सोमवार, ८ जानेवारी, २०१८

प्रतिमा तुटली




काच फुटली
प्रतिमा तुटली
सहज जाहली
अस्तंगत ||

होतो एक मी
अनंत झालो
विखरून गेलो
कणोकणी ||

दिसल्या वाचून
नसणे लेऊनी
स्पंदन होऊनी
कालातीत ||

प्रश्ना सोबत  
उत्तर गिळले
तरीही उरले
होते काही ||

त्या असल्याचे
शब्द हे झाले
अन् प्रसवले
शून्यातून ||

हर हर शंकर
दत्त दिगंबर
जय ज्ञानेश्वर
नामरूपी    ||

त्या शब्दांचा
हा देह जाहला
वस्त्रही ल्याला
निशब्दाचा ||

सरली अवघी
आता फडफड
आणि धडपड
देह रुपी ||

या  विक्रांतची
मूस बदलली
मूर्तीही जाहली
आरपार  ||

आघाता विना
होते डिम डीम
सोहम सोहम
सर्व काळी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

दर्शन हेळा मात्रे

दर्शन हेळा मात्रे ************ पायावरी माथा होता माथेकरी कुठे होता  क्षण काळ हरवला  क्षण सर्वव्यापी होता ॥ युगे युगे म्हणतात  हर...