रविवार, २३ जुलै, २०१७

रस्ता झाड आणि मृत्यू




रस्ता झाड आणि मृत्यू 

सहज चालता पथावर
दोन पावलावर मृत्यू होता
जो कुणास ठावुक नव्हता
सारे संपले एका क्षणात
झाड कोसळले सवे देहलता  
ती तिथे त्या घडीला
अशी नकळे आली का ?
अन ते झाड जीर्ण झाले
तेव्हाच असे कोसळले का ?

दोन क्षणांचा होता उशीर
तर कदाचित  
टळला असता तो मृत्यू
दोन दिवस जर अगोदर
तोडले असते ते झाड
तर कदाचित
घडला नसता तो मृत्यू  

जरतरचे असे आरोप
उगाच कुणावरती करूनी
ती पोकळी अस्तित्वाची
येणार नाही कधीच भरूनी
पराधीनता सर्वव्यापी
झाली साकार पुन्हा एकदा
क्षण भंगुरता या देहाची
जीवन अन जगण्याची
आली समोर पुन्हा एकदा

आणि कदाचित
आज उद्या कधीतरी ही
असेच होइल माझेही काही
मनात शंका येई नकोशी
हतबलता अन क्षुद्रपणाची
मानवाच्या लाचारीची
मना मनातून जाई लहरत
थंड शिरशिरी देही उमटत


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...