शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४

राजदत्त तांबे

राजदत्त तांबे 
**********
तसे तर राजदत्त तांबे 
हे माझ्या परीघाबाहेरी व्यक्तिमत्व . 
महानगरपालिकेच्या सूर्यमालेतील 
पगार रुपी सूर्याभोवती फिरणारे 
आम्ही सारे ग्रह तारे .
काहींची गती सोबत असते .
काही क्वचित भेटतात 
तर काही फक्त दिसतात . 
तर काही नजरेच्या टप्प्यातही येत नाहीत .
या  मध्ये तांब्याचे परिभ्रमण हे 
जवळ होत होते सोबत होत होते 
पण त्यांचे व माझेआभा मंडळ 
तसे एकमेकांना भेदत नव्हते . 
अगदी इच्छा असूनही .

पण त्यांचे भ्रमण डोळ्याला सुखवित होते .
त्यांचे व्यक्तिमत्व सदैव नम्र सौम्य 
सौजन्यशील आश्वासक व सहकार्याचे होते . 
त्यांचे बोलणे लाघवी मृदू मैत्रीपूर्ण होते .
त्यांचे काम हे पूर्णतः प्रामाणिक 
आणि नोकरीला न्याय देणारे होते .
त्यांचे हे गुण त्यांच्या देहबोलीतूनही प्रकट होत .

 खरंतर एखादे डिपार्टमेंट 
एखाद्या प्रमुखाच्या  हातात देऊन 
प्रशासकाला निर्धास्त राहता येते 
तसा तो डिपार्टमेंटचा प्रमुख असावा लागतो 
एक्स रे डिपार्टमेंटच्या बाबतीत .
तिथे तांबे असल्यामुळे मी सुखी होतो .
तिथे फारसे पाहावे लागत नव्हते . 
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 
आवड निवड हेवेदावे राजकारणअसते 
जणू काहीतरी पेल्यातील वादळे असतात  
त्याला ती पिऊन जिरवावी लागतात 
आणि विसरूनही जावी लागतात 
तांब्यांना ते कसब जमले होते .

 खरंतर त्यांचे बाहेरचे  नाटकाचे जग 
चमकते झगमगते पिवळ्या प्रकाशाचे होते 
तर हे एक xray चे जग अदृश्य किरणां चे  होते 
अशा या दोन विरोधी जगात ते जगत होते 
एकात त्यांचे मन होते तर दुसऱ्या त्यांचे तन होते 
त्यांचे नट दिग्दर्शक असणे
 नाट्य क्षेत्रात वावरणे कलेत जगणे 
हे सगळ्यांच्या कौतुकाचे कारण होते .

शाळेत गणपतीत केलेल्या एकांकिका 
यांचा अंगावर पडलेला मंद
पिवळा प्रकाश मी अनुभवला आहे 
त्यामुळे त्यात काय सुख आहे हे मी जाणतो 
 म्हणून त्या अनेक भाग्यवंतातील 
एक तांबे आहेतअसे मी म्हणतो 
खरच आवडते काम करायला मिळणे
हेच तर आनंदाचे जगणे असते 
मग ते सर्व काळासाठी असो 
किंवा काही काळासाठी असो 
ते त्यांना मिळाले आहे 
आणि कदाचित निवृत्तीनंतरचा काळ 
ते त्या जगातच रममान होतील 
हे मला माहिती आहे 
म्हणून त्या पुनःशुभारंभाच्या प्रयोगासाठी 
त्यांना खूप खूप शुभेच्छा
पुन्हा घंटा वाजू दयात अन पडदे उघडू दयात .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

सावली

सावली 
******
तो आता थकला आहे वृद्ध झाला आहे 
त्याला रणांगणावर बोलावू नका 
त्याच्या हातात शस्त्र देऊ नका 
त्याला जगू द्या थोडे त्याचे जगणे 
त्याला कळू द्या थोडे त्याचे जगणे 
तसा तो मित्रत्वाची भाषा जाणत नव्हता
विनयशीलता मानत नव्हता 
जमाव घेराव मर्मभेदी बोलणे 
बोलतच राहणे ऐकून न घेणे 
ही त्याची खास शस्त्रे 
अपमान करणे आघात करणे 
तोंड सुख घेणे ही त्याची शैली 
होय त्यांनी घेतले आहेत 
शेकडो शिव्या शाप तुमच्यासाठी
अनुभवलेत त्या प्राक्तनाने दिलेले वार
पण आता पुरे, 
तुमच्या इवल्या मागण्यासाठी 
तुमच्या खुळ्या महत्त्वकांक्षांसाठी 
नका लावू त्याला पाषाण उचलावयाला 
रथ ओढायला, रणशिंग फुंकायला 
होय तो येईल ही कारण ते
त्याच्या रक्ताचे गाणे आहे 
तो भांडेल ओरडेल कारण की ते 
त्याचे जगणे आहे 
मित्रांनो एवढेच सांगणे आहे 
झाड आता थकले आहे .
त्याला मोडून पडू देऊ नका 
जी सावली उपभोगली आहे तुम्ही 
तिच्याशी कृतघ्न होऊ नका
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

आदेश

आदेश
******
नाथ महाराज 
करा माझे काज 
सवे दत्तराज 
रूप दावा ॥१ .

