया माथा भार
वायु वाहे ||
मैनावती तात
असूनी समर्थ
राहिला लीदीत
समाधिस्थ ||
क्रोधाच्या कौतुकी
जाळल्या त्या मूर्ती
गोपीचंदा अंती
नाथ केले ||
अहो कृपा मूर्ती
नाथ जालिंदरा
घेऊनी अंतरा
वास करा ||
मागतो विक्रांत
तुम्हाला वैराग्य
करा पदा योग्य
महाप्रभू ||
© डॉ.विक्रांत
प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
http://kavitesathikavita.blogspot.in
3/2/20
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा