रसिक एक भेटला
अन मजसी वदला
रे तुझ्या
कवितेतील
भाव मजला भावला
साऱ्याच कविता तुझ्या
करतो मी फोरवर्ड
येतेय वाहवा
मग
मजला बघ उदंड
वाटला आनंद
थोडा
दु:ख हि अन
दाटले
कविराज मनातले
खुट्ट बरेच
जाहले
थोडेतरी श्रेय
मला
नको काय मिळायला
काय जाते
याचे असे
कविता या चोरायाला
तोच मनी एकू
आली
वाणी एका
वानियाची
शब्दश्रीचा स्वामी महा
गाथा सांगे जीवनाची
जावू देरे
तूच नाही
एकटा शिकार
असा
नाव जावो
शब्द राहो
सोडू नको
तुझा वसा
लिहिणारा
असे कोण
वाचणारा आणि
कोण
ज्यास जे हवे
तयास
मिळणार त्याचे
दान
माझे तुझे
काही नाही
कोण किती
उरला रे
वाहू देत
साचलेले
मुक्त सांग
कोण झाले
कर्ज असे
कुणाचे हे
भार शिरावर दिला
देणारा तो
कुणी अन
घेणारा हि
ठरविला
तया शब्दे शांत जालो
चीड व्यथा
निवळली
घेणाऱ्या
घे हवे ते रे
इवली तव ओंजळी
डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita.blogspot.in