सोमवार, ३० मे, २०१६

वाकड्या वाटेनी कधी नाही गेलो





वाकड्या वाटेनी कधी नाही गेलो
जगात राहिलो संभावित ||
प्रयत्ने मनाला कोंडून ठेविले
जरी का सुटले वेळोवेळी ||
असे नाही की रे जाहल्या न चुका
वल्गना त्या फुका करू कश्या ||
केली झाडलोट शतदा मनात
फिके डाग आत अजूनही ||
त्रिगुणी जगात होतो मी वाहत
धरीयला हात तव दत्ता ||
कलले आयुष्य उभा मी दारात
कारे या घरात येत नाही ||
आकांत कराया अश्रू नये डोळा
धाव रे दयाळा अवधूता ||
विक्रांत पतित असो नसो किंवा
धरीयले तुवा हृदयात ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavitablogspot.in

गुरुवार, २६ मे, २०१६

कणोकणी दाटलेला






कणोकणी दाटलेला
दत्त डोळा माझ्या यावा
क्षणोक्षणी चाललेला
टाहो ओला सत्य व्हावा

गुणागुणी असे कळे
जीव चळे पांघराया
मनोमनी सर्वसाक्षी
चित्ता हवे जाणावया

काय माझी चूक देवा
जीवनाला स्पर्श नाही
वाहतो हे श्वास ओझे
दंड हा ही कमी नाही   

नावाला विक्रांत असे
जगण्यात दम नाही
दत्ता तुझ्याविन जिणे
अन्य दुजा भ्रम नाही

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavitablogspot.in

सोमवार, २३ मे, २०१६

श्री गोरक्षनाथ






मच्छिंद्रा लाभला गोरक्ष सुभट

लेइला मुकुट नाथपंथ ||

काय त्याचे रूप शिव तो प्रत्यक्ष

सदैव अलक्ष निरंजनि ||

शिष्य मच्छिंद्राचा गुरु गहीनीचा

भक्त श्री दत्ताचा अलौकिक ||

कैसे एक एक गोळा केले रत्न

फेडीयले ऋण जगताचे ||

शाबरी कवित्व ध्वनीशास्त्र थोर

तपाचे अपार पुण्य पाठी ||

गोरक्ष झोळीत हरेक साधन 

मोक्षाचे आंदण सकळांशी ||

विक्रांत नमितो शून्यात शिरुन

प्राणांची करून दिपज्योत ||



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/



शनिवार, २१ मे, २०१६

करुणा




यत्नांनी अवघे आयुष्य पोखरून
मी उभा आहे रिक्त हस्त अजून      
       
मी शोधत होतो      
धर्मात झाकलेले सुवर्ण  
भक्तीत बांधलेले रत्न
आयुष्याचा अर्थ अन  
सर्वव्यापी त्याचं असणं
   
दिवसा मागून दिवस      
वर्षामागून वर्षे उलटली      
 
 
किती पर्वत किती टेकड्या  
किती वाटा झाल्या तुडवून  
काळाचा हिशोब
कधीच चुकत नाही पण
थकली गात्रे सारी अन
त्राण गेले विरून      
   
आता
लटपटतात हात      
थरथरते मान
विझू पाहती श्वास      
अन कासावीस प्राण      
     
पण एकच गोष्ट ती
ठेवली मनी घट्ट धरून    
ती म्हणजे त्याची आठवन
त्याला जाणण्याचे भान
       
कारण मला माहित आहे
तो म्हणजेच      
त्याची करुणा!!

पूर्णविराम या
या कष्टाचा
श्रमाचा
तपाचा

म्हणूनच कदाचित
यत्नाचा कडेलोट होऊनही            
मनी निराशा दाटत नाही

कारण मी जाणतो
त्याची करुणा आहे    
सर्वव्यापी शुभंकर  
ओजस्वी पवित्रतं      
आनंदाचे निधान      
सर्व सुखाचे धाम    
जाळून सारे तम      
लखलखणारी प्रभा  
पुसून सारे मेघ      
प्रकटणारी आभा
युगायुगाच्या तप्त भूमीवर
ओघळणारी फुंकर      
रडणाऱ्या तान्हयासाठी  
उमटलेला हुंकार
       
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavitablogspot.in

रंग

रंग **** एक माझा रंग आहे  रंग माझा मळलेला  लाल माती चढलेला भगव्यात गढलेला ॥ आत एक धिंगा चाले  मन एकांतात रंगे घरदार अवधूत  स्वप्...