विरक्तीचा अंश 
हृदयी  भरूनी
घ्या मज ओढूनी
पदावरी ॥२

अलख ओठात 
निरंजन मनी 
घाली मुद्रा कानी
पंथराज ॥३

आदेश कानात 
द्या हो माझे नाथ
विक्रांत मनात 
तळमळी ॥४

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

व्रणांच्या लक्तरी

व्रणांच्या लक्तरी
************
जन्माच्या या गाठी टोचती सलती 
कळल्या वाचून जखमा वाहती ॥

कुणाला सांगावे अंतर कोंडले 
सारेच धुरांडे काजळी माखले ॥

काय हवे तुज आणिक कशाला 
अर्था वाचून रे अंधार कोंडला ॥

मरून जावे का जगावे मरणे 
अस्तित्व भंगले व्हावे वा शोधणे ॥

कधी तरी कुठे प्रकाश किरणे 
येईल मिठीत आपुले असणे ॥

धूसर तरीही अमर आशा ही 
निजते दिवस वाया जाऊनही ॥

विक्रांत काहीली अंतरी ठेविली 
व्रणांच्या लक्तरी जिंदगी बांधली ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

दत्त आकाश

दत्त आकाश
**********
पंख लेऊनी वादळी 
असा उधाणत गेलो 
जन्मोजन्मीचे किटाळ 
क्षणी झटकून आलो ॥१
नाही भय शंका काही 
दत्ता शरण मी गेलो 
जीणे आभास काळाचा 
सुख दुःखात हसलो ॥२
भोग उरला सुरला 
नात्यागोत्याचा व्यापार 
तोही सुटेल क्षणात 
पाने उलटून चार ॥३
मज अलिंगतो दत्त 
मज उधळतो दत्त 
बळ देऊन पंखात 
नेई उंच आकाशात ॥४
दत्त कृपेचा प्रकाश 
लक्ष तरंग नभात 
कण इवला विक्रांत 
गेला विरून तयात ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

अनुवाद


हे प्रभू दत्तात्रेया
या माझ्या विनम्र प्रार्थनेने
माझे हृदय होते पुलकीत
माझा जीव थबकतो थरारतो 
प्रत्येक हृदय कंपनात
माझा आत्मा आसावतो व्याकुळ होतो
तो तुझा दैवी प्रकाश 
जावा उतरत माझ्यात म्हणून

ते तुझे अस्तित्व देते मला 
निरव उदात्त शांती 
त्या तुझ्या मिठीत हरवतात माझ्या चिंता 
तुझी प्रगाढ चैतन्यमय सर्व व्यापकता
होते माझ्यासाठी दिशादर्शक तारा 
त्या माझ्या अफाट अनंत प्रवासात 
तो कधी असतो जवळ हृदयात
तर कधी अति दूर अंतराळात
वेदनांच्या या दुःखद प्रवासात 
स्वप्नांच्या रंगीत आकाशात 
तो असतो माझा 
परम शांती प्रदायक पथदर्शक प्रकाश

माझ्या प्रत्येक श्वासात अन 
ओठावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रार्थनेत 
मला मिळते शक्ती सामर्थ्य 
जे येत असते तुझ्या अर्चनेने

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

शंकर महाराज

शंकर महाराज
************
अष्टावक्र अवलिया 
बालोंन्मत अवधूता 
अप्राप्य साऱ्या जगता 
परि प्रेमे भेटे भक्तां ॥१
उग्र मुद्रा तीक्ष्ण डोळे 
नजरेत वीज खेळे 
देही असून विदेही 
अष्टसिद्धी पायी डोळे ॥२
बोलावून पायी देवा 
दिले मज गूढ सुख 
परी वाढली रे भुक 
प्रीती दुणावे अधिक ॥३
ज्ञान देई भक्ती देई  
भाळी लावी रे विभूती 
कली मळ सरो सारा 
धडाडून दे विरक्ती ॥४
लोभ सरो मोह सरो 
हृदयात प्रेम झरो
होत कलंदर तुझा 
अलक्षात चित्त हरो ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
/kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...