सोमवार, ११ एप्रिल, २०१६

शब्द काही लिहितो आहे




मनातून फुटतो आहे
शब्द काही लिहितो आहे
सारे जग माझ्यात अन
मी मलाच पाहतो आहे

कधी छान कधी नकोसे
सारे काही खरडतो आहे
उगा धुमसून पिसाटतो
तरीही शांत होतो आहे

माझे वृथा मिथ्य जिणे
फेकुनी मी देतो आहे
आणि एक नवा चेहरा
गीतात या पाहतो आहे

कधी भाळलो होतो फुलांना
काट्यात आज नाचतो आहे
प्राशतो मधुर विष वर
आणखीन मागतो आहे

जगुनिया मेले सुखानी
फोटो त्यांचे पाहतो आहे
जागा नाही जरी बाजूला
नवा खिळा ठोकतो आहे

पुण्य पर्वत मोठमोठे  
दत्तप्रभूस दावतो आहे
उंच पोखरल्या वारुळी   
अन सुखाने राहतो आहे  

आठवल्या वाचून कधीचे
व्रण जुने दाखवितो आहे
सोसल्याच्या प्रदर्शनात
विक्रांत मिरवतो आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...