मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

॥ श्री ज्ञानेश्वर माऊली ॥



‍ॐ नमो ज्ञानेश्वराय ।
दिव्य स्वयंप्रकाशाय।
महानंदस्वरुपाय।
चिद्घनमुर्ते॥

मी बालक तुझा नेणता ।
ना कळे मार्ग चालता।
धरुनिया तू हाता ।
ने ई गे माय॥

घोर या संसार वनी ।
पडलो मी येऊनी ।
कडेवर घेऊनी ।
नेई गे माये ॥

कर्म काही कळेना ।
स्वधर्म हाती येईना ।
अंधकार मिटेना ।
सांभाळ गे माय ॥

भक्तीची वाटा।
नेई मज आता ।
पांगुळ मी पडता ।
चालवी गे माये ॥

विक्रांत हा भ्रमाला।
मायेत या अडकला ।
तव प्रेमा आसावला।
धाव गे माये ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

सोमवार, २९ जानेवारी, २०१८

तेव्हा दारात

तेव्हा दारात

तेव्हा तुझ्या दारात मी
असाच उभा नग्न होतो
लेवून साज सर्व सुखांचा
तसाच तेव्हा भग्न होतो

मोडून पाय गेले तरीही
चढलो सहस्त्र पायऱ्या
पाहशील तू कधी तरी
स्वप्नात फुका मग्न होतो

सरून तपे गेली किती
बदलून हि जगरहाटी
घेऊन हाती कटोरी मी
जणू की पाषाण होतो

म्हणती दयाघन ते तुज
येतो स्मरता क्षणात तू
म्हणतो निष्ठुर परि कुणी
अन उदास उद्विग्न होतो

बोलाविले भले तसे तू
दर्शनही जड दिले जरी
घडले ते खरेच का वा
पाहत ते एक स्वप्न होतो

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

त्रिमूर्ती दयाळ



कासाविस प्राण
उरी उलघाल
त्रिमूर्ती दयाळ
केवीं भेटे

मायेविन तान्हा
क्षुधेने व्याकुळ
रूदन केवळ
जाणतसे

भेदरे पाडस
होता ताटातूट
आर्त काळजात
पडे तैसे

मागे बहुतांसी
भेटला कृपाळ
जगण्याचा आळ
घालविला

म्हणून ही आशा
बांधली पोटास
लावला पणास
जीेव असा

उघड रे डोळा
वा मिटव डोळा
विक्रांत निराळा
ठेवू नको



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २० जानेवारी, २०१८

|| मुर्त फुटली ||




|| मुर्त फुटली ||


मीपणे धरली
मुर्त फुटली
विदीर्ण झाली
पुन्हा माती

जिथला कण
तिथेच गेला
भार वाढला
नच भूमीचा

म्हटले तर
मी होतो तिथे
तरीही  नव्हते
माझे पण

असून नसणे
खरे जाहले
बीज फुटले
उरातले

नव्या अंकुरी
होतो फुटलो  
आणिक उरलो
दुजा कुणी  


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

बाहूत माझ्या

  

तू तर सदैव बाहूत माझ्या       
तुला दूर कसा करू मी
श्वास गंध भारले सांग
तया दूर कसा ठेवू मी

खरच नको बोलू  ?
बर मग नंतर कधी तरी  ?
तू हि पण !!
 कसला विचार करतेस
 बोल ना ?
..........”

तू कशी दिसत असशील ,
कोणता वेष घेतला असशील  ,
किती छान दिसत असशील  
असेच काही विचार
भरकटत येतात मनात
आणि अंतराच्या शापाने
कसमसते या मनात

आता वाऱ्याने तुझे केस
उडत असतील ना ?
मला त्यांचा स्पर्श होत आहे
मग मी वाऱ्याला मागे सारत
तुझे केस सावरत आहे

तू उगाच हसून वळवून
लाजून खाली पाहत असशील
त्या हसण्याचे चांदणे
उलगडते माझ्या मनात


मी किती प्रेम करू तुजवर
मी कसे प्रेम करू तुजवर
अस्तित्व हे मिटून माझे
मी घ्यावे तुझेपण


किती कविता आहेत आत
आणि त्या आहेत भांडत
कोण बाहेर येणार म्हणून

एकीला तू अडवतेस ,
घेवून वेड्या मिठीत
तिला अजून छान व्हायचे असेल
 म्हणून कदाचित ..

पण हे जगणे नक्कीच स्वप्न असावे
शब्दाला फुटलेल्या अंकुरा सारखे !!

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in





मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

निरागस चेहरा

निरागस चेहरा
 **********


हासून पाहणारा
निरागस चेहरा
हसऱ्या ओठांचा
दुमडला कोपरा ||

चांदण्यांचे स्वप्न
गात येतो वारा
मनातील वादळा
मिळे एक किनारा ||

डोळ्यातून उघडे
ऋतू एक कोवळा
मर्यादेचा पारावर
धुंद पिंपळ नाचरा

काय तुला देऊ कळेना
जन्म कसा वाहू कळेना
जाणतो माझीच तू
परी अंतर ते ढळेना

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

रविवार, १४ जानेवारी, २०१८

आसक्ति





आसक्तीच्या डोही 
बुडू गेले प्राण 
सुखाचे प्रमाण 
अाकळेना .

मोहाची सावली 
हातात येईना 
जीवास कळेना 
लोभ क्षोभ .

तेलासवे वाढे 
वन्हीचा आकार 
जाहला प्रकार 
तैसा काही 

विझूनिया गेला 
दीप हातातला 
अंधारे गिळला 
मार्ग माझा .

ज्ञानाचा प्रकाश 
पाडी ज्ञानदेवा
सत्संगाचा ठेवा
द्यावा मज ।

विक्रांत हिंपुटी
तुझ्या दारावर 
मागे चतकोर 
प्रेम तुझे ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...