सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

भूल

भूल
****

तू चार शब्दांचे 
शिंपडून थेंब 
जातेस निघून 
भिजवून चिंब 

माझी नाही ना 
अगदी कशाला 
रुतते तरी का
नकळे उराला 

काय येथे कुणी 
मर्जीने जगतो 
स्वप्नातील स्वप्न 
धरूनी बसतो 

शब्द स्पर्श गंध 
किती गूढ सारे 
कळल्या वाचून 
जीवन थरारे 

अशी रम्य भूल 
पडते जीवाला 
राहते थांबून 
जिणे त्या क्षणाला

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .


खेळ

खेळ
****
संपवावा वाटे डाव हा चालला 
खेळ जो लांबला 
उगाचच ॥१
बांधावा हा पट सोंगट्या डब्यात
मिटून शून्यात 
स्तब्ध व्हावे ॥२
पडती कवड्या कोणाच्या इच्छेने 
हरणे जिंकणे 
घडे खोटे ॥३
मज अवघ्याचा आलाय कंटाळा 
कळेना जुंपला 
कोणी मला ॥४
प्रतिमा पदवी खोटे मानपान 
अवघे सामान 
पाठीवरी ॥५
रिती नातीगोती नाकात वेसन 
कर्तव्या बांधून 
चालणे हे ॥६
सरो चाचपडणे सरो धडपडणे 
विक्रांत नसणे 
होवो आता ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

सॅप


सँप
****
ते पुराणे मस्टर माझे मला कोणी द्यावे रे 
हे सॅपचे भूत वेडे आता उरावर नको रे ॥१

ती तांबडी खूण क्रॉसची पुनपुन्हा दिसू दे रे 
ते रजेचे हिशोब आणि नीट मला लागू दे रे ॥२

पडेल ए एन एम का लागेल ती हजेरी 
चिंता हीच चित्तास सर्वदा या लागलेली ॥३

कधी नेट नसतेच वा कधी मशीन बिघडते 
वहीतल्या हजेरीचे कुणा ठाव काय होते ॥४

असे बॉस एच आर वाला सदैव तो कावलेला 
पगार त्याने उगा कापला न्याय असे कुठला ॥५

हि तो चक्क दादागिरी शोभतें न मुळी त्याला
असेल काय कायदा हा प्रश्न मनी पडलेला  ॥६

नटवले माकडांना नेसवून पॅन्ट त्यांनी 
चढता न ये झाडावरी उपाशी फळ पाहुनी ॥७

असेच काही झाले इथे व्यय तो आणिक वाढे 
फाटकेचे वस्त्र अंगी हाती मोबाईल महागडे ॥८

महागडे सॉफ्टवेअर घेऊन ते पस्तावले 
राग कुणाचा कुणावर  काढत नि बैसले ॥९

वर्ष इतकी चाललेले काय ते वाईट होते 
समोरची काळे पांढरे हिशोब स्पष्ट होते ॥१०

मान्य ते करणार नाही चूक हे म्हणणार नाही 
मुरतेय पाणी कुठे ढुंकूनी पाहणार नाही ॥११

पारदर्शकता ती म्हणे फक्त आहे डोंबलाची 
छिद्रे तशीच गाळणीला पण चहा गळत नाही॥१२

हात हाती बांधलेले गाठ गाठी मारलेले 
जया ठाव चोरवाटा तिथे कुलूप लावलेले ॥१३

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३

येते


येते
****

जेव्हा नीज येत नसते 
रात्र रेंगाळत असते 
क्षणाचे गाणे उगाच
पुढे सरकत असते  
ते एकटेपणातील जागणे 
मज असह्य होत असते 

तेव्हा तू जवळ येतेस 
कुशीत माझ्या शिरतेस 
आणि मला म्हणतेस 
तुला अजून स्वप्न पडतात का ?
मग मी तिला म्हणतो 
तर मग तू कोण आहेस !

तेव्हा ती हसते 
माझ्यात हरवून जाते 
जाता जाता म्हणते 
ये मग तिथे 
मी तुझी वाट पाहते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ .

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

उठवा

उठवा
*****

किती रे शिणावे स्वामी जगतात 
फाटक्या वस्त्रात 
वावरावे ॥१
तेच ते वहावे जीवनाचे गाडे 
प्रारब्धाचे कोडे 
अवघड ॥२
रोज नवे वळ रोज नवी कळ 
रोज तळमळ 
अनाहूत ॥३
खचित हे स्वप्न कळते आतून 
जागृती अजून 
येई न का ॥४
कुठे तो असेल मी रे निजलेला 
कुठल्या मितीला 
थांबलेला ॥५
उठवा दयाळा श्री दत्त कृपाळा 
मिटलेला डोळा 
अज्ञातात ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

व्यवस्था


व्य व स्था
*******

फार फार बरं वाटलं 

राखीव राखीव म्हणून
ज्यांनी होतं धुत्कारलं 
त्यांनीच रान राखीव
स्वतः आज मागितलं 

खरंच फार बरं वाटलं 
समानतेचं जणू नवं
दालन उभ राहीलं
झगमगलं अन सजलं

तुमची टक्के किती ते 
मला माहित नाही रे 
मिळतील ते किती रे 
मला कळत नाही रे 

पण तुम्हां मिळू दे 
समीकरण जुळू दे 
व्यवस्था हीआणखी 
काटेकोर चालू दे

शतकोनशतको आम्ही
उंच उंच उभारलेले
हे तट अन हे  बुरुज
अजुन मजबूत होऊ दे?

कारण आपण अन
आपले लोक जपणे
हेच तर असते खरे
व्यवहारीक जगणे

बाकी जाऊ दे भाड मे
त्याच्याशी काय काम रे
संधी शोधा यश मिळवा
किंवा खेचून ते घ्या रे 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .


मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०२३

तो क्षण

 तो क्षण
*******

कधीकधी निसटतो
तो क्षण हातातून 
ज्याची वाट आपण 
पाहत असतो 
डोळ्यात प्राण आणून 

आणि मग पुन्हा येते 
दीर्घ प्रतिक्षा 
खुणेचा दगड बसतो 
दूरवर जाऊन 

तो क्षण 
हातातून निसटणं 
मग पुन्हा पुन्हा 
आपलं वाट पाहणं 
असे घडतं 
कितीतरी वेळा 
अगदी तो क्षण 
स्पर्शून जाऊन

हे रिक्त हाताचे प्राक्तन
तसे असतेच ठरलेले 
तरीही जीवन 
त्या क्षणाच्या वाटेवर 
थांबलेले असते 
तो क्षण होण्यासाठी
हट्ट धरून 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...