रविवार, ३१ मार्च, २०२४

मुद्रा


मुद्रा
*****
माझ्या अस्तित्वावर उमटलेली 
तुझी मुद्रा अगदी खोलवर 
मला पुसता येत नाही 
ती मुद्रा म्हणजे तू नाहीस 
हे तर अधिकच जीवघेणे 
तरीही ते स्वप्न मी पुसत नाही 
आसक्ततीचा डंख करून जीवाला 
तू गेलीस दूरवर हसत हसत 
आणि मला त्या दाहावर 
औषधही सापडत नाही 
मी बोलावूनही तू येणार नाहीस 
माहित आहे मला पक्केपणी
पण हे प्राणपणाने बोलावणे
माझ्याकडून थांबत नाही
तू आता दूर अज्ञात कुठेतरी 
आयुष्याने बांधलेल्या 
चिरेबंद चौकटीची 
पण मनाला  तुझ्याविना रिक्त 
अजूनही होता येत नाही

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ३० मार्च, २०२४

कळो जावे

कळो जावे
*********
कळणाऱ्या कळो जावे 
भाव माझ्या मनातले 
उतरून डोळा यावे 
रंग सांज नभातले ॥१
तसे तर सारे काही 
शब्दा कुठे कळते रे 
अन स्पर्श भारावले 
विसरती भान सारे ॥२
सलगीत उबदार 
काळ वेळ हरवतो 
कुजनात काळजाच्या 
यमुनेच्या डोह होतो ॥३
कदंबाचे फुल कानी 
हरखून येते गाली 
डोईतील गंध वेणी 
विखुरते रानोमाळी ॥४
भारावते इंद्रजाल 
काळ्या गूढ डोळ्यातले 
अन मनी वितळती 
शब्द धीट ओठातले ॥५
किती दिन किती राती 
आल्याविन येती जाती
हरवून जन्मभान 
कैवल्याचे गीत ओठी ॥६
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

लोभ

लोभ
******
फुटली उकळी 
गाणे आले गळा 
प्रेमे उजळला 
गाभारा हा ॥ १
शब्द सुमनांनी 
भरले ताटवे
भ्रमराचे थवे 
भावरूपी ॥ २
पसरला धूप 
झाले समर्पण 
विषया कारण 
उरले ना ॥ ३
वाजे घण घण
ध्वनी हा सोहम 
धुंद रोम रोम 
गुरू प्रेमे ॥ ४
कृपेचा सागर 
श्रीपाद वल्लभ 
अविरत लोभ 
दीनावर ॥ ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २८ मार्च, २०२४

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी
***********
स्वप्न हरखले डोळीया मधले 
स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१
नभात लक्ष दीप उजळले 
अन चांदण्याचे तोरण जाहले ॥२
कणाकणातून स्फुरण उठले 
खुळ्या अस्तित्वाचे भान हरपले ॥३
गिळून मीपण मीपण उरले
स्थळ काळाचे या भानही नुरले ॥४
ऐशिया प्रीतीने मजला व्यापले 
श्रीपादाची सखी अनन्य मी झाले ॥५
जगत दाटले या मनामधले 
मन हरवता मनास कळले ॥६
तोच तो विक्रांत तेच ते जगणे 
क्षितिज सजले दिसते वेगळे ॥ ७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

वाढदिवस

वाढदिवस
*******
तसा तर दरवर्षी 
येतो तुझा वाढदिवस 
दरवर्षी म्हणतो मी तुला 
सुखात जावो वाढदिवस 
पण खरे तर सुखाची 
मीच मला देतो भेट 
तुझ्या असल्यामुळेच 
माझ्या या जीवनात 
आनंद प्रकटतो थेट 
काही मागितल्या वाचून 
कोणाला काही मिळते 
तेव्हा त्याचे मोल 
खरच किती अनमोल असते 
तशी कृपा होऊन तू 
माझ्या जीवनात अवतरते 
ती कृपा झेलता झेलता 
माझ्या मनी गाणं उमटते
धन्यवाद देत तुला मन 
काठोकाठ भरून जाते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २१ मार्च, २०२४

मोरपीस

मोरपीस
*******

माझेपण तुझ्यासाठी जन्मोजन्मी व्याकुळले अव्याहत आस तुझी डोळ्यात पखाली झाले ॥१

 भिजूनिया वाटा गेल्या घाट ओले चिंब झाले 
जन निंदा झेलुनिया काळजाचे पाणी झाले ॥२

 तुझ्यावरी उगारले कटू बाण साहू कसे
तन मन विद्ध माझे परी तुला सांगू कसे ॥ ३

जाणते मी येशील तू तुडवित रानावना
वाटेवरी काटे कुटे  पावुलांना खुपतांना ॥४

परी मज ठाव नाही वेल किती टिकणार 
वादळात जीवनाच्या किती तग धरणार ॥ ५

पुन्हा पुन्हा तुझ्यासाठी जन्म घेणे मान्य मला 
मोरपीस फक्त तुझे लागो माझ्या हृदयाला ॥ ६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

का?



 का ?
*********
दत्त चालविता देह का चालतो 
दत्त थांबविता देह का थांबतो ॥

दत्त हसविता दत्त खेळविता
दत्त जीवनाचा श्वास का असतो ॥

काय स्वरूपाचा प्रकाश विश्वाचा 
मग का कुणाला कधी न दिसतो ॥

दत्त नियमाचा स्वतः त बांधला
कर्म चाकोरीचा दाता का असतो ॥

ऐसिया दत्ताला पहावे म्हणता 
डोळा का रे गर्द अंधार दाटतो ॥

विक्रांत आंधळा अंधारी निजला 
कथा उजेडाच्या व्यर्थ का ऐकतो ॥

मुकीया बोलणे बहिऱ्या ऐकणे 
व्यवहार ऐसा काही का घडतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...